अपक्ष गोविंद गावडेंना प्रियोळात भाजपचा पाठिंबा

0
87

>> भाजपाध्यक्ष तेंडुलकर यांची माहिती

 

येत्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काणकोण मतदारसंघात विजय पै खोत तर मये मतदारसंघात प्रवीण झांट्ये यांना आपल्या पक्षाची उमेदवारी देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. तर प्रियोळ मतदारसंघातू मगो उमेदवार दीपक ढवळीकर यांचा पराभव करण्यासाठी तेथील अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी दिली. भाजपच्या या भुमिकेमुळे आधी गोविंद गावडे यांना पाठिंबा दिलेल्या आम आदमी पक्षाची स्थिती विचित्र बनली आहे. या पार्श्‍वभूमीवर आम आदमी पक्ष प्रियोळात आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजपच्या वरील निर्णयामुळे काणकोण व मयें मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते संतप्त बनले असून त्यांच्या बळावर सभापती अनंत शेट व रमेश तवडकर यांनी बंड करण्याची तयारी करून कामास सुरूवातही केली आहे. तवडकर यांच्या काही कार्यकर्त्यांनी कॉंग्रेस उमेदवार इजिदोर फर्नांडिस यांना पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. तर दुसर्‍या बाजूने तवडकर यांनी मगोची उमेदवारी मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.
दरम्यान प्रियोळचे अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांना आम आदमी पार्टीनेही आपला पाठिंबा यापूर्वीच जाहीर केला होता. आता भाजपनेही त्यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आम आदमी समोर समस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हार्दोळ येथे जाहीर सभा घेवून या मतदारसंघातून मगो उमेदवार निवडून येणार नाही, याची भाजपने काळजी घेतल्याचे जाहीर केले होते. त्याचवेळी भाजप गोविंद गावडे यांना पाठिंबा देणार हे स्पष्ट झाले होते. गावडे यांना भाजपमध्ये आणण्यासाठी बरेच प्रयत्न केले होते. परंतु गावडे यांनी भाजपात पक्ष प्रवेश करण्यास नकार देवून पाठींब्याची मागणी केली.
दरम्यान, वरील पार्श्‍वभूमीवर आम आदमी प्रियोळमध्ये आपला उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे.