विकलांगांची माऊली लोकविश्‍वास प्रतिष्ठान

0
110

– सौ. लक्ष्मी ना. जोग

‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ ही फक्त शाळा नाही तर कर्णबधीर मुलांसाठी संजीवनी आहे. संस्थेनं १९८१ मध्ये लहानशा भाड्याच्या घरात पहिली ते चौथीपर्यंत निवासी शाळा सुरू केली होती. या इवल्याशा रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या लांबच लांब पारंब्या दूरवर पसरल्या आहेत. लोकविश्‍वास म्हणजे एक शक्ती आहे, सावली आहे आणि लोकविश्‍वास म्हणजे विकलांग मुलांची माऊली आहे!

घरात मूल जन्माला येणं ही परमानंदाची गोष्ट असते. हे मूल हाती-पायी व्यवस्थित असावं, त्याची सर्व इंद्रिये जिथल्या तिथं असली म्हणजे त्या इंद्रियांच्या योगे त्याच्या सर्व दैनंदिन क्रिया सुरळीतपणे होऊ लागतात. मूल जन्मल्याबरोबर जोरात रडतं तेव्हा त्याचा आवाज आपण ऐकतो. त्यावरून त्याचा घसा ठीक आहे हे आपण जाणतो. पण त्याला ऐकायला येतं की नाही हे कळायला मात्र थोडा अवधी जावा लागतो.

काही अवघ्या महिन्यांत मूल आवाजाच्या दिशेनं मान वळवण्याचा प्रयत्न करतं. मोठा आवाज आला की डोळ्यांच्या पापण्यांची विशिष्ट उघडझाप करतं. झोपलेलं असेल तर त्या आवाजानं जागं होतं. टाळी वाजवली, खुळखुळा वाजवला किंवा चमच्यानं वाटीचा नाद केला की रडत असलेलं मूल एकदम थांबतं. पुढं ते आईचा आवाज ओखळतं. पण काही मुलांच्या बाबतीत मात्र दुर्दैवानं ही ऐकण्याची क्रियाच होत नाही, आणि ते आईसकट कुणाच्याही लक्षात येत नाही. घरातले वेगवेगळे आवाज, बाहेरचे आवाज, फटाकड्यांचे मोठे आवाज कानावर पडूनसुद्धा ते मूल काहीच प्रतिक्षिप्त क्रिया करत नाही. हे बारकाईनं लक्ष ठेवलं तरच लक्षात येतं. त्या मुलाच्या इतर सर्व क्रिया यथायोग्य होत असतात. भूक लागली की किंवा आई दिसली की रडणं, बाहेर नेऊन हम्मा, भूभू, पंपं दाखवली की थांबणं, खाणं-पिणं, शी-सू हे सगळं नीट चालू असतं, त्यामुळे या बालकाला ऐकू येत नसेल हे ध्यानात येतच नाही. किंबहुना ते मानायलाच कुणी तयार नसतं. माझ्या माहितीतल्या एका कुटुंबातला मुलगा वडिलांनी हार्मोनिअम वाजवत मांडीवर घेतलं किंवा भोवती कितीही कोलाहल असला तरी झोपायचा. आईवडिलांना वाटायचं पेटीच्या मधुर आवाजामुळे तो झोपतो. पण खरं म्हणजे त्या आवाजानं तो जागा राहायला हवा होता. पण या गैरसमजामुळे त्या मुलाला ऐकू येत नाही हे कळायला खूप उशीर लागला.
आपल्या बालकाच्या विकलंगत्वाकडे काही पालक गांभीर्याने लक्ष देत नाहीत. काही मुलं जन्माची कर्णबधीर नसतात. पण त्यांच्या कानाजवळ खूप मोठा (फटाकडे, दादा बॉंब वगैरे) आवाज झाला तर त्यांच्या कानातला नाजूक पडदा फाडतो व मग त्यांना बहिरेपणाला तोंड द्यावं लागतं. म्हणून पालकांनी मोठा आवाज त्याच्या कानाजवळ होणार असं दिसलं तर मुलाला तिथून बाजूला न्यायची खबरदारी घ्यायला हवी. मूल बोलत नाही त्याअर्थी त्याला ऐकू येत नसावं याची काही पालकांना कल्पनाच नसते. ‘त्याची जीभ जड आहे, शेजारचा बन्याही उशिराच बोलू लागला होता, तसाच हाही उशिरा बोलेल’ अशी वेडगळ समजूत करून ते त्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. त्यावर काही उपाय करायचे सोडून त्या मुलाचं वैगुण्य लपवतात. पण मुलाचं मात्र जन्माचं नुकसान होतं.
कर्णबधीर मूल भाषा आणि संभाषण सोडल्यास कुठलीही कौशल्यात्मक कामं सामान्यांसारखी करू शकतं. पण शिक्षण आणि परीक्षा म्हटली की तिथं भाषेला व लिखाणाला प्राधान्य असतं, म्हणून हा विद्यार्थी कितीही हुशार असला तरी त्याच्याजवळ भाषा नसल्यामुळे मागे राहतो. म्हणूनच कर्णबधीर मुलाला लवकरात लवकर विशेष शाळेत दाखल करायला हवं. अशा मुलाला लहान वयातच जर मातृभाषा मिळाली तर त्याचा सामाजिक, भावनिक व बौद्धिक विकास चांगल्या प्रकारे होऊ शकेल. त्यामुळेच ‘लोकविश्‍वास’चं महत्त्व अनन्यसाधारण आहे.
मूल बोलू शकत नाही याबद्दल लोकांच्या मनात अजूनही गैरसमज म्हणा वा अंधकल्पना आहेत. काही लोक ‘मुलाची जीभ अर्धीच आहे’ किंवा ‘ती टाळूला चिकटलेली आहे म्हणून तो बोलत नाही’ असे सांगतात. तर काही पूर्वजन्मीचं पाप म्हणून हे नशिबात आलं असं म्हणून गप्प बसतात. एकानं तर म्हटलं, ‘याच्या आईनं किंवा यानं ‘पाल’ मारली म्हणून मुकेपण पदरी आलं. आता ते जन्मभर भोगावं लागणार!’ पण त्यावर उपाय आहे हे सांगितल्यावर त्यांचा विश्‍वास बसेना. दुसरं म्हणजे, त्याला ऐकायलाच येत नाही म्हणून तो बोलू शकत नाही हे काहींच्या लक्षातच येत नाही.
असं सांगतात की प्राचीनकाळी फ्रान्स या देशातील राजवाड्यात कर्णबधिरांच्या शिक्षणाची सुरुवात झाली. मुलाला बोलून शपथ घेता आली तरच इस्टेटीत वाटणी मिळणार असा कायदा तिथं असल्यामुळं कर्णबधीर मुलाला तोंडी भाषा शिकवून शिक्षण देण्याची सुरुवात झाली. भारतात मुंबईला मिशनरी लोकांनी १८८४ साली असं शिक्षण देणारी पहिली शाळा सुरू केली होती.
जन्मांध व मूकबधीर असलेल्या हेलन केलर म्हणत, ‘‘इतर कुठलंही व्यंग मला पुढच्या जन्मी मिळालं तरी चालेल पण बहिरेपण नका. कारण त्यामुळं जीवनच गुदमरून जातं.’’ प्रत्येक मूकबधिराची अवस्था अशीच असते. अशी मुलं उत्तम मैदानी खेळ खेळतात. सर्व दैनंदिन व्यवहार, बँक व्यवहार, इंजिन दुरुस्ती, सुतारकाम, मातीकाम, मूर्तीकाम, चित्रकला हे सर्व आत्मसात करू शकतात. शिवण, रंगकाम करतात. या सगळ्याचं व्यवसायाभिमुख मार्गदर्शन केलं तर उत्तम जीवन जगू शकतात.
गोव्यात १९८० पर्यंत कर्णबधिरांसाठी शिक्षणाची कुठलीही सोय नव्हती. काही अवघ्या श्रीमंत मुलांना मुंबई-पुण्याला वगैरे नेत. येथे अशा मुलांकडे दुर्लक्षच होत असे. खेडोपाडी तर मूकबधीर, अंध वा मंदबुद्धी असणार्‍या मुलांचं भवितव्य अंधःकारमयच होतं. कानाला श्रवणयंत्र बसवल्यास ऐकू आल्यानंतर मूल बोलू शकेल हे कित्येक लोकांना माहीतच नसतं. पण ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ ही शाळा झाल्यामुळे अशा शेकडो मुलांचा भविष्यकाळ आशादायक झाला आहे. त्यांच्या माता-पित्यांना मोठाच दिलासा मिळाला आहे. शाळेत सर्व प्रकारची उपकरणे व प्रशिक्षित शिक्षक आहेत.
अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध असलेली ही शाळा गोव्यात स्थापन होण्यास एक मूकबधीर मुलगा व त्याचे माता-पिता कारणीभूत ठरले, हे काही थोड्या लोकांनाच माहीत असेल. म्हणूनच ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ म्हटलं की सोवनी पती-पत्नीचं नाव आधी आठवतं. वीणा व विश्‍वास सोवनी यांचा मुलगा तुषार हा मूकबधीर असल्याचं त्यांच्या थोडं उशिराच लक्षात आलं. त्यांनी त्याला मुंबई, पुणे, मिरज वगैरे मोठ्या शहरांत नेऊन डॉक्टरांना दाखवलं. तपासण्या केल्या. पण त्याचा काही इलाज झाला नाही. तेव्हा त्याला पुण्याच्या विनयकुमार रामनिवास रुइया, मूकबधीर विद्यालयात दाखल करण्याबद्दल एका मैत्रिणीनं त्यांना सुचवलं. मन खंबीर करून त्यांनी मुलाला त्या विद्यालयात दाखल करायचा निर्णय घेतला. पण अनेक समस्या पुढे उभ्या होत्या. पण आताच मुलाला शिक्षण दिलं तरच तो पुढे आपल्या पायावर उभा राहू शकेल, अन्यथा तो समाजात चेष्टेचा विषय ठरेल असा विचार करून आई मुलाला घेऊन पुण्याला, वडील नोकरीनिमित्त फोंड्याला व दीड वर्षाची मुलगी गावी आजीकडे अशी तिरस्थळी यात्रा त्यांना करावी लागली. सुदैवाने मूकबधीर विद्यालयाला जोडूनच शिक्षक प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे आईनं प्रशिक्षण पूर्ण केलं. ती मूकबधिरांची भाषा शिकल्यामुळं मुलाला घरात शिकवू शकत होती. तुटपुंज्या आर्थिक पाठबळामुळे तिला पुण्यात राहणं कठीण झालं. दीड वर्षाने ती मुलाला घेऊन गोव्यात परतली. आता ती मुलाला शिकवू लागली. पण आपल्या मुलासारखीच आणखीही विकलांग मुलं असतील, त्यांच्या आईबापांची आपल्यासारखी परवड होऊ नये व मुलंही शिकावीत अशी तळमळ उभय सोवनी पती-पत्नीला लागली. या ध्यासामुळे विश्‍वास सोहनी यांनी दैनिकात अनेक लेख लिहिले. कारण हे एकट्यादुकट्याचं कामच नव्हतं. सर्व समाजांचं त्याला पाठबळ हवं होतं. हा विचार मनाशी पक्का करून ते गोवा रेडक्रॉस, प्रोव्हिदोरिया, गोवा हिंदू असोसिएशन, समाजकल्याण खाते, शिक्षण खाते, मुख्यमंत्री आणि अन्य संबंधित मंत्री या सर्वांना भेटले व समाजाला आत्यंतिक गरज असलेल्या या बाबीविषयी पटवून दिलं. पण काहीच प्रतिसाद मिळाला नाही. संपादक नारायण आठवले यांनी मात्र या समस्येला भरपूर प्रसिद्धी दिली. ‘मूकबधीर व आंधळ्यांची हाक’ असा अग्रलेखही लिहिला. हे लेख वाचून अनेक पालकांनी सोवनींना भेटण्यासाठी धाव घेतली. सगळ्याच विकलांग मुलांच्या शिक्षणाची व त्यांच्या पालकांची केविलवाणी स्थिती तीव्रपणे जाणवली. लोकजागृती झाली होती. आठवले यांनी गोमंतकीयांना आर्त हाक दिली. एका सदरातून सोवनींनी पाठपुरावा केला. विकलांग मुलांची नोंदणी सुरू झाली. त्यानंतर संपादकांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळून मोठा निधी उभा झाला व फोंडा येथे ‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ या संस्थेची निवासी मूकबधिरांसाठीची शाळा एका भाड्याच्या घरात सुरू झाली. १६ ऑगस्ट १९८१ रोजी आठवलेंच्या वाढदिवसाचं औचित्य साधून गोव्याचे त्यावेळचे नायब राज्यपाल श्री. जगमोहन यांच्या हस्ते शाळेचं उद्घाटन झालं. पुढे श्री शांतादुर्गा देवस्थान, कवळे यांच्यामुळे शाळेला स्वतःची जागाही मिळाली.
ही शाळा खरोखरच लोकांच्या मदतीवर व विश्‍वासावर उभी आहे. शेकडो कर्णबधीर मुलं-मुली तिथं शिकून आपल्या पायावर उभे राहून यशस्वी जीवन जगत आहेत. ‘विकलांग’ हा शब्द नुसता उच्चारतानाच मन बेचैन होतं, मग स्वतःचं मूल तसं आहे हे वास्तव स्वीकारताना त्याच्या आईबापांना काय वेदना होत असतील? मुलाची चिमणी चिवचिव, चिमखडे-बोबडे शब्द, आई-बाबा ही हाक ऐकायला त्यांचे कान आसुसलेले असतात, त्या जागी हा विरोधाभास पचवायला मन घट्ट, खंबीर, सोशिक करावं लागावं यासारखं दुर्दैव ते कोणतं? आमच्या माहितीतल्या एका बाईचा मुलगा अंध व कर्णबधीर आहे. त्या मातेनं मनाला कितीवेळा मारलं असेल? कशी सहन करीत असेल ती हे वास्तव? तिला पाहिल्यावर खरोखरच ‘विश्‍वाचे आर्त’ म्हणजे काय असेल याची कल्पना येते. ‘लोकविश्‍वास’ अशा मातांना देवासारखीच वाटणार. चिमण्या पावलांनी दुडदुडणार्‍या बालकाच्या कोडकौतुकात वेळ न दवडता, अशा विकलांग मुलांना ताबडतोब त्यांच्यासाठीच्या खास शाळेत दाखल केलं तर ही मुलं खूप जलद बोलकी होतात. कारण वयाच्या सहा वर्षापर्यंत त्यांची आकलनशक्ती तीव्र असते.
‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ ही फक्त शाळा नाही तर कर्णबधीर मुलांसाठी संजीवनी आहे. संस्थेनं १९८१ मध्ये लहानशा भाड्याच्या घरात पहिली ते चौथीपर्यंत निवासी शाळा सुरू केली होती. या इवल्याशा रोपाचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याच्या लांबच लांब पारंब्या दूरवर पसरल्या आहेत. १९८१ ते १९९१ पर्यंत गोवा सरकारकडून कोणतीही आर्थिक मदत संस्थेला मिळाली नव्हती. पूर्णतः लोकांच्या मदतीवर व विश्‍वासावर संस्थेचा खडतर प्रवास सुरू होता. घनदाट अंधारानंतर पहाटे सूर्यकिरणांची चाहूल लागून जग उजळू लागावं तसं १९९२ मध्ये गोवा सरकारने प्राथमिक शाळेला अनुदान देऊन शिक्षकांच्या पगाराचा प्रश्‍न मिटवला. त्यानंतर वसतिगृहाला केंद्र सरकारकडून अनुदान मिळू लागलं. पुढं विद्यार्ध्यांची संख्या वाढू लागल्यामुळे जागा अपुरी पडू लागली. आता स्वतःच्या वास्तूचं स्वप्न संस्था पाहू लागली आणि श्री शांतादुर्गेच्या कृपेने ते स्वप्नही साकार होण्याचे चिन्ह दिसू लागले. कारण कवळे येथील श्री शांतादुर्गा देवस्थाननं २५०० चौ.मी. जागा संस्थेला देऊ केली. १९९५ साली श्रींच्या कृपेने ‘लोकविश्‍वास’ने स्वतःच्या जागेत प्रवेश केला. नंतर पालकांच्या विनंतीवरून १९९९ साली मतिमंद मुलांना शिक्षण देण्याच्या हेतूनं संस्थेनं मतिमंद मुलांसाठी शाळा सुरू केली. त्या विद्यार्थ्यांना शिकवणार्‍या शिक्षकांची कमतरता होती, त्यामुळे महाराष्ट्रातून शिक्षक आणावे लागले. अनुदान नसल्यामुळे संपूर्ण खर्च संस्थेला झेपण्यासारखा नव्हता, म्हणून पालकांकडून फी घेऊन शाळा चालवावी लागत होती. २००६ मध्ये गोवा सरकारने या शाळेला अनुदान सुरू केलं.
२००१ मध्ये गोव्यातल्या पहिल्यावहिल्या अंध विद्यार्थ्यांच्या शाळेची सुरुवात ‘लोकविश्‍वास’नं केली आणि हळूहळू ‘सर्व प्रकारच्या विकलांगांना शिक्षण देणारी संस्था’ म्हणून गोव्यात मान मिळवला. पुढे मतिमंद मुलांना शिकवणार्‍या शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी आर.सी.आय.कडून मान्यता मिळवून गोव्यातलं पहिलं प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. ‘गरज ही शोधाची जननी असते’ या वाक्‌प्रचारात थोडा बदल करून ‘गरज ही प्रगतीचीही जननी असते’ असं लोकविश्‍वासच्या संदर्भात म्हटलं तर ते चूक ठरू नये!
मतिमंद मुलांची शाळा अनिवासी असल्यामुळे या शाळेत फक्त फोंडा परिसरातील मुलंच शिक्षण घेऊ शकत होती. म्हणून संस्थेनं ग्रामीण भागातील मतिमंद मुलांनाही शिक्षणाचा लाभ व्हावा म्हणून २००९ मध्ये मोखर्ड व काणकोण, २०११ मध्ये केपे व होंडा आणि २०१४ मध्ये खांडोळा व माशेल येथे त्यांच्यासाठी शाळा सुरू केल्या. सन २०१४ मध्ये ‘लोकविश्‍वास’नं मूकबधीर मुलांसाठी माध्यमिक विद्यालय सुरू करून आपल्या कार्यकर्तृत्वात आणखीन एक मानाचा तुरा खोवला.
‘लोकविश्‍वास प्रतिष्ठान’ या शाळेत सर्वसामान्य मुलांच्या शाळेत चालतात ते सगळे उपक्रम चालतात. श्रवणयंत्र व ओष्ट वाचन यांच्या सहाय्यानं मुलं वाचायला, बोलायला शिकतात. सर्व धार्मिक सण, राष्ट्रीय सण शाळेत साजरे केले जातात. नृत्य, नाट्य, संगीत शिकतात. बैठे खेळ, मैदानी खेळ, बागकाम, कलाकुसर हे सगळं मुलांच्या आवडीनुसार शिकवतात. स्नेहसंमेलन, वनभोजन, सहली, शिबिरं यांसाठी मुलांना नेलं जातं. त्याचा पुरेपूर आनंद मुले लुटतात.
कर्णबधीर किंवा मुक्या मुलांना समाजात वावरताना खूप त्रास सहन करावा लागतो. अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. बरोबरची मुलं त्यांची चेष्टा, हेटाळणी करतात. खोड्या काढतात. त्यांना कमी लेखतात. पण ‘लोकविश्‍वास’सारख्या शाळेत सगळीच मुलं समान अडचणींना तोंड देणारी असल्यामुळे कुणी कुणाला कमी लेखण्याचा प्रश्‍न नसतो. पण नॉर्मल मुलांत मिसळल्यावर तसं होत नाही. ती मुलं त्रास देतात तो निमूटपणे सहन करावा लागतो. बोलता येत नाही, त्यामुळे त्यांचा आतल्या आत कोंडमारा होतो. ती कोणात मिसळेनाशी होतात. एकलकोंडी, हट्टी होतात. म्हणूनच ‘लोकविश्‍वास’चे समाजाने यासाठी आभार मानायला हवे की संस्थेने अशा मुलांसाठी खूप मोठं व महत्त्वाचं काम केलं आहे. शिकल्यानंतर ही मुलं नोकरीधंदा करून सुखेनैव आयुष्य जगू शकतात, आत्मविश्‍वासानं वावरू शकतात, वावरत आहेत. ही मुलं व त्यांचे पालक ‘लोकविश्‍वास’चे ऋण मान्य करतात, दुवा देतात. खरोखर, गेल्या ३६ वर्षांत कितीतरी मुलं ‘लोकविश्‍वास’मध्ये शिकली. त्यांचं अक्षरशः कल्याण झालं आहे. या शाळेचे हे उपकार आणि कृतज्ञता व्यक्त करायला शब्द अपुरे आहेत. अक्षम मुलांना सक्षम करण्याचं काम अनेक प्रशिक्षित शिक्षक-शिक्षिकांकरवी संस्थेनं केलं आहे. लोकांचा अढळ विश्‍वास संपादन केला आहे. म्हणूनच लोकविश्‍वास म्हणजे एक शक्ती आहे, सावली आहे आणि लोकविश्‍वास म्हणजे विकलांग मुलांची माऊली आहे! या माऊलीला शतशः प्रणाम व मकर संक्रांतीच्या लाख लाख शुभेच्छा!