सावी

0
204

– सौ. पौर्णिमा केरकर

कशी जगतात माणसे… संघर्ष, अडचणीला कशी सामोरी जातात? त्यांचे परिस्थितीमुळे कोलमडून जाणे, परत नव्याने उभारी घेणे, आयुष्यातील प्रत्येक प्रश्‍नाला भिडणे, त्यावर मात करूनही जगणे, खूप अस्वस्थ करते मन.

वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं… आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून वळावंच लागतं… आपल्या आयुष्यात कोण येणार हे वेळ ठरवते… परंतु आपल्या आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवतं. पण आपल्या आयुष्यात कोण टिकून राहणार हे मात्र आपला स्वभावच ठरवतो. ‘व्हॉटस् ऍप’वरून फिरणारी अशी काही संवेदनशील वाक्ये मी वाचत होते. त्याचवेळी मनाचे विचारचक्र सुरू झाले. अरे किती चाललो आपण… आणि आताही हा प्रवास चालूच आहे….

मला समजायला लागल्यापासून अशी कितीतरी माणसे माझ्या सहवासात आली, सोबत राहिली, काहीशी स्थिरावली, नंतर सोडूनही गेली. काही काही तर अशी आहेत की आयुष्याच्या एका टप्प्यावर जर मला ती भेटली तर मी त्यांना ओळखू शकेन का, अशी शंका यावी. काही तर ओळखसुद्धा न दाखवता पुढे पुढे जात आहेत. अगदी माझी, आपली, जीवातळातली आहेत तीही आता कोठेतरी हलत आहेत. या अशा जाणिवांनी हृदयात हलकीशी कळ उमटते. पण म्हणून सगळेच काही संपल्यातच जमा आहे असेही नाही. ग्रामजीवनाच्या वासाची, अस्सल, भावोत्कट वृत्तीची माणसे भेटली ती खेडोपाडी नांदणारी. निमित्त होतं माझ्या लोकसाहित्याच्या संशोधनाचे- अभ्यासाचे.
देवर्‍याच्या सावीची ओळख अशीच अंधारून आलेल्या तिन्हीसांजेतली… घरात एखाद-दुसराच मिणमिणता रॉकेलचा दिवा. मुख्य रस्त्यापासून तिच्या घरापर्यंत जाण्यासाठी दीड-दोन किलोमीटरचा खडबडीत दगडी रस्ता. रस्ता कुठला, उंचसखल खाचखळग्यांची पायवाटच ती. ‘सावी’ आणि तिच्यासोबतीने राहणारी, वाढणारी कुटुंबे कशी बरे दरदिवशीचा प्रवास या वाटेवरून करत असावीत असा विचार मनात आल्याशिवाय राहिला नाही. आमच्या हातात विजेरी होती, तरीसुद्धा सावी आलीच आम्हाला आपल्या घरापर्यंत न्यायला. तिने उजेडासाठी कसलंच साधन आणलं नव्हतं. पायाखालची वाट तिची सरावाची, जीवनातील आजपर्यंतच्या प्रवासाची साक्षीदार असलेली. मी अगोदरच सांगून ठेवलेलं, त्याप्रमाणे आणखीही काहीजणी तिच्या अंगणातील पेळेवर आमची वाट पाहत बसलेल्या. त्या अंधुक उजेडात आणि दाटत चाललेल्या काळोखात त्यांचे चेहरेसुद्धा नीटपणे समजून घेता येत नव्हते. तरीसुद्धा त्यांच्या चेहर्‍यांवर आमच्याविषयी वाटणारी उत्सुकता होती हे मला स्पष्टपणे जाणवत होते.
या सर्व कष्टकरी जीवाना भेटायचे, त्यांच्याकडून माहिती गोळा करायची, त्यांना बोलतं करायचं तर ती वेळ तिन्हीसांजेचीच. बाहेरची कामे करून थकल्या-भागल्या जीवाला चुलीपुढे जायला थोडासा अवकाश असताना त्यांच्याशी संवाद साधायला मिळण्याची संधी ही तशी सुवर्णसंधीच असायची. सावी कंटाळली होती का जीवनाला? नाहीच. संसारात ज्याच्याशी सहजीवनाची गाठ बांधलेली तोच अट्टल दारूडा निघाला. पदरी पाच-सात पोरं, तीसुद्धा दीड-दोन वर्षांच्या अंतराने झालेली. ती तरणीताठी, सडपातळ, चाणाक्ष… तिच्या एकूणच देहयष्टीतून तिचं कोवळं सौंदर्य नजरेत भरत होतं. पण परिस्थितीमुळे आलेली असहाय्यता, त्याहीपेक्षा नवर्‍याचं व्यसन तिला आतून पोखरत होतं. पारंपरिक लोकसंकेतामध्ये गुरफटलेलं जीवन. त्यामुळे भाबडी भावुकता, संयमित जाणतेपण- जे वाट्याला आलं ते स्वीकारायचं. नशिबाचेच भोग आहेत, भोगायचेच. ते सांगणार तरी कोणाला? सामाजिक व्यवस्थेने जी स्थिर, अटल अशी एक चौकट स्त्रियांच्या जगण्याला आखून दिलेली आहे, त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग तरी कोठे होता? आणि तिने तो मार्ग शोधला असता तरीही तीच बदफैली ठरली असती. ही सावी प्रतिनिधित्व करते अशा अनेक सावींचे. ज्यांचे संसार आताच्या या क्षणीही उद्ध्वस्त होत आहेत. सावी ओढग्रस्तीचे जीवन जगते आहे. एक रात्र सरत आहे, दुसरा दिवस कसा उजाडणार याची शाश्‍वती नाही. तरीही चेहर्‍यावर आनंद पसरलेला दिसला. मी सावीला विचारले, ‘‘या अशा वेदनामयी परिस्थितीतही तू एवढी मनमोकळी, आनंदी कशी राहू शकतेस?’’ ती म्हणाली, ‘‘माझ्या ओठावरील ‘ओवी’ मला जगायला शिकवते.’’ या ओवीतूनच तिने आपल्या मनातील देवादिकांविषयीची श्रद्धा गुंफली आणि श्रम हलके केले. भावनांचे उमाळे दाटून येता परखड जीवनसत्याचा साक्षात्कार क्षणोक्षणी घडत जातो तो या अशा क्षणांनी.
‘सावी’ माझ्या लक्षात राहिली ती तिच्या हळव्या, कोवळ्या भावनिक बोलण्यामुळे. तिचा सभोवताल अनिश्‍चित होता. घराचा प्रत्येक कोपरा धुराने कोंदटला होता. अज्ञान, दारिद्य्र, अनिश्‍चितता, भाबडी भावुकता, श्रद्धा, परंपरेच्या मर्यादा, गुरे-वासरे, सण, उत्सव, घरकाम, बाहेरची-डोंगरदर्‍यातली कामे आणि यावर कळस म्हणूनच की काय नवर्‍याचे वाढत चाललेले व्यसन. मुलांचे संगोपन, शिक्षण तिला एकटीलाच करायला हवे होते. मी हलकेच तिचे निरीक्षण करत होते. पण ती कोठेच जीवनाला वीटली, कंटाळली आहे असं अजिबात मला वाटलं नाही. परिस्थितीने तिला मेटाकुटीला आणले होते खरे… पण ती स्वतः खमकी होती. सगळ्या परिस्थितीला पुरून उरेल एवढा खमका कणखरपणा तिच्यात होता. त्याला अनुभवाची जोड होती. त्यातून गवसलेलं जीवनचिंतन ही तिची आयुष्यभराची कमाई होती. सावीसारख्या, सावीपेक्षा परिस्थितीने सुस्थितीत असलेल्या कितीतरी जणींचे कुढणारे, सडणारे, पिचणारे संसार मी बघितले आहेत. मनातून उद्ध्वस्तही झाले. पण सावीसारखी एखाद-दुसरी असते जी धीर बांधते, वाट्याला आलेलं नकाराचं, उद्ध्वस्तपणाचं दुःख स्वीकारण्याचं- ते पचविण्याचंही तत्त्वज्ञान अवगत करते. सामाजिक चौकट विस्कळीत करून तिला स्वतःचे अस्तित्व वेगळे मानायचे नसते, उलट असीम दुःखात थोडंसं जरी सुख मिळालं तरी ते सुख ती मिरवत राहते. तिच्या मनाच्या वृत्तीमुळेच ती नवर्‍याविषयी सांगते- ‘फक्त दारू घेतली की तो राक्षस असतो, अन्यथा तो खूप चांगला माणूस आहे. आणि आपला माणूस काय कोणाला नकोसा होणार… शेवटी आपला माणूस तरी कोणाला म्हणायचे, ज्याच्या जीवावर मिरवतो त्यालाच ना?’ सावीच्या या उद्गारावर मी तरी तिला काय सांगणार होते?
कशी जगतात माणसे… संघर्ष, अडचणीला कशी सामोरी जातात? त्यांचे परिस्थितीमुळे कोलमडून जाणे, परत नव्याने उभारी घेणे, आयुष्यातील प्रत्येक प्रश्‍नाला भिडणे, त्यावर मात करूनही जगणे, खूप अस्वस्थ करते मन. सावी आणि सावीसारखेच अनेकींचे संसार पाहताना- एका बाजूला सगळी भौतिक सुखे हात जोडून दिमतीला असूनसुद्धा अनेकजणींना कोवळ्या जीवासकट मृत्यू कवटाळावासा वाटतो. जीवन खूपच कठीण आहे. भयानक प्रश्‍नचिन्ह समोर आ वासून उभे असताना मनाला निराशाच घेरून राहते आणि मग असे अविचारी कृत्य स्वतःच्याही नकळत घडते. महिलांच्यात वावरायला लागल्यापासून मी अशा अनेकींना जवळून अनुभवलेय. त्यांच्या भावना, संवेदनांचे जग त्यांच्या संसारात, पती-मुलांत गुंतलेले. हृदयाला खोलवर ढवळून काढणारं वास्तव त्या अगदी सहजतेने पचवताहेत. आज महिलांनी सर्वच क्षेत्रे गाजविली आहेत. असे एकही क्षेत्र राहिले नाही जिथे ती पोहोचली नसेल. स्त्री-कर्तृत्वाची ही उत्तुंग भरारी स्त्रीत्वाचा आत्मगौरवच आहे. पण मला तिची अशी ही बाजू आताच्या या एकविसाव्या शतकातसुद्धा जाणवत आहे. एक अतिव वेदनेचा, कष्टाचा, कारुण्याचा स्वर तिच्या मनातळात दडलेला आहे. कमरेला टॉवेल गुंडाळून, हातात धारदार विळा घेऊन ती सख्यासोबतीने डोंगर चढून इंधनासाठी लाकडे गोळा करते. एकमेकींना एका हाताने डोक्यावर भारा उचलण्यासाठी मदत करत स्वतःच्या डोक्यावरील ओझेसुद्धा हिमतीनेच सावरते. कधी विनोदी तर कधी खेळकर सुखद भाव अभिव्यक्त करणारी ती तेवढीच कणखर, लवचीक सामर्थ्य घेऊनच वावरते. अनेक दोष, उणिवा तिच्याही व्यक्तिमत्त्वाला वेढून आहेत हे मान्य करताना माझ्यातील अभ्यासक, चिंतक मला सारखा अस्वस्थ करत राहतो. अशी किती सावी असतील की ज्यांनी जगण्याचंच गाणं केलं असावं.