मगोची पहिली उमेदवारी यादी जाहीर

0
90

>> मुख्यमंत्रिपदी सुदिनच : दीपक

 

येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीत मगो-गोवा सुरक्षा मंच व शिवसेना युतीचेच सरकार स्थापन होईल. निवडणुकीनंतर भाजप असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, त्यांच्याबरोबर युती करावी लागली तरी मुख्यमंत्री म्हणून सुदिन ढवळीकर यांचेच नाव पुढे केले जाईल, असे मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपाने केंद्रातूनच नव्हे तर विदेशातून नेता आणला तरी काहीही फरक पडणार नाही, अशी खिल्ली त्यांनी उडवली.
मगो पक्षाने काल आपल्या १८ उमेदवारांची यादी जाहीर केली. उर्वरित मतदारसंघांसाठीची दुसरी यादी आज संध्याकाळपर्यंत किंवा सोमवारपर्यंत जाहीर करणार असल्याचे ढवळीकर यानी सांगितले. पणजी मतदारसंघात युतीला योग्य उमेदवार न मिळाल्यास एखाद्या प्रबळ उमेदवाराला पाठिंबा देण्याचा पर्यायही खुला आहे, असे मगो अध्यक्ष ढवळीकर व गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी सांगितले.
जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये मांद्रे – श्रीधर मांद्रेकर, पेडणे – बाबू आजगावकर, डिचोली – नरेश सावळ, म्हापसा – विनोद उर्फ बाळू फडते, शिरोडा – अभय प्रभू, वाळपई – विजय गांवकर, प्रियोळ – दीपक ढवळीकर, मडकई – सुदीन ढवळीकर, वास्को – मनेश आरोलकर, फोंडा – लवू मामलेदार, सांत आंद्रे – जगदीश भोबे, दाबोळी – प्रेमानंद नानोस्कर, कुडतरी – कोसेसांव डायस, फातोर्डा – दिलीप नाईक, नावेली – सत्यविजय नाईक, सावर्डे – दीपक पाऊसकर, सांगे – वासुदेव मेंग गांवकर तर कुंभारजुवे मतदारसंघात अपक्ष उमेदवार प्रसाद हरमलकर यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती ढवळीकर यांनी दिली.
गोसुमंचे ४ उमेदवार जाहीर
दरम्यान, गोवा सुरक्षा मंचाचे अध्यक्ष आनंद शिरोडकर यांनी आपल्या पक्षाचे चार उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात शिवोली – परेश रायकर, मये – आत्माराम गांवकर, साखळी – डॉ. सुरेश आमोणकर व कुडचडे – श्याम सातर्डेकर यांचा समावेश आहे.