महती मकर संक्रांतीची!

0
516

– सौ. मीरा निशीथ प्रभुवेर्लेकर

संक्रांतीचं स्वरूप वाण लुटण्यापुरतं मर्यादित न ठेवतां, स्त्रियांसाठी प्रबोधनात्मक असे कार्यक्रम आयोजित करणं समाजाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. प्रत्येकीनं वेगवेगळ्या दिवशी आपापला हळदीकुंकू कार्यक्रम करण्याऐवजी, वाड्या-वाड्यावरील कुटुंबांनी किंवा कोऑप. हाऊसिंग सोसाटीवाल्यांनी एक दिवस ठरवून सर्वांनी मिळून तो साजरा करावा.

आज शेजारी-पाजारी असलेल्या भिन्नधर्मीय महिलांनाही निमंत्रण दिलं जातं आणि इथेच सावित्रीबाईचा मूळ हेतू सफल होतोय ही बाब आनंददायी वाटते.

हिंदू धर्मात वर्षभर अनेक सणांचा सिलसिला चालूच असतो. प्रत्येक सण मनविण्यामागे काही एक उद्दिष्ट असते. त्या उद्दिष्टपूर्तीकरिता प्राचीन काळापासून काही पारंपरिक प्रथांचं प्रचलन पाळलं जातं. अशा सणांपैकीच मकर संक्रांत हा एक आहे.
सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो त्या दिवसाला मकर संक्रांत हे नाव आहे. ती पौष महिन्यात येते. या सणात तीळदानाला फार महत्त्व आहे. या दिवशी ब्राह्मणाला सुगड (गहू, ऊसाचे तुकडे, हळकुंड, कापूस, द्रव्य इ. वस्तूंनी भरलेलं) आणि तीळ दान करतात. नववधूच्या पहिल्या संक्रांतीसणाला तिला काळी चंद्रकळा नेसवून हलव्याच्या दागिन्यांनी मढवून तिच्याकरवी सवाष्णींना वाणं वाटली जातात. या तिच्या पहिल्याच हळदकुंकवाला इतर कोणतीही वस्तू न वाटता नारळाच्या अर्ध्या वाटीत पांच धान्यं, द्रव्य, हळद-कुंकू भरलेलं सुगडं ठेवून ते नारळाच्या दुसर्‍या वाटीने झाकून प्रदान करण्याची प्रथा आहे. पुढील वर्षापासून ती कोणतंही वाण वाटूं शकते. महाराष्ट्रामध्ये जावयालाही तिळगूळ आणि अहेर पाठवण्याची रीत आहे. निरनिराळ्या प्रदेशात विविध प्रकारचे पक्वान्न करण्याची पद्धत आहे. गोव्यात तिळगूळ आणि तीळाचे लाडू करतात.
हा सण मनवण्याच्या कारणाच्या कित्येक पौराणिक कथा सांगितल्या गेल्या आहेत. बालपणात आम्हाला त्या ऐकवल्या होत्या. संक्रांतीला देवता मानून तिचं असं वर्णन केलेलं आहे – साठ योजने पसरलेली, लांब ओठ, दीर्घ नासिका, एक तोंड आणि नऊ हात असलेली ही पुरुषाच्या आकृतीसारखी दिसते. असं मानलं जातं की संक्रांत ज्या वस्तूचा स्वीकार करते ती वस्तू महाग होते. ती ज्या दिशेकडून येते त्या दिशेला समृद्धी होते आणि ज्या दिशेकडे जाते व पाहते त्या दिशेला उत्पात होतो असं मानतात. संक्रांतीने संकटासूर नावाच्या दैत्याचा वध केला तो दिवस संक्रांत आणि दुसर्‍या दिवशी किंकटासुराचा वध केला म्हणून तो किंक्रांत.
साजर्‍या केल्या जाणार्‍या सर्व सणांत लहान-मोठे, वृद्ध-तरुण, स्त्री-पुरुष सर्वांचाच उत्साहपूर्ण सहभाग असतो हे आपण पाहतो. परंतु संक्रांत हा एकच सण असा वाटतो की जो खास स्त्रियांचा, स्त्रियांसाठी आणि स्त्रियांद्वारेच मनवला जातो. भरजरी साड्या नेसून सालंकृत होऊन मिरवण्याची स्त्रियांची हौस हा हळदकुंकू समारंभ पुरी करतो, असं म्हटल्यास ते चुकीचं ठरू नये. दुसरं, हल्ली सर्वच बायका अर्थार्जनासाठी घराबाहेर असतात. त्यांना तसा वेळ हा अभावानेच मिळतो. त्यामुळे स्त्रियांच्या घोळक्यात घोळण्याची न मिळणारी संधीही हाच समारंभ त्यांना प्राप्त करून देतो. कारण कपाळाला कुंकू लावून घेण्याचं निमंत्रण टाळणं हे बहुतेकांना अपशकुनी वाटत असतं. वेळांत वेळ काढून रात्रीच्या वेळीही समारंभाच्या ठिकाणी पाय लावून आलं की त्यांना सुशेगादसं वाटतं. कधी नव्हे त्या अनेकांच्या भेटी इथंच घडतात. त्यामुळे मनाची मरगळ गळून टवटवीत वाटतं.
आजच्या सौभाग्यवती ‘मुली’ जीन्स किंवा चुडीदारवर कुंकू लावणं हे फॅशनबाह्य समजतात आणि कपाळ बिनकुंकवाचं ठेवतात. असं असलं तरीही प्रत्येक विवाहित स्त्रीसाठी सर्वांत मोठा अलंकार असतो तो म्हणजे कपाळावरचं (अदृश्य) कुंकूच म्हणजे त्यांचं सौभाग्य!! एकमेकांच्या घरी जाऊन वाण लुटण्याचा हा सण मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत मनवला जातो. ‘तिळगूळ घ्या गोड बोला’ असं म्हणत, जुनी भांडणं, मनातील किल्मिषं दूर झटकली जाऊन पुनश्च स्नेह निर्माण करण्याची संधी देणारा हा संक्रांतीचा सण… अशी मुळांत त्याची महती आहे.
थोर समाजसेविका सावित्रीबाई फुले यांनी १८५२ साली पुण्यामध्ये जो तिळगूळ समारंभ घडवून आणला होता त्याचा उद्देश फार व्यापक होता. हा हिंदूंचा सण असला तरी वेगवेगळ्या धर्माच्या महिलांना निमंत्रित करून, सर्वधर्मसमभाव जागृत करणे हेच त्यांचं ईप्सित होतं. त्या काळात पुण्याच्या कलेक्टरसाहेबांच्या यजमानीणबाई मिसेस जोन्स यांच्या अध्यक्षपदाखाली हा तिळगूळ समारंभ घडवून आणला होता. जातिभेद, धर्मभेद नष्ट करण्याकरिता सुरू केलेल्या या समारंभाला आज वेगळंच रूप आलेलं दृष्टीस पडतं.
आजच्या आधुनिक युगात या समारंभाच्या निमित्ताने श्रीमंतीचं प्रदर्शन करण्याचा रोग जडलाय असं दिसतं. आर्थिक बळ नसतानाही पोकळ बडेजाव दाखवण्यासाठी प्रसंगी कर्ज देऊनही हा समारंभ साजरा करणारी मंडळी आहेत. त्याचप्रमाणे ‘यंदा तुझं वाण ‘वजनदार’ असेल तर पुढल्या वर्षी त्याहून ‘वजनदार’ माझं असेल’ अशी चुरसेची कीड काहीजणांमध्ये वर्षी त्याहून ‘वजनदार’ माझं असेल’ अशी चुरसेची कीड काहीजणांमध्ये वळवळताना दिसते. हे नष्ट व्हायला पाहिजे असं मला वाटतं. एक गोष्ट मात्र उल्लेखनीय वाटते ती ही की आज शेजारी-पाजारी असलेल्या भिन्नधर्मीय महिलांनाही निमंत्रण दिलं जातं आणि इथेच सावित्रीबाईचा मूळ हेतू सफल होतोय ही बाब आनंददायी वाटते. यापुढेही जाऊन विशाल दृष्टिकोन बाळगून विधवांनाही यामध्ये सहभागी करून घेऊन या समारंभाचं साजरेपण अधिक व्यापक करावं अशी सूचना करावीशी वाटते. मुंबई-पुण्यासारख्या शहरांत याची सुरुवात बर्‍याच वर्षांपूर्वीपासून झाल्याचे वाचनांत आले होते.
संक्रांतीचं स्वरूप वाण लुटण्यापुरतं मर्यादित न ठेवतां, स्त्रियांसाठी प्रबोधनात्मक असे कार्यक्रम आयोजित करणं समाजाच्या दृष्टीने हितकारक ठरेल. प्रत्येकीनं वेगवेगळ्या दिवशी आपापला हळदीकुंकू कार्यक्रम करण्याऐवजी, वाड्या-वाड्यावरील कुटुंबांनी किंवा कोऑप. हाऊसिंग सोसाटीवाल्यांनी एक दिवस ठरवून सर्वांनी मिळून तो साजरा करावा. त्या दिवशी चांगला सोपासा विषय निवडून कुणालाही उत्स्फूर्तपणे चार शब्द त्यावर बोलायला लावणं किंवा त्यांच्या पुस्तकातील उतार्‍याचं स्वच्छ उच्चारात वाचन करणं, कविता-वाचन करणं, आपण केलेल्या सहलीविषयी दहा-पंधरा वाक्य लिहिणं, म्हणींचा खेळ खेळणं, सामाजिक समस्यांवर तोडगा काढणं, आपली मतं प्रकट करणं असं बरंच काही सुरू करता येईल. यातून सुशिक्षित असूनही वाचनात ठप्प होऊन आपल्या जीवन-पुस्तकांतच गुंतून राहणार्‍या स्त्रियांना काहीतरी रस वाटू लागेल, विचार परिवर्तन होईल, समाजात काय चाललंय याचं भान येईल. अन्यथा केवळ त्या वस्तू जमवून आणि नाका-डोळ्यांत जाईपर्यंत कपाळभर हळद-पिंजर सारवून घेण्याला काय अर्थ राहील??
सणाच्या निमित्ताने सौंदर्य, ऐश्‍वर्य मिरवण्याबरोबरच थोडंसं बुद्धिचातुर्यही गिरवा ना! महागड्या वस्तू जमवून घरांत त्या बिनवापरात पडून राहतात. त्यांपेक्षा वाड्यावरील किंवा सोसायटीतील स्त्रियांनी वाणासाठी लागणारा खर्च एकत्र करून त्यांतून उत्तम जीवनोपयोगी किंवा बुद्धिविकासाची पुस्तकं खरेदी करावीत आणि ती प्रत्येक स्त्रीकडे नियोजन पद्धतीने आळीपाळीने वाचण्यास दिली जावीत. वर्षावर्षाने या पुस्तकांमध्ये भर पडत जाईल आणि सोसायटीचं एक स्वतंत्र वाचनालय उदयास येईल. या उपक्रमामुळे मकर-संक्रांत सुरू करण्याच्या मूळ उद्देशाला अजून जोड मिळेल असं मला वाटतं. अर्थातच अजून बरेच काही करण्यासारखं आहे. आपण विचार करत जाऊ तसतशा आपल्या मनात अधिकाधिक समाजोपयोगी उपक्रमांची गर्दी होत जाईल. फक्त कुणीतरी म्हणजे काही मोजक्या स्त्रियांनी पुढाकार घेऊन हे करून बघायला पाहिजे, हो ना!!