‘‘२२ वा गोवा युवा महोत्सव २०१७’’

0
138

– अन्वेशा सिंगबाळ

कोंकणी भाषा मंडळ, सरकारी महाविद्यालय साखळी, रवींद्र भवन साखळी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार व रविवारी (१४ व १५ जानेवारी रोजी) आयोजित करण्यात आलेल्या २२ व्या गोवा युवा महोत्सवासाठी साखळी येथील सरकारी महाविद्यालय मैदान व रवींद्र भवन परिसर सज्ज झालेला आहे. यावर्षी या महोत्सवात दोन्ही दिवस गोव्यातील १० हजार लोकांची उपस्थिती असेल. त्यानिमित्त हा लेखन प्रपंच….

एलएलबीच्या पहिल्याच वर्षी सावईवेरे येथे झालेल्या गोवा युवा महोत्सवात मी पहिल्यांदा सहभागी झाले. पहिल्यांदाच युवा महोत्सवाचे ते भव्य दिव्य स्वरूप अनुभवले अन् मी त्याच्या प्रेमात पडले. तिथे ओसंडून वाहणारे ते सळसळते रक्त, ते चैतन्य पाहून मी भारावून गेले. मात्र ज्या युवा महोत्सवाच्या उंबरठ्यावर एक स्पर्धक म्हणून मी ठेपले होते त्या एवढ्या भव्य आयोजनाचा एक दिवस भाग होईल याचा मी स्वप्नातसुद्धा कधी विचार केला नव्हता. पण ते घडले आणि कोणे एके काळी म्हणजे हिरो-हिरोईन बनलेले युवा महोत्सवाच्या आयोजनातले ते स्टार आज माझे जवळचे मित्र-मैत्रीणी बनले.

२००४ आणि २००५ अशी सलग दोन वर्षे मी स्पर्धक म्हणून गोवा युवा महोत्सवाच्या महोत्सवात पाय ठेवला. नाही म्हटले तरी अर्धवट, अपूर्ण असा तो अनुभव. एक दिवस जायचे, काहीतरी सादर करायचे आणि परत यायचे. मनात, हृदयात खूप काही असतानाही कुठेतरी कमी होतीच. त्या दोन वर्षांत मी मनसोक्तपणे त्या अनोख्या विश्‍वाचा रस प्यायला मुकले. पण २००६ साली आयुष्यात आलेल्या वादळाने सगळे काही बदलले… म्हणजे बाबा वारले. मात्र वैयक्तिक पातळीवर आलेल्या त्या पोकळीने स्वतःला पोखरू न देता, आयुष्यातील नवी स्वप्ने, नवी शिखरे पोखरायला सुरुवात केली आणि त्या नव्या सुरुवातीला कोंकणी साहित्य, कोंकणी जग आणि अर्थात युवा महोत्सवाने खूप काही दिले.
२००६ सालचा युवा महोत्सव चुकला मात्र त्याचा आस्वाद सावईवेरेत कानावर पडलेल्या सख्येहरी पथकाच्या विजयोत्सवातील ढोल ताश्यांच्या आवाजाने पुरवला. २००७ साली हळूहळू गाडी रुळावर येऊ लागली पण त्या वर्षीही राष्ट्रीय स्तरावर एका स्पर्धेत भाग घेण्यासाठी मी गोव्याबाहेर गेले. २००८ साली मात्र सांगे तालुक्यात झालेल्या युवा महोत्सवाने माझ्या जीवनात नवे रंग भरले. ‘‘युवा-दी- गोवा’’ या पथकातून मी युवा महोत्सवात सहभागी झाले. आणि एका नव्या प्रवासाला सुरवात झाली.
तिथून नंतर २००८ साली उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन, तद्नंतर खांडेपार येथील युवा महोत्सवाच्या आयोजनांत सक्रीय सहभाग आणि आज गोवा-युवा महोत्सवाच्या आयोजनात भला मोठा पहाड…
स्पर्धक असताना नीही कितींदा आयोजकांवर संशय व्यक्त केला. परिक्षकांबद्दल नाराजगी दाखवली… पण आज कळतंय काय सत्यस्थिती आहे ते! युवा महोत्सवाचा शिवधनुष्य पेलणे म्हणजे काय असते! आणि काय असते निरर्थक आरोप सहन करणे… युवा महोत्सवात स्पर्धक म्हणून सहभागी होताना कुठे माहीत होती आजोयनामागील भूमिका… कुठे माहीत होती त्यामागील संकल्पना… तिथे फक्त माहीत होते जिंकणे, विजयोत्सव मनवणे!! आज कळते काय होते त्यामागचे ध्येय?
युवा महोत्सवाच्या आयोजनात नाविन्य, सुधारणा आणणे हे आयोजकांचे दर वर्षीचे ध्येय आणि ते ध्येय आपल्या परीने बजावत असतात. मात्र हे करताना ज्या ध्यासाने हे आयोजन सुरू झाले होते तो नाहीसा होता कामा नये हा विचार कोंकणी भाषा मंडळाच्या सदस्यांमध्ये चालूच असतो. युवा महोत्सव ही संकल्पना फख्त स्पर्धेपुरतीच मर्यादित असती तर कदाचित हा विचार करणे गरजेचेही नसते. मात्र तसे नाही आणि म्हणूनच गोवा युवा महोत्सव वेगळा आणि खास आहे…
पहिल्या दिवशी दि.१४ रोजी सकाळी १० वा. महोत्सवाचे उद्घाटन उद्योजक नंदन कुडचडकर यांच्या हस्ते तर १५ रोजी सायंकाळी ५.३० वा. महोत्सवाचा बक्षिस वितरण सोहळा होईल. या सोहळ्यास डॉ. सरोज प्रकाश देसाई उपस्थित राहतील. यंदा महोत्सवात ‘गोव्याची अस्मिता’ हा विषय गाजणार आहे. महोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी अस्मिता चळवळीत सहभागी साहित्यिक ऍड. उदय भेंब्रे, सदानंद काणेकर, शेख हनीफ यांची मुलाखत घेतली जाईल. तसेच ‘भविष्यातील गोव्याची अस्मिता’ या विषयावर चर्चासत्र होईल. यात राजभाषा खात्याचे संचालक डॉ. प्रकाश वझरीकर, ज्येष्ठ पत्रकार संदेश प्रभुदेसाई, इतिहास संशोधक प्रजल साखरदांडे सहभागी होतील. डॉ. भूषण भावे व सत्यवान नाईक हे त्यांच्याशी संवाद साधतील. त्याशिवाय यामध्ये प्रश्‍नमंच, गीत गाताना…, नाच नाच नाचूया, मुस्तायकी या स्पर्धा महोत्सवाचे आकर्षण असणार आहेत.