भाजपची २९ व कॉंग्रेसची २७ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

0
103

गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या २९ उमेदवारांची पहिली यादी पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीनंतर काल समितीचे सचिव जे. पी. नड्डा यांनी नवी दिल्लीत जाहीर केली. पक्षाच्या १८ विद्यमान आमदारांचा या यादीत समावेश आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचीही उमेदवारी जाहीर करण्यात आली असली तरी ते यावेळी मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असतील असे पक्षाने जाहीर केलेले नाही.

गेले अनेक महिने आजारी असलेले सांत आंद्रेचे आमदार विष्णू सूर्या वाघ यांच्या जागी त्यांचे भाऊ रामराव नाईक वाघ यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. मडगावमधून शर्मद रायतूरकर, पर्वरीतून गुरुप्रसाद पावसकर, सांताक्रुझमधून हेमंत गोलतकर, मडकईतून प्रदीप शेट, फातोर्ड्यातून दामोदर नाईक यांच्या नावांची घोषणाही यावेळी करण्यात आली. नुकतेच कॉंग्रेसमधून भाजपात आगमन झालेले पांडुरंग मडकईकर यांना कुंभारजुव्यातून आणि मावीन गुदिन्हो यांना दाबोळीतून उमेदवारी देण्यात आली आहे.
पक्षाने सर्व समुदायांना उमेदवारी देताना योग्य प्रतिनिधित्व दिले असल्याचा दावा श्री. नड्डा यांनी यावेळी केला. गोव्यातील सर्वच्या सर्व चाळीस जागा लढवण्याचा पक्षाचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले.उत्तर प्रदेश पोटनिवडणुकीसाठी आणि पंजाब विधानसभा निवडणुकीसाठीच्या उमेदवारांची यादीही त्यांनी यावेळी जाहीर केली.
दरम्यान, मये व काणकोणसह उर्वरित ११
उमेदवारांची नावे येत्या दोन दिवसांत जाहीर करणार असल्याची माहिती भाजपचे गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. काणकोण व मये मतदारसंघातील उमेदवारीच्या प्रश्‍नावर भाष्य करण्यास त्यांनी नकार दिला.
दुसरीकडे, कॉंग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी २७ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. पक्ष सरचिटणीस मधुसूदन मिस्त्री यांनी ही यादी जाहीर केली. सहा विद्यमान आमदारांना त्यात पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मावीन गुदिन्हो आणि पांडुरंग मडकईकर यापूर्वीच भाजपमध्ये गेले आहेत, तर बाबूश मोन्सेर्रात यांच्या पक्षातून हकालपट्टीनंतर त्यांनी युनायटेड गोवन्सतर्फे पणजीतून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे.
मडगावातून दिगंबर कामत, ताळगावमधून जेनिफर मोन्सेर्रात, केपे येथून चंद्रकांत ऊर्फ बाबू कवळेकर, पर्येमधून प्रतापसिंग राणे, वाळपईतून त्यांचे पुत्र विश्‍वजीत राणे, कुडतरीतून आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पक्षाने यावेळी काही नवे चेहरेही रिंगणात उतरवले असून त्यात बाबू कवळेकर यांच्या पत्नी सावित्री कवळेकर यांना सांगेमधून निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले आहे. कॉंग्रेस प्रवेश केलेले भाजपचे माजी आमदार दयानंद सोपटे यांना मांद्रेमधून मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या विरोधात उमेदवारी देण्यात आली आहे.
गोवा प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो स्वतः नावेलीतून निवडणूक लढवणार आहेत. माजी मंत्री सुभाष शिरोडकर यांना शिरोड्यातून, रवी नाईक यांना फोंड्यातून, नीळकंठ हळर्णकर यांना थिवीमधून तर फिलीप नेरी रॉड्रिग्स यांना वेळ्ळीतून उमेदवारी देण्यात आली आहे. २०१२ च्या निवडणुकीत हे चारही नेते पराभूत झाले होते.
गेल्यावेळी कॉंग्रेसची उमेदवारी मिळूनही पराभूत
झालेल्या नेत्यांपैकी मनोहर शिरोडकर (डिचोली), फ्रान्सिस सिल्वेरा (सांत आंद्रे), संकल्प आमोणकर (मुरगाव) यांना यावेळी पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.
इजिदोर फर्नांडिस यांना काणकोणची उमेदवारी
देण्यात आली आहे. ज्या नव्या चेहर्‍यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे, त्यात विकेश हसोटीकर (पेडणे), धर्मेश सगलानी (साखळी), फ्रान्सिस नुनीस (दाबोळी), गिल्बर्ट रॉड्रिग्स (कुठ्ठाळी), विल्फ्रेड डिसा (नुवे), क्लाफासियो डायस (कुंकळ्ळी), रुझारियो फर्नांडिस (कुडचडे) व शंकर किर्लपालकर (सावर्डे) यांचा समावेश आहे. चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी सावित्री यांना सांगेतून उमेदवारी देण्यात आली आहे.