मगो, गोसुमं, शिवसेना युती ३७ मतदारसंघांमध्ये लढणार

0
105

>> युतीची अधिकृत घोषणा

 

येत्या दि. ४ ङ्गेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी काल मगो, गोवा सुरक्षा मंच व शिवसेना यांनी अधिकृतपणे युतीची घोषणा केली. किमान समान कार्यक्रमाचे सूत्र घेऊन राज्यातील ३७ मतदारसंघांतून निवडणूक लढविण्याचा निर्णय युतीचे समन्वयक प्रा. सुभाष वेलिंगकर, मगो नेते सुदिन ढवळीकर व शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केला.
युतीचे सरकार स्थापन करण्यासाठीचे नेतृत्व मगो नेते तथा माजी साबांखा मंत्री सुदिन ढवळीकर हे नव्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणून करतील. त्यासंबंधीचे सर्व अधिकार ढवळीकर यांना दिल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी जाहीर केले. परंतु निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपबरोबर जाणार नाही, असे सांगण्यास ढवळीकर यांनी नकार दिला. सध्याच्या राजकीय परिस्थितीत कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळणे कठीण आहे. जनतेने युतीच्या बाजूने कौल दिल्यास हा प्रश्‍नच उद्भवणार नाही, असे ते म्हणाले. तत्त्वांच्या लढाईसाठीच आपल्या पक्षाने भाजपची साथ सोडल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर १३३ इंग्रजी माध्यमातील प्राथमिक शाळांचे अनुदान रद्द करणे हा किमान समान कार्यक्रमातील प्रमुख व पहिला मुद्दा असल्याचे प्रा. वेलिंगकर यांनी सांगितले. समान
किमान कार्यक्रम लवकरच जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
साळगाव, थिवी, कुंकळ्ळी व मुरगाव हे मतदारसंघ शिवसेनेला तर शिवोली, पणजी, मये, साखळी, कुडचडे, वेळ्ळी या मतदारसंघात मंचचे उमेदवार निवडणूक लढवतील. उरलेले मतदारसंघ मगो लढवणार अशी माहिती त्यांनी दिली. प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी कोणतेही विधान केले तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा एकही सदस्य या निवडणुकीत भाजपला मत देणार नाही असा विश्‍वास आहे प्रा. वेलिंगकर यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपचे सध्याचे शैक्षणिक धोरण राष्ट्रीय धोरणाच्या विरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला. या निवडणुकीत राजकारणातील रावणांचा राजकीय वध होणार असे सेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी सांगितले. त्यांनी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यावर प्रखर टीका केली. पत्रकार परिषदेस मगो अध्यक्ष दीपक ढवळीकर, आमदार लवू मामलेदार, गोवा सुरक्षा मंचचे अध्यक्ष आनंद शिरोडकर, रत्नाकांत म्हार्दोळकर, आपा तेली, प्रताप ङ्गडते आदी उपस्थित होते.

नवडणुकीनंतर भाजपशी युतीप्रश्‍नी सुदिनचे मौन

निवडणुकीनंतर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपबरोबर जाणार नाही, असे सांगण्यास सुदिन ढवळीकर यांनी नकार दिला. या प्रश्‍नावर सारवासारव करताना त्याविषयी आपण आताच काही सांगू शकत नाही. काहीवेळा राजकारणात चाणक्यनीती वापरावी लागते असे ते म्हणाले. यावेळी सहज बोलताना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर त्यांनी स्तुतीसुमने उधळली. मात्र, मंत्रिमंडळातून डच्चू दिल्याने मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचा समाचार घेण्यास ते विसरले नाहीत.