मगो पक्ष विलीन केल्यास मुख्यमंत्रिपदाचा होता प्रस्ताव

0
103

>> सुदिन ढवळीकर यांचा गौप्यस्फोट

 

मगो पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या अटीवर एकदा कॉंग्रेस पक्षाने, तर एकदा भारतीय जनता पक्षाने आपल्यापुढे मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु आपण स्वहितापेक्षा पक्षहित नजरेसमोर ठेवून दोन्ही वेळा तो फेटाळल्याचा दावा मगो नेते सुदिन ढवळीकर यांनी काल केला.
२००५ साली कॉंग्रेस पक्षाने आपल्याला मगो पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन करण्याच्या अटीवर मुख्यमंत्रिपद देऊ केले होते, तर भाजपचे नेते मनोहर पर्रीकर यांनी नवी दिल्लीत संरक्षणमंत्री म्हणून सूत्रे हाती घेण्यास जाण्यापूर्वी मगो पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याच्या अटीवर आपल्याला मुख्यमंत्रिपद देऊ केले होते, असेही ढवळीकर यांनी सांगितले.
कॉंग्रेसमध्ये साठ वर्षे वयाचे आठ नेते असून ते निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत, अशी टीका यावेळी ढवळीकर यांनी केली व याउलट मगो पक्षाने युवकांना उमेदवारी दिलेली आहे. आमचे जे २२ उमेदवार आहेत, ते ४० ते ५५ या वयोगटातील असल्याचे ढवळीकर म्हणाले.
आपण नुकतीच साठ वर्षे पूर्ण केली असून वयाच्या सत्तरीपूर्वी आपण राजकारण संन्यास घेणार असल्याचेही ढवळीकर यांनी सांगितले.
दरम्यान, मगो पक्षात प्रवेश केलेले अपक्ष आमदार नरेश सावळ यांनी भाजप आणि कॉंग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोन्ही पक्षांनी जनतेचा भ्रमनिरास केल्याने आता मगोविना पर्याय उरलेला नाही असे प्रतिपादन केले. मगो पक्ष राज्यात सत्तेवर यावा यासाठी कार्यकर्ते काम करणार असल्याचे ते म्हणाले.
मगो पक्ष ढवळीकर बंधूंच्या दावणीला बांधलेला असल्याचा आरोप काहीजण करीत असल्याचे सांगून सावळ म्हणाले की, ढवळीकर बंधूंनी आपल्या सहकार्‍यांच्या मदतीने पक्षकार्य पुढे नेले व पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले.
राज्यात पस्तीस हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजपाने केला होता, ते पस्तीस हजार कोटी कुठे गेले असा सवाल यावेळी ढवळीकर यांनी उपस्थित केला. खाण घोटाळा किती कोटींचा हेही सांगायला भाजप नेते तयार नसल्याचे ढवळीकर म्हणाले.