राजू सुकेरकर यांना पणजीत उमेदवारी

0
93

गोवा सुरक्षा मंचने पणजी मतदारसंघातून कृष्णराज उर्फ राजू सुकेरकर यांना उमेदवारी दिल्याचे काल पक्षाचे आनंद शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. गोवा सुरक्षा मंच, मगो, शिवसेना युतीचे उमेदवार आज (मंगळवारी) जाहीर करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

जमीनदार असलेले कृष्णराज सुकेरकर हे एक अजातशत्रू असून समाजकारणातून त्यांनी राजकारणात प्रवेश केल्याचे यावेळी बोलताना शिरोडकर यांनी स्पष्ट केले. गोवा सुरक्षा मंंचची उमेदवारी त्यांनी स्वीकारावी यासाठी पक्षाला त्यांना आग्रह करावा लागल्याचे ते म्हणाले. सुकेरकर ही एक चारित्र्यवान व निष्कलंक अशी व्यक्ती असून अशा व्यक्तींना उमेदवारी मागावी लागत नाही. त्यांनी उमेदवारी स्वीकारावी यासाठी त्यांना आग्रह करावा लागतो, असे शिरोडकर म्हणाले.

पक्षाचा विजय निश्‍चित : सुकेरकर
यावेळी बोलताना कृष्णराज सुकेरकर म्हणाले की, गोवा सुरक्षा मंचला जो पाठिंबा मिळत आहे तो पाहिल्यास पक्षाचा विजय निश्‍चित आहे याबद्दल कुणाच्याही मनात दुमत नाही. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याशी असलेल्या मैत्रीविषयी त्यांना विचारले असता ते म्हणाले की, मैत्री एके ठिकाणी आणि राजकारण एके ठिकाणी. पर्रीकर यांच्या मुलाच्या उद्योगधंद्यात तुम्ही त्यांचे भागीदार होता हे खरे आहे का, असे विचारले असता आपण आता त्याचा भागीदार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.