पोर्तुगालच्या प्रधानमंत्र्यांनी गोमंतकीयांची माफी मागावी

0
111

>> मगो, गोवा सुरक्षा मंच पक्षांची मागणी

 

गोव्याच्या भेटीवर येणार असलेले पोर्तुगालचे प्रधानमंत्री आंतोनियो कॉस्ता यांनी गोव्यातील पोर्तुगीज राजवटीत गोमंतकीयावर जो धर्मच्छळ करण्यात आला त्यासंबंधी गोमंतकीयांची माफी मागावी, अशी मागणी काल मगोचे ज्येष्ठ नेते सुदिन ढवळीकर व गोवा सुरक्षा मंचचे नेते तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुभाष वेलिंगकर यांनी केले.
पोर्तुगीज राजवटीत गोव्यात कित्येक स्वातंत्र्यसैनिकांना कंठस्नान घालण्यात आले. कित्येकांना वर्षांनुवर्षे तुरुंगात डांबून ठेवण्यात आले. येथील मंदिरांची मोडतोड करण्यात आली. लोकांचे धर्मांतर करण्यात आले. गोव्यातून काढता पाय घेताना पुलांची मोडतोड करण्यात आली. या सगळ्या दृष्कृत्यांसाठी कॉस्ता यांनी माफी मागावी, असे वेलिंगकर म्हणाले.
बंद करण्यात आलेला फोंताईश महोत्सव आता पुन्हा सुरू करण्याचेही घाटत असल्याचे सांगून कॉस्ता हे ही आपली कौटुंबिक स्वरुपाची भेट असल्याचे म्हणत असले तरी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर या भेटीमागे काही तरी शिजत असावे, असा संशयही वेलिंगकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

कॉस्ता यांनी माफी
मागावी : सुदिन
गोव्याच्या भेटीवर येणार असलेले पोर्तुगालचे प्रधानमंत्री आंतोनियो कॉस्ता यांनी गोव्याच्या जनतेची माफी मागावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. पोर्तुगीज राजवटीत गोव्यातील जनतेवर खूप अत्याचार झाले. धार्मिक छळ झाला. गोमंतकीय संस्कृती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. या सर्वांसाठी पोर्तुगालच्या प्रधानमंत्र्यांनी माफी मागण्याची गरज असल्याचे मगो नेते सुदिन ढवळीकर म्हणाले.