थोडी प्रतीक्षा!

0
121

गोवा विधानसभेची निवडणूक जसजशी जवळ येत चालली आहे, तसतसे मतदारसंघांमधील वातावरण तापू लागल्याचे दिसते आहे. काही मतदारसंघांमध्ये विविध पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एव्हानाच दिसू लागलेला संघर्ष चिंताजनक आहे. येणारी निवडणूक अटीतटीची ठरणार असली, तरी त्याचे अशा प्रकारचे शारीरिक पातळीवरील पडसाद उमटू नयेत याची काळजी सुरक्षा यंत्रणांना घ्यावी लागेल. गोवा राज्य उत्साही आणि शांततापूर्ण मतदानासाठी प्रसिद्ध आहे. काही मतदानकेंद्रे भले संवेदनशील जाहीर केली जात असली, तरी सहसा कोणत्याही विपरीत प्रसंगाविना शांततापूर्ण मतदान ही गोव्याची परंपरा राहिली आहे. त्यामुळे येणार्‍या निवडणुकीत विविध पक्षांच्या उमेदवारांमधील तेढ प्रत्यक्ष हातघाईच्या संघर्षाचे रूप घेणार नाही याची खबरदारी घ्यावी लागेल असे दिसते. निवडणुका जाहीर झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानापर्यंत फारच कमी कालावधी राजकीय पक्षांना यावेळी लाभला आहे. मतदान लवकर होणार असल्याने मुख्यत्वे विरोधी पक्षांना त्याची झळ बसलेली आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार अजून निश्‍चित झालेले नाहीत. इतरांशी हातमिळवणी करून निवडणुकीला सामोरे जाण्यासंदर्भातही काही विशेष प्रगती झालेली दिसत नाही. पक्षाच्या दिल्लीस्थित श्रेष्ठींनी स्थानिक घडामोडींकडे जेवढे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे होते, तेवढे ते दिले गेलेले दिसत नाही. दुसरीकडे, सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष यांच्यातील युती फुटल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत सत्ताधारी भाजपाला एकहाती ही निवडणूक लढवावी लागणार असली, तरी विरोधकांमध्ये एकजूट नसल्याने त्यातून होणार असलेल्या मतविभाजनाचा फायदा तो मिळूव इच्छितो. मगो पक्षाने या निवडणुकीत अनेक वर्षांनंतर प्रथमच आपल्या महत्त्वाकांक्षेचा वारू चौफेर उधळत ठेवलेला आहे. सुदिन ढवळीकर यांची मुख्यमंत्रिपदासाठी दावेदारी पुढे करून मगो गोवा सुरक्षा मंचाला सोबत घेऊन सत्तास्थापनेचे स्वप्न पाहतो आहे. जागावाटपासंदर्भातील सध्या असलेले काही मतभेद संपुष्टात आले तर ही कडवी जोडगोळी भाजपाच्या मतांवर डल्ला मारण्याचा पुरेपूर प्रयत्न करील. या निवडणुकीत प्रथमच आम आदमी पक्ष आपले भाग्य आजमावणार आहे. दिल्लीतील विजयाची पुनरावृत्ती गोव्यात करण्याच्या गमजा करणार्‍या आपने घरोघरी प्रचाराच्या फेर्‍या पूर्ण केल्या असल्या, तरी गोव्याचा मतदार हा पर्याय स्वीकारणार का याबाबत प्रश्नचिन्ह आहे. माध्यमांवर आगपाखड करण्याऐवजी आप नेत्यांनी आपल्या धोरणात्मक बाबी अधिक बळकट केल्या तर बरे होईल. एकूण या रणधुमाळीला आता रंग चढू लागला आहे. परवा निवडणुकीची अधिसूचना निघेल. म्हणजे उमेदवारी अर्ज भरायला सुरूवात होणार असल्याने मतदारसंघवार एकूण रागरंग हळूहळू स्पष्ट होत जाईल. मात्र, यावेळी बहुतेक मतदारसंघांत बहुरंगी लढती होतील असे दिसते आहे. या सार्‍या मंथनातून एकपक्षीय स्थिर सरकार राज्यात सत्तेवर येणे ही खरी गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत त्रिशंकू स्थिती गोव्याला परवडणार नाही. नव्वदच्या दशकातील राजकीय अस्थिरतेच्या खाईत गोव्याला पुन्हा लोटून चालणार नाही. लवकरच विविध पक्षांच्या प्रचारसभांची धामधूम सुरू होईल. राष्ट्रीय नेत्यांची लगबग वाढेल. विविध क्षेत्रांत केलेला विकास, आर्थिक लाभाच्या योजना आदीं सत्ताधारी, तर भ्रष्टाचारापासून माध्यमापर्यंतच्या विषयांना विरोधक ऐरणीवर आणतील. या सार्‍या धुमश्चक्रीअंती गोमंतकीयांच्या हाती काय लागणार हा खरा प्रश्न आहे. संभ्रमित करणारे दावे – प्रतिदावे आणि आरोप – प्रत्यारोप यातून प्रत्येकाला निर्णय घ्यावा लागणार आहे. अर्थात, चित्र पुरते स्पष्ट होण्यासाठी अजून थोडी प्रतीक्षा आवश्यक आहे!