देशभक्तीसाठी मतभेद विसरा : ब्रह्मेशानंदस्वामी

0
98

>> तपोभूमीवर ‘वंदे मातरम्’ सोहळ्याला लोटला वीराट जनसमुदाय

>> सैनिक निधीसाठी संप्रदायातर्फे ६ लाख

भूमाता प्रत्येकावर प्रेम करीत असली तरी देशवासियांच्या मनात अजूनही मातृभूमीविषयी संभ्रम आहे. देश सांभाळताना इतिहास व संस्कृती पुढे नेण्याची नितांत गरज आहे. प्रत्येकाने मनातील देशभक्ती मोठी करून एकमेकांना सहकार्य करताना सर्व मतभेद विसरणे गरजेचे आहे असे उद्गार सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामी यांनी तपोभूमी, कुंडई येथे काढले.
सद्गुरू फाऊंडेशन आणि सद्गुरू युथ फेडरेशन यांच्यातर्फे राष्ट्रप्रेम जागृत करणारा ‘वंदे मातरम्’ हा कार्यक्रम काल मोठ्या उत्साहात तपोभूमीवर पार पडला. यावेळी सद्गुरू ब्रह्मेशानंद स्वामींनी हजारो भक्तांना संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, आयुष मंत्री श्रीपाद नाईक, राजराजेश्‍वर गुरुजी, डॉ. लोकेश मुनीजी, डॉ. दिलीपकुमार थंकप्पन, गुरुप्रसाद, संदीप गारवा, ब्राह्मीदेवी, सुदिन ढवळीकर, प्रतापसिंह राणे, अमर पार्सेकर यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन केले.
डॉ. लोकेश मुनीजी यांनी मातृभूमीसाठी प्रत्येकाने सर्वस्व समर्पित करण्याचे आवाहन केले. देशात नवनिर्माण चैतन्य तयार करताना वंदे मातरम्‌चा जयघोष प्रत्येकाच्या ओठावर असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी शहीद होणार्‍या प्रत्येक सैनिकाची आठवण देशवासियांनी काढली पाहिजे असे सांगितले. आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी जीवनात समाजासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे असल्याचे सांगितले. या सोहळ्यात सद्गुरू ब्रह्मेशानंदस्वामी यांच्या हस्ते शहीद होणार्‍या सैनिकांच्या मदत निधीसाठी संप्रदायातर्फे ६ लाख रुपयांचा धनादेश संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.