चतुरस्र

0
107

ओम पुरी यांच्या निधनाने एक वैविध्यपूर्ण अभिनयाचे पर्व संपले आहे. बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आणि अतिशय गंभीर सामाजिक आशयाच्या चित्रपटांपासून बाष्कळ विनोदपटापर्यंत नानाविध प्रकारच्या भूमिका करून आपल्या अंगभूत कसदार अभिनयगुणांचे दर्शन घडवणारे ओम पुरी हे एक अजब रसायन होते. खरे तर चित्रपटास योग्य नसलेला खडबडीत चेहरा, जाडाभरडा आवाज अशी सगळी व्यंगे असूनही त्या व्यंगांनाच आपली बलस्थाने बनवून त्यांनी अभिनयक्षेत्रात जी भरारी घेतली ती थक्क करणारी आहे. एकाचवेळी एनएसडी आणि एफटीआयआय मधून शिक्षण घेतलेला हा कलावंत असल्याने रंगभूमी आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांत लीलया वावरला. त्यांच्या चित्रपट कारकिर्दीस प्रारंभ एका मराठी नाटकावरील चित्रपटातून व्हावा हाही एक योगायोग म्हणावा लागेल. विजय तेंडुलकरांच्या ‘घाशीराम कोतवाल’ या सुप्रसिद्ध नाटकावर जेव्हा चित्रपट निघाला, तेव्हा त्यातून ओम पुरी हे नाव सर्वप्रथम चंदेरी पडद्यावर आले आणि पुढची अनेक वर्षे पडदा व्यापून राहिले. ओम पुरी म्हणजे अतिशय जबरदस्त, संवेदनशील भूमिका ही ओळख त्यांनी अनेक चित्रपटांतून निर्माण केली. एकीकडे बॉलिवूड नाच गाण्यांत आणि उथळ कथानकांत रमलेले असताना समांतर चित्रपटांची जी नवी लाट सामाजिक भान ठेवणार्‍या दिग्दर्शकांनी निर्माण केली, त्यावर स्वार होऊन नसिरुद्दिन शाह, शबाना आझमी, स्मिता पाटील ओम पुरी आदींनी आपली नाममुद्रा कोरून ठेवली आहे. ‘अर्धसत्य’ मधील प्रामाणिक पोलीस अधिकार्‍याची त्यांची भूमिका त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे राष्ट्रीय पारितोषिक देऊन गेली. त्यांच्या अडीचशेहून अधिक विविधांगी चित्रपटांतील अनेकविध भूमिका रसिकांच्या कायमच्या स्मरणात राहिलेल्या आहेत. गंभीर, संवेदनशील भूमिका करणारा हा अभिनेता ‘जाने भी दो यारों’ सारखा चित्रपटही करू शकेल असे कोणाला वाटले नव्हते, परंतु कलावंताला कोणतीही चौकट नसते या भूमिकेतून त्यांनी अशा प्रकारचे चित्रपटही स्वीकारले. रेखासमवेत ‘आस्था’ सारखा बोल्ड चित्रपटही ओम पुरींनी साकारला आहे. आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धात त्यांनी मिळेल तो चित्रपट स्वीकारल्याने या कारकिर्दीची कमान सदैव चढती राहिली नाही, परंतु हॉलिवूडपटांत, ब्रिटीश चित्रपटांतही त्यांनी आपल्या अभिनयाची तितकीच छाप पाडली आहे हे त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्या इंग्रजी चित्रपटांतही त्यांनी वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘माय सन द फॅनेटिक’ मध्ये त्यांनी कडव्या इस्लामकडे झुकलेल्या आपल्या मुलामुळे व्यथित होणार्‍या पाकिस्तानी टॅक्सीचालकाची भूमिका ताकदीने वठवली, तर ‘ईस्ट इज ईस्ट’ मध्ये दोन बायकांच्या दादल्याची विनोदी भूमिकाही साकारली. ‘सिटी ऑफ जॉय’ मध्ये त्यांनी पॅट्रीक स्वेयझींसमवेत काम केले. विशेष म्हणजे पत्नी नंदिता यांनी जेव्हा ओम पुरी यांचे वादग्रस्त चरित्र लिहिले, तेव्हा त्याला प्रस्तावना पॅट्रीकची आहे. आपल्या खासगी जीवनातील नको त्या घटना नंदिताने या चरित्रात चव्हाट्यावर मांडल्याने ओम पुरी अस्वस्थ झाले होते. त्यांचा स्पष्टवक्तेपणाही त्यांना अलीकडेच भोवला होता. भारतात काम करणार्‍या पाकिस्तानी कलावंतांना पाठिंबा दर्शवताना ‘सैनिकांना सैन्यात भरती व्हायला आम्ही सांगितले होते का?’ असे असंवेदनशील उद्गार काढल्याने त्यांची ट्वीटरवरून खिल्ली उडवली गेली होती. ओम पुरी केवळ ते नायक असलेल्या चित्रपटांतच ठसा उमटवून गेले असे नव्हे, तर दुय्यम भूमिका असलेल्या चित्रपटांतील त्यांचा अभिनयही नायकावर वरताण ठरत असे. भूमिकेच्या पहिल्या तीन मिनिटांत रसिकाला काबीज करता आले पाहिजे असे मानणार्‍या या महान अभिनेत्याची नाममुद्रा येणारी बरीच वर्षे रसिकांच्या स्मरणात राहील.