भाजपचे २१ उमेदवार जाहीर

0
92

>> उर्वरीत उमेदवारांची ९ जानेवारीपर्यंत घोषणा

 

येत्या दि. ४ फेब्रुवारी रोजी होणार्‍या विधानसभा निवडणुकीसाठी पेडणे, काणकोण, सावर्डे, मये, केपे हे पाच डळमळीत व अन्य १४ मतदारसंघ वगळता काल एकूण २१ मतदारसंघातील उमेदवारांची नावे भाजपने जाहीर केली. उर्वरीत मतदारसंघातील उमेदवार दि. ९ पर्यंत जाहीर करणार असल्याचे दक्षिण गोव्याचे खासदार तथा पक्ष प्रवक्ते नरेंद्र सावईकर यांनी पत्रकारांना सांगितले. जाहीर केलेल्या २१ उमेदवारांपैकी १६ विद्यमान आमदार तर ५ नवे चेहरे आहेत.

जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये दक्षिण गोव्यातील महादेव नाईक (शिरोडा), सुभाष फळदेसाई (सांगें), नीलेश काब्राल (कुडचडे), राजन नाईक (कुंकळ्ळी), दामोदर (दामू) नाईक (फातोर्डा), आर्थुर डीसिल्वा (कुडतरी), कार्लुस आल्मेदा (वास्को), माविन गुदिन्हो (दाबोळी), मिलिंद नाईक (मुरगाव), एलिना साल्ढाणा (कुठ्ठाळी) यांचा समावेश आहे.
उत्तर गोव्यातील उमेदवारांमध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर (मांद्रे), ग्लेन टिकलो (हळदोणे), किरण कांदोळकर (थिवी), दयानंद मांद्रेकर (शिवोली), मायकल लोबो (कळंगुट), दिलीप परुळेकर (साळगाव), सिध्दार्थ कुंकळ्‌ळकर (पणजी), दत्तप्रसाद नाईक (ताळगाव), प्रमोद सावंत (साखळी), राजेश पाटणेकर (डिचोली), फ्रान्सिस डिसोझा (म्हापसा) यांचा समावेश आहे.
पेडणे, काणकोण, सावर्डे व मयें या मतदारसंघातील उमेदवारांची नावे अद्याप निश्‍चित न केल्याने तेथील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. वरील एकवीसही नावांना केंद्रीय समितीची मान्यता मिळविल्यानंतर या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होईल.