ओम पुरी यांचे निधन

0
105

हिंदी सिनेजगतातील दिग्गज अभिनेते ओम पुरी यांचे काल सकाळी हृदयविकारच्या झटक्याने वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्येही अनेक चित्रपटांमधून आपल्या सकस अभिनयाने रसिकांवर छाप पाडलेल्या ओम पुरी यांच्या निधनाबद्दल सिनेसृष्टीसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविले होते. त्यांच्या पश्‍चात त्यांच्या विभक्त पत्नी नंदिता पुरी व इशान हे पुत्र आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटवरून पुरी यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.

सद्गती, जानेभी दो यारो, मिर्च मसाला, धारावी, आस्था अर्धसत्य, मंडी, गांधी, स्पर्धा, आक्रोश, भूमिका, हेराफेरी, चक्रव्यूह, चायना गेट, घायल, घाशीराम कोतवाल अशा कलाकृतींमधील पुरी यांच्या भूमिका गाजल्या होत्या. ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेल्या ओम पुरी यांनी विनय तेंडुलकरांच्या नाटकावर आधारीत घाशीराम कोतवाल या चित्रपटाद्वारे या क्षेत्रात पदार्पण केले होते. अमेरिकी, ब्रिटिश तसेच पाकिस्तानी चित्रपटातूनही त्यांनी काम केले. अष्टपैलू अभिनयाबरोबरच वैशिष्ट्यपूर्ण भारदस्त आवाज व नैसर्गिक संवादफेकीचे कौशल्य यामुळे त्यांच्या भूमिका अविस्मरणीय ठरल्या. भारतीय भाषांबरोबरच इंग्रजी चित्रपटातही त्यांनी भूमिका साकारल्या.
अभिनयाबरोबरच सामाजिक विषयांवरही भाष्य करताना ओम पुरी वादातही सापडले होते. अमरीश पुरी, नासिरुद्दिन शहा, शबाना आझमी, स्मिता पाटील यांच्या बरोबरीने त्यांनी कामे केली. ओम पुरी यांच्या हॉलिवूड चित्रपटांमध्ये सिटी ऑफ जॉय (१९९२), पॅट्रिक स्वेझ, वूल्फ (१९९४), द घोस्ट व द डार्कनेस (१९९६) यांचा समावेश होता.