सरस्वती सांस्कृतिकच्या ‘काळीमा’ला प्रथम पुरस्कार

0
135

कला अकादमीने आयोजित केलेल्या ४७ व्या ‘अ’ गट मराठी नाट्यस्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून श्री सरस्वती सांस्कृतिक मंडळ, रावण, सत्तरी यांनी सादर केलेल्या ‘काळीमा’ या नाटकास एक लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार तर श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्यसमाज, बांदोडा यांच्या ‘आनंदीबाई’ नाट्यप्रयोगास पंचाहत्तर हजार रुपयांचे द्वितीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. श्री साईकला मंडळ-सांगोल्डा यांच्या ‘तो मृत्यूंजय एक’ या नाटकाची पन्नास हजार रुपयांसाठीच्या तृतीय पारितोषिकासाठी निवड करण्यात आली आहे. प्रत्येकी पंचवीस हजार रुपयांची उत्तेजनार्थ पारितोषिके रुद्रेश्‍वर, पणजी यांच्या फ्रेंड आणि विमलानंद कला मंच, करंजाळ, मडकई यांच्या किरवंत या नाटकांसाठी देण्यात आली आहे.

उत्कृष्ट दिग्दर्शनाचे प्रथम पारितोषिक संतोष शेटकर यांना काळीमा या नाटकासाठी प्रथम बक्षीस प्राप्त झाले असून दिगंबर सिंगबाळ यांना आनंदीबाई नाटकासाठी द्वितीय, तर तृतीय पारितोषिक तो मृत्यूंजय एक नाटकासाठी जयेंद्रनाथ हळदणकर यांना देण्यात आले.
पुरुष गटात वैयक्तिक अभिनयासाठी अमोघ बुडकुले यांना आनंदीबाई नाटकातील राघोबादादाच्या भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक देण्यात आले असून द्वितीय पारितोषिक नागेश फडते यांना जयकेतू नाटकातील जयकेतू भूमिकेसाठी प्राप्त झाले. अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे वर्धन कामत (तो-अजूनही चांद रात आहे), विठोबा दाभोलकर (दत्तू- गेले भजनाक पोचले लग्नाक), सोहन महाले (राजाराम- रायगडाला जेव्हा जाग येते), ईश्‍वर विठोबा नाईक (गजानन- संत गजानन शेगावीचा), रतीश गावडे (आमदार- साईबाबा रिटनर्‌‌स), रघुनाथ साकोर्डेकर (मालक- चिमणीचं घर होतं मेणाचं) आणि उगम जांबावलीकर (बापू- फ्रेंड) यांना प्राप्त झाली.
स्त्री गटात वैयक्तिक अभिनयासाठी सुविधा तोरगळ यांना काळीमा नाटकातील एमली भूमिकेसाठी प्रथम पारितोषिक जाहीर करण्यात आले असून स्नेहल शेट्ये यांनी फ्रेंड नाटकातील नमाच्या भूमिकेसाठी द्वितीय पारितोषिक संपादन केले. स्त्री गटात अभिनयासाठीची प्रशस्तीपत्रे तन्वी देसाई (कमा- चिमणीचं घर होतं मेणाचं), रती भाटीकर (सुनीता- रुम नं.- ५), मनुजा लोकूर (मित्रा- फ्रेंड), दक्षा शिरोडकर (सिम्रन- काम- सूत्र) आणि मेखला साळकर (मुलगी- फायनल ड्राफ्ट) यांना प्राप्त झाली.
उत्कृष्ट नेपथ्यासाठीसाठीचे पारितोषिक अशोक गावकर यांना काळीमा नाटकासाठी प्राप्त झाले असून राजमोहन शेट्ये यांना तो मृत्यूंजय एक नाटकासाठी प्रशस्तीपत्रक देण्यात आले आहे. काळीमा या नाटकाच्या प्रकाश योजनेसाठी दयानंद- राणे यांनी पारितोषिक मिळविले तर प्रशस्तीपत्र किरवंत नाटकासाठी वासुदेव चोपडेकर यांना देण्यात आले. वेशभूषेसाठीचे बक्षीस जयंत नाटेकर यांना तो मृत्यूंजय एक नाटकासाठी प्राप्त झाले असून प्रशस्तीपत्र सदानंद परब यांना गेले भजनाक पोचले लग्नाक नाटकासाठी देण्यात आले. उत्कृष्ट पार्श्‍वसंगीतासाठीचे पारितोषिक मकरंद हुडेकर यांनी आनंदीबाई या नाटकासाठी प्राप्त केले असून केदार मणेरीकर यांना किरवंत या नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. रंगभूषेचे पारितोषिक दास कवळेकर यांनी आनंदीबाई या नाटकासाठी संपादन केले तर अमिता नाईक यांना संत गजानन शेगावीचा नाटकासाठी प्रशस्तीपत्र देण्यात आले. नाट्यलेखनासाठी प्रथम पारितोषिक स्वरुपा शिकनीस याना रुम. नं. ५ नाटकासाठी देण्यात आले आहे. या स्पर्धेचे परीक्षण राहुल वैद्य, रवींद्र कुलकर्णी व श्रीमती ज्योती केसकर या परीक्षक मंडळाने केले. तर खास स्पर्धेसाठी लिहिलेलया नवीन संहिताचे परीक्षण डॉ. प्रकाश वजरीकर यांनी केले. या स्पर्धेचा व ब गट मराठी नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एकत्रीतपणे होणार असून याची तारीख मागाहून जाहीर करण्यात
येईल.