पंतप्रधानांच्या गोव्यात दोन जाहीर सभा

0
77

प्रचाराच्या काळात राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन जाहीर सभा होणार असून गोवा प्रभारी तथा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांचा चार दिवस राज्याम मुक्काम असेल, अशी माहिती खासदार ऍड्. नरेंद्र सावईकर यांनी काल पत्रकार परिषदेत दिली.

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय नगर विकासमंत्री व्यंकय्या नायडू, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही सभा होतील. संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर व केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचा प्रचार कार्यात सक्रिय सहभाग असेल, असे त्यांनी सांगितले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपच्या गोव्यातील निवडणूक प्रचाराचा येत्या २२ रोजी शुभारंभ करणार
आहेत.
मगो नेते भाजपवर टीका करीत असताना त्यांच्यावर भाजपकडून टीका का होत नाही, असा प्रश्‍न केला असता मगो हा येथील पक्ष आहे. त्यांची मते मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्याचे कारण नाही. भाजप आपल्या मार्गाने प्रचार करीत आहे, असे सावईकर म्हणाले.
काल पेडणे, पर्ये, कळंगुट, केपें, मयें, कुडतरी या मतदारसंघातील संबंधितांशी चर्चा करून उमेदवारांच्या बाबतीत विचार केला आहे. दि. ८ रोजी प्रदेश भाजप निवडणूक समितीची बैठक होईल. या बैठकीत उमेदवारांच्या यादीस मान्यता मिळाल्यानंतर यादी केंद्रीय निवडणूक समितीकडे पाठविली जाईल, असे सावईकर यांनी
सांगितले.