गोव्यात ४ फेब्रुवारीला मतदान

0
99

११ मार्च रोजी मतमोजणी; आचारसंहिता लागू

गोवा विधानसभेच्या सर्व ४० जागांसाठी येत्या ४ फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी ११ मार्च रोजी होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त नसीम झैदी यांनी गोव्यासह पंजाब, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम काल जाहीर केला. त्यामुळे राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे.

गोवा विधानसभा निवडणुकीची अधिसूचना बुधवार दि. ११ जानेवारीस काढली जाणार असून उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार दि. १८ जानेवारी ही असेल. अर्जांची छाननी गुरुवार दि. १९ जानेवारीस होईल व अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवार दि. २१ जानेवारी ही असेल. गोव्यातील एक मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. गोव्याची अंतिम मतदार यादी ५ जानेवारीस प्रकाशित होईल. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवाराची निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा २० लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
पंजाब विधानसभेच्या ११७ जागांसाठीही गोव्याबरोबरच ४ फेब्रुवारी रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. उत्तराखंड विधानसभेच्या ७० जागांसाठी १५ फेब्रुवारीस एकाच टप्प्यात मतदान होईल. मणिपूरमध्ये मात्र ४ मार्च व ८ मार्च अशा दोन टप्प्यांत मतदान होणार आहे. सर्वांत मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या ४०३ जागांसाठी सात टप्प्यांत मतदान होईल. ११, १५, १९, २३ व २७ फेब्रुवारी, तसेच ४ व ८ मार्च रोजी हे मतदान होईल.
या पाच राज्यांतील एकूण ६९० मतदारसंघांसाठी सोळा कोटी मतदार मतदान करतील. त्यासाठी निवडणूक आयोग १ कोटी ८५ लाख मतदान केंद्रे उभारणार आहे. देशात मतदारयादी स्वच्छता मोहीम २०१६ राबवण्यात आली होती. त्या अंती देशभरातील मतदारयाद्यांतील एकूण २९ हजार ८५६ मृत व्यक्तींची नावे हटविण्यात आली असून १२ लाख ६२ हजार दुहेरी नोंदी काढून टाकण्यात आल्या आहेत असेही झैदी यांनी सांगितले. या सर्व राज्यांत छायाचित्रयुक्त मतदारयाद्या पूर्णांशाने वापरल्या जातील.
मतदार मार्गदर्शिका देणार
* मतदारांना त्यांनी कोणत्या मतदानकेंद्रावर मतदान करावे हे कळावे यासाठी त्यांच्या छायाचित्रासह मोठ्या आकारातील मतदार चिठ्ठी दिली जाणार असून त्याच्या मागे मतदान केंद्राचा नकाशा असेल. * या निवडणुकीत मतदारांना घरोघरी स्थानिक भाषेतील मतदार मार्गदर्शक पत्रक दिले जाणार असून त्यात मतदानाची तारीख व वेळ, मतदानकेंद्रात मतदानावेळी काय करावे व काय करू नये याच्या सूचना तसेच इतर महत्त्वाची माहिती पुरवली जाईल.
मतदानकेंद्रावर वाढीव सोयी
* मतदानकेंद्रांवरील किमान सुविधांऐवजी यावेळी निश्‍चित किमान सुविधा पुरवल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, निवारा, स्वच्छतालय, विकलांगांसाठी रॅम्प, प्रमाणित मतदानकक्ष आदी सुविधा असतील.
* प्रत्येक मतदानकेंद्रावर मतदारांस मार्गदर्शन करणारी भित्तिपत्रे लावली जातील. त्यासाठी चार प्रकारची भित्तिपत्रे तयार करण्यात आली आहेत. मतदानकेंद्राची माहिती, त्या केंद्राच्या अखत्यारीतील भाग, निवडणुकीला उभ्या असलेल्या उमेदवारांची नावे, निवडणूक अधिकार्‍यांचे संपर्क क्रमांक, निर्धारित ओळखपत्रांची सूची, मतदानाची चित्रमय प्रक्रिया आदी सूचना त्यावर असतील.
मतदार सहायता केंद्रे
* प्रत्येक मतदान केंद्राजवळ निवडणूक आयोगाकडून मतदार सहायता केंद्रे स्थापन केली जाणार असून मतदारांना त्यांचे मतदानकेंद्र, मतदारयादीतील त्यांचा क्रमांक आदी माहिती तेथे पुरवली जाईल.
* मतदानाची गोपनीयता टिकावी यासाठी यावेळी मतदानकक्षाची उंची तीस इंच ठेवली जाणार आहे. ३० इंच उंचीच्या टेबलावर हा कक्ष ठेवला जाणार असून तो राखाडी रंगाच्या फ्लेक्स बोर्डचा असेल. त्यामुळे सर्व मतदानकक्षांत समानता राहील.
विकलांगांसाठी खास पार्किंग
* शारीरिक विकलांगांसाठी सर्व मतदानकेंद्रे शक्यतो तळमजल्यावरच असावीत अशा सूचना आयोगाने दिल्या असून बळकट रॅम्प उभारले जाणार आहेत. मतदानकेंद्रावर आल्यावर त्यांना प्राधान्याने पार्किंगची सोय असेल व मतदानासही प्राधान्य दिले जाईल. नेत्रहीनांसाठी व कुष्ठरोग्यांसाठी जेथे गरज असेल तेथे स्वतंत्र मतदानकेंद्रे उभारली जाणार आहेत.
माहिती तंत्रज्ञानाचा आधार
* या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने ङ्गसमाधानफ ही सार्वजनिक तक्रारींचे निवारण व निरीक्षणाची, ङ्गसुविधाफ ही सिंगल विंडो परवानगी देणारी व ङ्गसुगमम ही वाहन व्यवस्थापन करणारी यंत्रणा तयार केलेली असून मतदानकेंद्रांमधील मतदानाचे सीसीटीव्ही चित्रण वा वेबकास्टिंगही केले जाणार
आहे.
ऑनलाइन प्रतिज्ञापत्रे
* उमेदवारांना यावेळी निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आपली प्रतिज्ञापत्रे ऑनलाईनही भरता येणार आहेत. ईसीआय.एनआयसी.इन या संकेतस्थळावर हे ई-फायलिंग करता येईल. मात्र, त्यानंतर ते साक्षांकित करून निवडणूक अधिकार्‍यास सादर करावे लागेल. उमेदवारांच्या साह्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक आयोग विवरण मदतनीस नेमलेले असतील.
* या निवडणुकीत उमेदवारी अर्जाचे स्वरूपही बदलण्यात आले आहे. त्यानुसार उमेदवारी अर्जासोबत छायाचित्र सादर करावे लागेल, तसेच आपण भारतीय नागरिक असून कोणतेही विदेशी नागरिकत्व स्वीकारलेले नसल्याचे जाहीर करावे लागेल.

मतदानयंत्रांवर उमेदवारांची छायाचित्रे
– या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रावरील उमेदवारांच्या नावाशेजारी त्यांच्या निवडणूक चिन्हांबरोबरच त्यांची छायाचित्रेही असणार आहेत. एकाच नावाचे अनेक उमेदवार उभे केल्याने होणारा गोंधळ त्यामुळे टळू शकेल.
– अलीकडेच पुडुचेरीत झालेल्या पोटनिवडणुकीत प्रायोगिक पद्धतीवर यशस्वीरीत्या वापरलेली इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टम (ईटीपीबीएस) काही मतदारसंघांत टपालाने पाठवल्या जाणार्‍या मतांसाठी प्रायोगिक पद्धतीवर वापरली जाणार आहे.

मतदारांना पोचपावती
– व्हीव्हीपॅट – वोटर व्हेरिफाएबल पेपर ऑडिट ट्रेल ः गोवा विधानसभा निवडणुकीत यावेळी व्हीव्हीपॅट युक्त मतदानयंत्रे वापरली जाणार आहेत. आपण केलेले मतदान योग्य व्यक्तीला झाले आहे ना याची कागदी पोचपावती मतदारांना त्यामुळे मिळेल.

उमेदवारांची देणी नसावीत
दिल्ली उच्च न्यायालयाच्या एका निवाड्यानुसार यावेळी सर्व उमेदवारांना एक अतिरिक्त प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाला सादर करावे लागणार असून त्यात आपण वीज, पाणीपुरवठा, दूरध्वनी, तसेच सरकारी घरभाड्याचे कोणतेही देणे नसल्याचे त्यात नमूद करावे लागणार आहे. फॉर्म – २६ नुसार भराव्या लागणार्‍या प्रतिज्ञापत्राबरोबरच हे अतिरिक्त प्रतिज्ञापत्र भरावे लागणार आहे. ते नोटरी पब्लिक किंवा प्रथमश्रेणी दंडाधिकार्‍याने प्रमाणित केलेले असावे लागेल. अर्ज भरायच्या शेवटच्या तारखेस संध्याकाळी ३ पर्यंत ते सादर करावे लागेल. हे ‘नो डिमांड सर्टिफिकेट’ नसल्यास लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ३६ खाली हा उमेदवारी अर्जातील दोष मानला जाईल.

अर्जातील सर्व रकाने भरणे आवश्यक
उमेदवारी अर्ज भरताना अनेक उमेदवार काही रकाने रिकामे सोडत असल्याने ते टाळण्यासाठी या निवडणुकीत उमेदवारी अर्जातील सर्व रकाने भरणे आवश्यक करण्यात आले आहे. जर एखादा रकाना कोरा असेल तर निवडणूक अधिकारी त्याला नवे प्रतिज्ञापत्र सादर करण्याची नोटीस बजावील. काही रकाने कोरे असलेले अर्ज छाननीवेळी फेटाळले जाऊ शकतात.

ध्वनिक्षेपकांच्या वापरावर निर्बंध
या निवडणूक काळात ध्वनिक्षेपकांमुळे नागरिकांना होणारा उपद्रव टाळण्यासाठी निवडणूक आयोगाने विशेष पावले उचलली असून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत कोणत्याही उमेदवार वा पक्षाला ध्वनिक्षेपकाचा कोणत्याही सभेत, प्रचार वाहनावर वा अन्यत्र वापर करता येणार नाही. शेवटच्या ४८ तासांतही प्रचार वाहनावर ध्वनिक्षेपकाला परवानगी नसेल. शैक्षणिक संस्थांच्या आवारात ध्वनिक्षेपकांचा वापर करू नये असेही आवाहन आयोगाने केले आहे.

नोटा’ निवडण्याचा पर्याय
– या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्राचा वापर होणार असून यावेळी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या यंत्रावर शेवटच्या उमेदवाराच्या नावाखाली ‘नोटा’ म्हणजे ‘वरीलपैकी कोणीही नाही’ हा विकल्प असलेले बटण असेल. त्या साठी निवडणूक आयोगाने स्वतंत्र चिन्हही तयार केले आहे.

गोवा विधानसभा
निवडणूक कार्यक्रम
निवडणुकीची अधिसूचना बुधवार दि. ११ जानेवारी २०१७
उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख बुधवार दि. १८ जानेवारी २०१७
अर्जांची छाननी गुरुवार दि. १९ जानेवारी २०१७
अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख शनिवार दि. २१ जानेवारी २०१७
मतदान शनिवार दि. ४ फेब्रुवारी २०१७
मतमोजणी शनिवार दि. ११ मार्च २०१७
एकूण मतदार १० लाख ८५ हजार २७१
गोव्यातील एकूण मतदान केंद्रे १६४२

उत्तर प्रदेश
एकूण जागा-४०३
टप्पा जागा मतदान
१ ७३ ११ फेब्रु.
२ ६७ १५ फेब्रु.
३ ६९ १९ फेब्रु.
४ ५३ २३ फेब्रु.

टप्पा जागा मतदान
५ ५२ २७ फेब्रु.
६ ४९ ४ मार्च
७ ४० ८ मार्च

पंजाब
एकूण जागा – ११७
मतदान – ४ फेब्रुवारी

उत्तराखंड
एकूण जागा – ७०
मतदान – १५ फेब्रुवारी

मणिपूर
एकूण जागा ६०
टप्पा १ – ४ मार्च
टप्पा २ – ८ मार्च

सर्व राज्यांची मतमोजणी – ११ मार्च

आधार कार्डही ग्राह्य
– मतदारांना मतदानावेळी स्वतःची ओळख पटवणे बंधनकारक असेल. त्यासाठी ज्यांच्यापाशी मतदार ओळखपत्रे नसतील, त्यांनी ती त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील निवडणूक नोंदणी अधिकार्‍यांकडून मिळवावीत असे आवाहन आयोगाने केले आहे.
– मतदारापाशी निवडणूक ओळखपत्र नसल्यास आधार कार्डही यावेळी ओळखपत्र म्हणून ग्राह्य धरले जाईल.

स्त्री कर्मचार्‍यांची केंद्रे
– स्त्री पुरूष समानतेच्या प्रयत्नांचा भाग म्हणून या निवडणुकीत काही मतदानकेंद्रे संपूर्णतः स्त्री कर्मचार्‍यांवर सोपवली जाणार आहेत. तेथील पोलीस व सुरक्षा कर्मचार्‍यांसह सर्व कर्मचारी महिलाच असतील. ज्या प्रदेशांत स्त्री पुरूष एकत्र मिसळत नाहीत अशा भागांत महिलांसाठी स्वतंत्र मतदानकेंद्रेही उभारली जाणार आहेत.