११ जानेवारीपासून भरता येतील उमेदवारी

0
97

>> व्या मतदारयादीचे आज प्रकाशन

 

गोवा विधानसभा निवडणुकीचा सविस्तर कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कुणाल यांनी काल पत्रकार परिषदेत जाहीर केला. ४ फेब्रुवारी रोजी होणार असलेल्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज ११ जानेवारीपासून भरता येतील. राज्यातील अंतिम मतदारयादी आज दि. ५ रोजी पणजी येथे एका कार्यक्रमात प्रकाशित केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात वीस हजार कर्मचारी निवडणूक प्रक्रिया हाताळणार आहेत. गोव्याच्या मतदार यादीत यंदा चाळीस हजार नव्या मतदारांची भर पडल्याचे त्यांनी सांगितले.
अबकारी खात्यासह विविध खात्यांची भरारी पथके यापूर्वीच तैनात करण्यात आली असून ती आता सक्रिय होतील. उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारी पथके, तक्रारींची दखल घेणारी पथके आदींचा त्यात समावेश आहे. राज्यात उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी चाळीस पथके नेमली असल्याचे त्यांनी सांगितले.
निवडणूक आचारसंहिता भंगाच्या तक्रारी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या संकेतस्थळावर, फेसबुक पेजवर तसेच विविध अधिकार्‍यांकडे नोंदवण्याची सोय करण्यात आली आहे. उमेदवारांकडून मतांसाठी निवडणूक काळात महागड्या भेटवस्तू मतदारांना देण्यात येत असल्याने राज्यातील टीव्ही, मोबाईल, फ्रीज, फर्निचर वितरकांवर खास लक्ष ठेवले जाणार आहे. वाणिज्य कर खात्याचे अधिकारीही वितरकांच्या विक्रीवर लक्ष ठेवतील असे कुणाल यांनी सांगितले.
सरकारी मालमत्तेचे भित्तिपत्रके, बॅनर लावून विद्रुपीकरण करणार्‍यांवर कारवाई केली जाईल. ४८ तासांच्या आत अशी सामुग्री काढून टाकली जाईल. खासगी मालमत्तेचे विद्रूपीकरण झाले असेल आणि मालकाने तक्रार केली तर उमेदवाराला ७२ तासांच्या आत आपले ते प्रचार साहित्य काढून टाकावे लागेल असेही कुणाल म्हणाले.
निवडणूक प्रचारासाठी सरकारी वाहनांचा वापर करता येणार नाही. केवळ निवडणुकीच्या कामासाठी अधिकार्‍यांना ती वापरता येतील. प्रचारासाठी सरकारी योजनांचा वापर करता येणार नाही. सरकारी संकेतस्थळांवरील राजकीय नेत्यांची छायाचित्रेही काढून टाकावी लागतील. अर्धवट राहिलेली विकासकामे पूर्ण करता येणार नाहीत, तातडीची कामे अधिकार्‍यांच्या पूर्वपरवानगीनेच हातावेगळी करावी लागतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी नारायण नावती हेही हजर होते.