भाजप ३७ जागा लढविणार

0
116

>> बाणावली, वेळ्‌ळी, नुवेंत अपक्षांना पाठिंबा

 

सर्व संबंधितांशी चर्चा करून भाजपने आतापर्यंत २२ मतदारसंघाचा आढावा घेतला असून ९ जानेवारीपर्यंत सर्व मतदारसंघ पूर्ण करणार असल्याचे सांगून येत्या निवडणुकीत भाजप ३७ मतदारसंघातून उमेदवार उभे करणार असून बाणावली, वेळ्‌ळी व नुवें या तीन मतदारसंघात अपक्षांना पाठिंबा देणार असल्याचे प्रदेश भाजप अध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले. भाजपच्या या निर्णयामुळे नावेली मतदारसंघातून भाजप निवडणूक लढविणार हे स्पष्ट झाले आहे.
भाजपची गाभा समिती उमेदवारांची छाननी करून १४ सदस्यीय निवडणूक समितीकडे यादी सादर करेल व त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीची मान्यता मिळवून उमेदवारांची नावे जाहीर केली जातील, असे तेंडुलकर यांनी सांगितले. काही मतदारसंघांसाठी दोन ते तीन नावेही आली आहेत. त्यावर पक्ष निर्णय घेईल, असे त्यांनी एका प्रश्‍नावर त्यांनी सांगितले.
राज्य निवडणूक समितीचे अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष तेंडुलकर असून या समितीवर संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, मंत्री दयानंद मांद्रेकर, राजेंद्र आर्लेकर, खासदार नरेंद्र सावईकर, सदानंद शेट तानावडे, संजीव देसाई, दामू नाईक, कुंदा चोडणकर व सुलक्षणा सावंत यांचा समावेश आहे.
संरक्षणमंत्री पर्रीकर यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करणार असल्याची माहिती तेंडुलकर यांनी दिली. चालू आठवड्यातच उमेदवारांची पहिली यादी जाहीर होऊ शकेल, असे त्यांनी सांगितले.