‘संजीवनी’च्या ऊस उत्पादकांचे उद्यापासून पणजीत उपोषण

0
73

>> दरवाढीस मुख्यमंत्र्यांच्या विरोधामुळे निर्णय

 

संजीवनी साखर कारखान्याचे ऊस उत्पादक संघटनेच्या दरवाढीला मुख्यमंत्र्यांनी विरोध केल्यामुळे उद्या गुरुवारपासून पणजीतील आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा निर्णय ऊस उत्पादक संघटनेने घेतला आहे. पहिल्या दिवशी दिडशेहून अधिक ऊस उत्पादक उपोषणाला बसणार आहेत.
ऊस उत्पादकांनी ३६०० रुपये प्रतिटन दर देण्याची मागणी केली होती. सध्या २५०० रुपये प्रति टन दर असून सदर दर परवडत नसल्याने दरवाढ करण्याचे सर्व सोपस्कर ऊस उत्पादकांनी केले होते. काल सकाळी ऊस उत्पादकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांची भेट घेतली. संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र देसाई यांनी मुख्यमंत्र्याना किमान निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी ३००० रुपये दर देण्याची विनंती केली. मात्र मुख्यमंत्री राजी न झाल्याने ऊस उत्पादकांनी उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेतला.
राजेंद्र देसाई यांना यासंदर्भात विचारले असता मुख्यमंत्र्यांनी येणार्‍या अर्थसंकल्पानंतर दरवाढ करण्याचे आश्‍वासन दिले. मात्र निवडणुकीनंतर कोणाचे सरकार सत्तेवर येईल हे सांगता येत नसल्याने सध्या तरी ३००० रुपये पर्यंत दरवाढ करण्याची विनंती केली असल्याचे सांगितले. गुरुवारी सकाळी संजीवनी साखर कारखान्याजवळ ऊस उत्पादक एकत्रित होवून नंतर उपोषणाला बसण्यासाठी पणजीतील आझाद मैदानावर जाणार आहेत. ऊस उत्पादकांना सध्या मिळणारा दर परवडणारा नसून दरवाढ होईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचे राजेंद्र देसाई यांनी सांगितले.