धर्म, भाषेच्या नावावर मते मागणे बेकायदेशीर

0
113

>> सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा

 

देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल सर्वोच्च न्यायालयाने जात, धर्म आणि भाषा यांच्या नावे मतांची मागणी करणे बेकायदेशीर असल्याचा ऐतिहासिक निवाडा एका याचिकेच्या सुनावणीवेळी दिला. या निवाड्यामुळे देशातील विविध राजकीय पक्ष बरेच अडचणीत येतील अशी चर्चा आहे.
एका हिंदुत्वविषयक प्रकरणाच्या याचिकेवर सात सदस्यीय घटना पीठाने वरील निवाडा ४-३ अशा मताधिक्क्याने दिला. निवडणुका म्हणजे धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असते आणि लोक ज्याची पूजा करतात ती बाब सर्वस्वी वैयक्तिक असते. अशावेळी त्यात हस्तक्षेप करण्याचा कोणाला अधिकार असू शकत नाही अशी टिप्पणी खंडपीठाने केली.
निवडणूक प्रक्रिया धर्मनिरपेक्ष असल्याने मतदारांकडून धर्म, जात, समुदाय किंवा भाषेवरून मतांची याचना करणे घटनाविरोधी असल्याचे निवाड्यात नमूद करण्यात आले आहे. लोक प्रतिनिधींनी आपले काम धर्मनिरपेक्षपणे केले पाहिजे असे त्यात स्पष्ट केले आहे.
मुख्य न्यायमूर्ती टी. एस. ठाकूर, न्या. यू. यू. ललित, न्या. ए. के. गोयल, न्या. डी. वाय. चंद्रचूड, न्या. एम. बी. लोकूर, न्या. एस. ए. बोबडे व न्या. एल. एन. राव यांचा हा निवाडा देणार्‍या घटनापीठावर समावेश आहे.