आयुर्वेदात ‘त्रिदोष’ म्हणजे काय?

0
1323

डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

दोष हे सर्व शरीरव्यापी जरी असले तरी वात दोष अस्थिंमध्ये राहतो; पित्त दोष रक्त व स्वेद आणि कफ दोष रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र, मूत्र, यांमध्ये राहतो. अर्थात अति तिखट, उष्ण पदार्थाने पित्त प्रकोप झाला तर रक्तदेखील दुष्ट होते.

मानवी शरीर हे पंचभूतात्मक, त्रिदोषयुक्त, सप्तधात्वात्मक, तीन मल, मन व आत्मा युक्त आहे. यातील त्रिदोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. दोष म्हटले की सर्वसामान्यांचा समज हा होतो की शरीरातील व्याधी होय. वात म्हणजे वातविकार, पित्त म्हणजे अम्लपित्तासारखे विकार व कफ म्हणजे सर्दी-खोकल्यातून पडणारा कफ असा गैरसमज सामान्य माणसांचा होतो. दोष असूनसुद्धा शरीरातील प्राकृत घटक कसे?…याचे विश्‍लेषण आज आपण पाहू. आयुर्वेदिक डाक्टर जेव्हा रुग्णाला सांगतो तुझा वात वाढलेला आहे किंवा पित्त दूषित आहे, कफ बिघडलेला आहे म्हणजे नक्की काय? किंवा विशिष्ट दोष शमन करणारे औषध, आहार-विहार करावे लागले म्हणजे नेमके काय? हे दोष म्हणजे काय?
जे घटक प्रकूपित झाले असता इतरांना बिघडवतात… त्यांना ‘दोष’ असे म्हणतात. वात, पित्त, कफ हे घटक जेव्हा द्रव्यतः, गुणतः, कर्मतः साम्यावस्थेत असतात, तेव्हा स्वास्थ्य टिकून राहते. मात्र… ‘असतील तर सूत नाहीतर भूत’ ही म्हण त्रिदोषांना तंतोतंत लागू पडते. काहींच्या मते… प्रकृती निर्माणासाठी (शरीर निर्मितीसाठी) जबाबदार असणारे व प्रकूपित अवस्थेत दुसर्‍यांना बिघडविण्याचे सामर्थ्य असणारे ते दोष होय. वात, पित्त, कफ हेच देहाच्या उत्पत्तीचे हेतू आहेत. ते अव्यापन्न अवस्थेत शरीराच्या (अनुक्रमे) अधो, मध्य व उर्ध्व भागात राहून खांबांनी जसा घराला आधार मिळतो त्याप्रमाणे हे तिघे शरीराला आधार देतात. म्हणून या देहाला ‘त्रिभ्रूण’ असेही म्हणतात. हे तिघे विकृत झाले असता, प्रलयास (देहाच्या नाशास) कारणीभूत होतात.
साम्यावस्थेत शरीरातील सर्व प्राकृत क्रिया व्यापार्‍यांना जबाबदार असणारे हे घटक, माणसाच्या खाण्या-पिण्या, वागण्यातील चुकांमुळे प्रकूपित होऊन व्याधी उत्पन्न करतात.
दोषांचे असे प्राकृत गुण असतात. त्यामध्ये वैषम्य निर्माण झाल्यास दोषांची प्राकृत कार्ये बिघडतात व व्याधी उत्पन्न होतात. तसेच दोषांची व्याप्ती सर्व शरीरभर जरी असली तरी प्रत्येक दोषांची विशिष्ट अशी स्थाने आहेत. त्यामुळे त्या त्या स्थानामध्ये दोषवैगुण्य निर्माण झाले तर स्थानसंश्रय भेदाने तिथेही रोग उत्पन्न होतात. ऋतुभेदानेदेखील प्रत्येक ऋतूंत त्या त्या दोषांचा संचय, प्रकोप, प्रशम ठरलेला असतो. त्यामुळे ऋतुचर्येचे पालन न केल्यास प्रकूपित असलेल्या दोषांचे त्या त्या ऋतूंत व्याधी उत्पन्न होतात. म्हणून शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी व रोगांपासून शरीराचा बचाव करण्यासाठी प्राकृत दोषांचे गुणधर्म व कर्मे माहीत असणे गरजेचे आहे. त्यानुसार आपला आहार-विहार ठरवता येतो.
दोषांचे गुण व कार्ये
वाताचे गुण – रुक्ष, लघू, शीत, खर, सूक्ष्म, चल असे वाताचे गुण आहेत.
* रूक्ष – रुक्ष म्हणजे कोरडेपणा. उतारवयात वाताचे आधिक्य असते, त्यात वाताचा रुक्ष हा गुण वाढतो व सांध्यांमधून आवाज येणे, त्वचेवर सुरकुत्या पडणे, तळव्यांना भेगा पडणे इ. तक्रारी वाढतात, म्हणूनच हे समजल्यावर उतारवयातील प्रत्येक व्यक्तीने किमान एक वेळा शरीरास कोमट खोबरेल तेलाने हलक्या हाताने मालीश करावे, या प्रकारचा सल्ला रुक्ष गुण विरोधी चिकित्सा या स्वरूपात दिला जातो.
* लघु – लघु गुणाने शरीरास लाघवता येते. लंघन किंवा व्यायाम केल्याने शरीरास लाघवता-हलकेपणा येतो. म्हणूनच स्थूल व्यक्तींच्यामध्ये लघु गुण वाढविण्यासाठी व्यायामाचा व पचण्यास हलके पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातोे.
* शीत – शीत गुणामुळे थांबवून, रोखून धरणे ही क्रिया घडते. हिवाळ्यात स्वेदप्रवृत्ती कमी होऊन स्वेदाचे मार्गच आकुंचन पावतात व शरीरांतर्गत उष्णता टिकून राहते ती वाताच्या शीत गुणांमुळे.
* खर – ज्यामुळे लेखनाची/खरबडून काढण्याची प्रक्रिया होते तो खर गुण. स्थूल व्यक्तीमधील मेंद संचिती कमी करण्यासाठी खर गुण असलेली त्रिफळा गुग्गुळसारखी औषधे याच कारणासाठी वापरतात.
* सूक्ष्म – वाताची कार्ये शरीरात घडून येण्यास वातदोष शरीरातील सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते.
* चल – वातदोषाच्या ठिकाणी हालचालींना प्रेरणा याच गुणांमुळे मिळते.
वाताची कार्ये ः
शरीररुपी यंत्राची सर्व कार्ययंत्रणा सुरू सुरळीत चालू राहण्यासाठी विशिष्ट तंत्राची आवश्यकता असते, जी वातदोषांवर अवलंबून असते. ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये व मन यांच्या कार्यास चालना देण्याचे कार्य वातदोष करतो. शरीरातील चयापचय प्रक्रियेत निर्माण होणारा सूक्ष्म मल नाहीसा करण्याचे कार्य वात करतो. वातदोषाची सर्व कार्ये सुरळीत चालू असेपर्यंत मनुष्य जिवंत राहतो.
पित्ताचे गुण व कार्ये
पित्ताचे गुण – सस्नेह, तीक्ष्ण, उपज, विस्त्र, सर, द्रव हे पित्ताचे गुणधर्म आहेत.
* सस्नेह – पित्ताद्वारे अन्नाचे पचन होताना अन्नाला मार्दवता आणण्यासाठी ईषत स्नेह उपयुक्त आहे.
* तीक्ष्ण – या गुणामुळे भेदनाचे सामर्थ्य स्पष्ट होते. म्हणूनच सतत तीक्ष्ण पदार्थ सेवनाने आतड्यावर क्षत, व्रण उत्पन्न होतात.
* उष्ण – उष्णतेचा संबंध साक्षात पचनाशी येतो.
* लघु – प्राकृत पचनानंतर लाघवता प्राप्त होते.
* विस्त्र – दुर्गंधीयुक्त उलटीमधील/मलास येणारी दुर्गंधी मलीन पित्ताची असते.
* सर – अन्न पचनासाठी अन्नाला चहुबाजूंनी वेढून पाझरण्याची गरज असते, ती सर गुणामुळे पूर्ण होते.
* द्रव – पित्ताच्या उष्ण, तीक्ष्ण गुणांचा अतिरेक होऊ नये ही खबरदारी द्रव गुण घेतो.
पित्ताची कार्ये – सर्व कार्यामध्ये पचन घडवून आणणे. म्हणूनच आयुर्वेदाने कोणताही आजार निर्माण होण्यामागे ‘पचन बिघडलेले असणे’ या कारणाचा निर्देश केला आहे. शरीर तापमान संतुलित ठेवण्याचे काम पित्तदोष करतो. पाहणे, रूपग्रहण करणे हे काम पित्त दोष करतो. तहान-भूक ही शरीरांतर्गत पित्ताच्या पचन कार्यावर अवलंबून आहे. मन व बुद्धी संदर्भातील पचनक्रिया सुरळीत असल्यास धारणाशक्तीही उत्तम राहते.
कफाचे गुण व कार्ये
कफाचे गुण – स्निग्ध, शीत, गुरू, मन्द, श्‍लक्ष्ण, मृत्स्न, स्थिर.
* स्निग्ध – कोणताही संयोग दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. म्हणूनच शरीर अधिक काळ टिकून राहते.
* शीत – शीत गुणाने स्तंभन होत असल्याने आवश्यक ते शरीर घटक टिकून राहतात.
* गुरू – वजन वाढायला कारणीभूत गुण म्हणजे गुरू. पचायला जड व वजनाला जड.
* मंद – मंद गुणाने धातुपरमाणूंना स्थायीभाव प्राप्त होतो.
* श्‍लक्ष्ण – नासा, मुख, कंठ, श्‍वासमार्ग, हृदय, फुफ्फुस या ठिकाणी हवा, पाणी, अन्न इ. देवाण-घेवाण सातत्याने चालू ठेवण्यासाठी गुळगुळीतपणाची आवश्यकता असते.
* मृत्स्म – या गुणाने शरीरात उपलेपनाचे कार्य घडून शरीर घटकांची हानी होण्याचे टळते.
* स्थिर – धातूंना स्थायी भाव प्राप्त करून देणे.
कफाची सामान्य कार्ये ः
संधी संश्‍लेपण, स्नेहन, रोपण, पूरण करणे. बल वाढविणे, धातूंना स्थैर्य आणणे, सहनशक्ती वाढविणे.
दोषांची स्थाने –
दोष हे सर्व शरीरव्यापी जरी असले तरी वात दोष अस्थिंमध्ये राहतो; पित्त दोष रक्त व स्वेद आणि कफ दोष रस, मांस, मेद, मज्जा, शुक्र, मूत्र, यांमध्ये राहतो. अर्थात अति तिखट, उष्ण पदार्थाने पित्त प्रकोप झाला तर रक्तदेखील दुष्ट होते. यावर सारिवा, चंदन अशी पितघ्न चिकित्सा करावी. तसेच कफाचे पुष्टी हे कार्य योग्य आहे का नाही हे पाहण्यासाठी मांस, मेदाचे लेपन पहावे लागते. म्हणूनच गुण, स्थान व कार्ये यांचे ज्ञान असणे महत्त्वाचे आहे.
त्रिदोषांची नैसर्गिक क्षय, वृद्धी क्रम ः-
वय, अहोरात्र जेवण यांचा विचार करता कफ, पित्त व वात हे अनुक्रमे आदि, मध्य व अन्त या अवस्थेत येतात. बालवयात कफ, मध्यवयात पित्त व उतारवयात वात! तसेच सकाळी ६ ते १० – कफवृद्धी; सकाळी १० ते २ पित्तवृद्धी; दुपारी २ ते संध्या ६ वातवृद्धी तसेच संध्या ६ ते १० कफक्षय, रात्री १० ते २ – पित्तक्षय व पहाटे २ ते ६ – वातक्षय. म्हणूनच सकाळी कफाची शीत गुणाने वृद्धी होत असल्याने गरम पाण्याने स्नान, उद्वर्तन, व्यायाम इ. उपक्रम सुचविले आहेत.
सकाळी १० ते दुपारी २ पित्ताची उष्ण गुणाने वृद्धी होत असल्याने हा भोजनयोग्य समय सांगितला आहे. जेवणाचा विचार करता जेवण संपताक्षणीच कफाचे आधिक्य असते. यामुळेच शरीरास जडता प्राप्त होते.
ऋतुभेदाने प्रत्येक दोष संचय, प्रकोप व प्रशम अवस्थेतून जात असतो. वाताच्या चयावस्थेत उदर पूर्ण भरण्याची भावना निर्माण होते. पित्ताच्या चयावस्थेत नख, नेत्र, मूत्र यात पिवळेपणा जाणवतो. कफाच्या चयामुळे शारीरिक उष्णता कमी होते. दोषांची चयअवस्था समजल्यास चिकित्सा करणे सोपे जाते.
ह्या त्रिदोषांची माहिती समजून घेणे कां आवश्यक आहे?
– त्रिदोश केवळ प्रकृती निर्माणास कारणीभूत नसून प्रकूपित अवस्थेत शरीर बिघडवतात. म्हणून त्रिदोषांची प्राकृत गुण, कर्म समजले तर त्यांच्या स्वास्थ्याची काळजी घेणे सोपे जाते.
– त्रिदोषांच्या प्राकृत अभ्यासावरून विकृती समजणे सोपे जाते.