भाजपच्या १२ मतदारसंघांची उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण

0
88

>> युती तोडल्याचे मगोकडून पत्र नाही : तानावडे

 

आतापर्यंत भाजपच्या १२ मतदारसंघांची उमेदवार निवड प्रक्रिया पूर्ण झाली असून १० जानेवारीपर्यंत ३७ मतदारसंघाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल व त्यानंतर प्रदेश निवडणूक समितीची व केंद्रीय निवडणूक समितीची मान्यता मिळविल्यानंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जाईल, अशी माहिती प्रदेश भाजपचे प्रवक्ते सदानंद शेट तानावडे यानी काल पत्रकार परिषदेत दिली.
आतापर्यंत पक्षाने हळदोणे, म्हापसा, साखळी, साळगांव, थिवी, शिरोडे, पणजी, शिवोली, पर्वरी, फातोर्डा, दाबोळी मतदारसंघातील उमेदवार निवडणुक प्रक्रिया पूर्ण केल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने युती तोडल्यासंबंधीचे पत्र दिलेले नाही त्यामुळे अजूनही युती अस्तित्वात आहे, असे पक्षाने गृहीत धरले आहे. असे असले तरी भाजपची संघटना सक्षम असल्याने विधानसभा निवडणूक स्वतंत्र लढविण्यासाठी पक्ष समर्थ आहे. असे सांगून मगोने अन्य पक्षांबरोबर युती केली तरी त्याचा भाजपवर परिणाम होणार नाही, असे तानावडे यांनी सांगितले.
प्रदेश अध्यक्ष विनय तेंडुलकर निवडणूक लढविण्यास इच्छूक असल्याची चर्चा सुरु असून यासंबंधी पक्षाची भूमिका काय आहे, असे विचारले असता, लोकशाहीत तशी इच्छा व्यक्त करण्याचा कुणालाही अधिकार आहे असे सांगून त्यावर आपण अधिक भाष्य करू शकत नाही, असे तानावडे यांनी सांगितले.
२०१२च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला २१ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे नेता ठरविण्याच्या बाबतीत युतीच्या घटक पक्षाला विचारण्याची गरजच नाही, असे त्यांनी एका प्रश्‍नावर सांगितले.