तुर्कीतील दहशतवादी हल्ल्यात २ भारतीयांसह ३९ मृत्यूमुखी

0
84

तुर्कस्तानमधील इस्तांबूल शहरात शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी एका नाईट क्लबमध्ये केलेल्या हल्ल्यात ३९ जण मृत्यूमुखी पडले असून ४० हून अधिक गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये २ भारतीयांसह १६ विदेशी नागरिकांचा समावेश असल्याचे वृत्त आहे.

मृतांमधील भारतीयांपैकी एकाचे नाव अविस रिझवी असे असून तो माजी राज्यसभा खासदाराचा मुलगा आहे. गुजरातमधील खुशी शाह ही अन्य मृत आहे. केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी ट्विटरवर ही माहिती दिली.
स्थानिक वेळेनुसार रात्री १.३० वा.च्या सुमारास एका नाईट क्लबमध्ये नववर्ष पार्टी सुरू असताना दोन दहशतवादी सान्ता क्लॉजच्या वेशात आले व त्यांनी बेछूट गोळीबार केला. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही संघटनेने स्वीकारलेली नाही. मृतांमध्ये दोन भारतीय, फ्रेंच, जॉर्डन, ट्युनिशिया, इस्रायल येथील नागरिकांचा समावेश आहे. या घटनेवेळी पार्टीत सुमारे ७०० जण सहभागी झाले होते. हल्लेखोरांनी हल्ल्यानंतर पळून जाण्यात यश मिळवले. पार्टीच्या ठिकाणी प्रवेश करण्याआधी हल्लेखोरांनी एक पोलीस व नागरिक यांना ठार केले होते.