जीएसआयडीसीतील भ्रष्टाचाराचे पुरावे खलपांनी द्यावेत

0
108

>> सिध्दार्थ कुंकळ्येकरांची प्रतिक्रिया

 

गोवा साधनसुविधा विकास महामंडळाने (जीएसआयडीसी) दर्जात्मक कामे केलेली आहेत. जीएसआयडीसीवर भ्रष्टाचाराचे आरोप करणार्‍यांना दर्जेदार कामे म्हणजे काय ते कळत नसावे, असे या महामंडळाचे उपाध्यक्ष व पणजी मतदारसंघाचे आमदार सिध्दार्थ कुंकळ्येकर यांनी काल या महामंडळावर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपासंबंधी प्रतिक्रिया देताना सांगितले.
कॉंग्रेस प्रवक्ते ऍड. रमाकांत खलप यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत गोवा साधनसुविधा विकास महामंडळात कोट्यवधी रु.चा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. यासंबंधी कुंकळ्येकर म्हणाले की जीएसआयडीसीत जर भ्रष्टाचार झालेला असेल तर खलप यांनी त्याचे पुरावे द्यावेत. खलप यांनी जीएस्‌आयडीसीत लक्ष घालण्यापेक्षा आपल्या बँकेवर आपले लक्ष केंद्रीत करावे, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. कॉंग्रेसवाल्यांना विकासकाम करता येत नाहीत. मात्र, विकास कामांच्या फाईल्स अडवण्यास मात्र त्यांना कळते, असा टोमणाही कुंकळ्येंकर यानी त्यांना मारला. आपली सून व पुत्र आम आदमी पार्टीत का गेलेत याचे उत्तरही खलप यांनी द्यावे, असेही कुंकळ्येकर म्हणाले.