समाजवादी पक्षातून अखिलेश यांची मुलायमसिंगांकडून हकालपट्टी

0
89

>> पक्षविरोधी कारवायांचा ठपका

 

समाजवादी पक्षातील अंतर्गत संघर्षाने काल कळस गाठला. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष मुलायमसिंग यादव यांनी आपले पुत्र व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि बंधू रामगोपाल यादव या दोघांचीही पक्षविरोधी कारवायांसाठी पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. दोघांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुलायम, त्यांचे बंधू शिवपाल यांच्याशी अखिलेश यादव आणि त्याचे काका रामगोपाल यांचा संघर्ष गेले अनेक महिने सुरू आहे. दोन्ही गट एकमेकांना शह – काटशह देत आले आहेत. दोन्ही गटांनी उत्तर प्रदेशमधील आगामी निवडणुकीसाठी आपापले उमेदवार घोषित केले होते. रामगोपाल यादव यांनी पक्षाचे विशेष अधिवेशन एक जानेवारीला बोलवले आहे. या अधिवेशनात कोणताही खासदार वा आमदार सहभागी झाल्यास त्याच्याविरुद्ध कारवाईचा इशारा मुलायमसिंग यांनी काल दिला.
रामगोपाल आणि अखिलेश यांनी स्वतंत्र उमेदवारी यादी का जारी केली अशी विचारणा त्यांना पाठवण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिशीत करण्यात आली आहे.
मुलायमसिंग यांनी ज्यांना उमेदवारी दिलेली आहे, त्यापैकी काहींना अखिलेश यांचा विरोध आहे. अखिलेश हे बुंदेलखंडाच्या दौर्‍यावर असताना घाईघाईत पत्रकार परिषद घेऊन मुलायम आणि शिवपाल यांनी ही उमेदवारांची घोषणा केली होती. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी आणखी ६८ उमेदवार घोषित केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून अखिलेश यांनी २३५ उमेदवारांची स्वतःची यादी घोषित केली होती.
‘‘अखिलेशला मुख्यमंत्री कोणी बनवले? विशेष अधिवेशन एका दिवसात बोलावण्यात आले आहे. त्याला त्याची परवानगी कोणी दिली? मला यासंबंधी प्रसारमाध्यमांतून कळले.’’ असे मुलायम यांनी सांगितले.