भाजप २५ ते २६ जागा जिंकेल

0
90

>> मनोहर पर्रीकर यांचा दावा

 

येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला २५ ते २६ जागा मिळतील असा दावा केंद्रीय संरक्षण मंत्री व गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल केला. काल सकाळी पणजी शहरात भाजपच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. तद्नंतर पत्रकार परिषदेत बोलताना राज्यातील ५८ टक्के जनतेला पुन्हा भाजप सत्तेवर आलेली हवी आहे. निवडणुकीत ४५ टक्के मते भाजपला मिळतील, असे ते म्हणाले.
सर्व चाळीसही मतदारसंघांतून निवडणूक लढवण्याची आम्ही तयारी केली आहे. मात्र, याचा अर्थ आम्ही सर्व मतदारसंघांतून निवडणूक लढवणार आहोत, असे नसल्याचे ते पुढे म्हणाले. उमेदवारीसंबंधीचा निर्णय पक्षाची राज्य निवडणूक समितीच घेत असल्याचे ते एका प्रश्‍नावर उत्तरले. बंद खोलीत ही समिती एकेका मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून उमेदवारी कोणाला द्यायची ते ठरवत असल्याचे त्यांनी सांगितले. ही समिती व्यवस्थितपणे आपले काम करीत आहे. समितीच्या कामात कुणालाही ढवळाढवळ करता येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या जाहीरनाम्याविषयी विचारले असता, आम्ही मागच्या जाहीरनाम्यातून दिलेल्या वचनांपैकी किती वचने पूर्ण केली, किती अर्धवट राहिली आहेत व किती होऊ शकत नाहीत, ते यावेळच्या जाहीरनाम्यातून स्पष्ट करणार आहोत असे पर्रीकर यांनी सांगितले. दरम्यान, कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर म्हणाले की, भाजप सरकारने राज्याचा सर्वांगीण विकास केला आहे. राज्यातील जनतेचे केवळ भाजपच भले करू शकते, हे जनतेला चांगले ठाऊक असल्याचे ते म्हणाले. कुणीही उमेदवारीसाठी हट्ट धरू नये, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. राज्यात पक्षाचे सव्वालाख कार्यकर्ते असून त्यांच्या बळावर पक्ष निवडणुकीत भरारी मारणार असल्याचा विश्‍वास पार्सेकर यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपच्या कर्नाटकमधील आमदार व चित्रपट अभिनेत्री तारा यांचेही भाषण झाले. भाजपचे गोवा प्रभारी बी. सतीश, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा, पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, उद्योगमंत्री महादेव नाईक, ग्रामीण विकास मंत्री एलिना साल्ढाणा, वनमंत्री राजेंद्र आर्लेकर, माजी आमदार मॉविन गुदिन्हो आदी मंडळी हजर होती.

‘धेंपो समूहाचा आदर्श घ्या’
धेंपो उद्योग समूहाने राज्य सरकारबरोबर केलेल्या एका करारानुसार राज्यातील दोन हायस्कूलांची जबाबदारी घेतलेली असून त्यांपैकी एक धारगळ व एक सांगे येथील असल्याचे पार्सेकर म्हणाले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून आता म्हार्दोळ येथील महालसा देवस्थाननेही एका शाळेची जबाबदारी घेण्याची तयारी दाखवली आहे. राज्यातील उद्योग समूहांनी धेंपो उद्योग समूहाच्या पावलावर पाऊल ठेवून अशा प्रकारे शाळा व हायस्कूल्स यांची जबाबदारी घेण्यास पुढे यावे असे आवाहन सरकार करीत असल्याचे पार्सेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.