संयम का सुटला?

0
129

पांडुरंग मडकईकर यांच्या पक्षप्रवेशाने आपल्या पुत्राच्या राजकीय पदार्पणात निर्माण केलेल्या अडथळ्यामुळे अस्वस्थ झालेल्या श्रीपाद यांनी आपली खदखद प्रसारमाध्यमांतून व्यक्त केली आहे. श्रीपाद यांच्या आजवरच्या राजकीय कारकिर्दीत त्यांना गोव्याच्या राजकारणापासून सतत बाजूला राहावे लागले. अनेकदा हातातोंडाशी आलेल्या संधी त्यांच्यापासून हिरावल्या गेल्या, परंतु आजवर कधी त्यांनी प्रसारमाध्यमांचा आधार घेतल्याचे दिसले नव्हते. त्यांना केंद्रात लोकसभेचे उपसभापतीपद दिले जाणार होते. त्यांना त्यासाठी दिल्लीलाही बोलावून घेण्यात आले होते. पण झारखंडमध्ये तेव्हा विधानसभा निवडणुका होणार असल्याने तेथील नेत्याला ते पद देणे अधिक योग्य ठरेल या विचाराने पक्षाने तेव्हा ते पद ऐनवेळी करिया मुंडा यांना बहाल केले होते. श्रीपाद यांनी पक्षाचा तो निर्णय तेव्हा निमूटपणे मान्य केला. पक्षाच्या सांगण्यावरूनच त्यांनी राज्याच्या मंत्रिपदावर पाणी सोडून खासदारकी पत्करली. गेल्या निवडणुकीत त्यांना पर्वरीतून गोव्याच्या राजकीय क्षेत्रात उतरवण्याचा संघनेतृत्वाचा प्रयत्न होता, परंतु ऐनवेळी माघार घ्यावी लागली, तेव्हाही आपला संयम त्यांनी कायम राखला होता. मात्र, आता आपल्या मुलाच्या – सिद्धेशच्या राजकीय पदार्पणात पांडुरंग मडकईकर यांच्या पक्षप्रवेशाने अडथळा निर्माण झाल्याने त्यांच्या संतापाचा कडेलोट झाल्याचे दिसते. मात्र, पक्षापुढे वैयक्तिक गोष्टी दुय्यम असे आजवर मानत आलेल्या श्रीपादभाऊंसारख्या ज्येष्ठ नेत्याने ज्या परिस्थितीत पक्षाला मडकईकरांना पक्षात प्रवेश द्यावा लागत आहे, तीही समजून घेणे आवश्यक ठरते. सुभाष वेलिंगकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधात एकवटलेले संघ कार्यकर्ते, सोबतीने सत्ता उपभोगूनही अंतिम क्षणी फारकत घेतलेला मगो पक्ष आणि घेरा आवळत चाललेले विरोधक यात भाजपा सध्या एकाकी पडलेला आहे. त्यामुळे सत्ता कायम राखायची असेल तर अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी शिकस्त करणे अपरिहार्य ठरले आहे. अर्थातच, प्रत्येक मतदारसंघामध्ये ‘विनेबिलिटी’ हीच अशा परिस्थितीत महत्त्वाची ठरणे उघड आहे. पांडुरंग मडकईकर किंवा मावीन गुदिन्हो यांना पक्षात प्रवेश दिला गेला आहे तो केवळ त्यांच्या जिंकून येण्याच्या क्षमतेपोटी. सिद्धेश यांच्या उमेदवारीवर जुगार खेळण्याच्या स्थितीत भाजप सध्या नाही. प्रत्येक निवडणुकीत अशा प्रकारे केवळ ‘विनेबिलिटी’ कडे पाहून इतर पक्षीयांना स्वपक्षात स्थान दिले जाते. आजकालच्या राजकारणाचे हे डावपेच श्रीपादभाऊंना ठाऊक नाहीत असे कसे म्हणायचे? मुख्यमंत्री पार्सेकर यांनी त्यांची समजूत काढताना रमाकांत खलपांच्या पक्षप्रवेशाचे उदाहरण दिले आहे ते बिनतोड आहे. खलप जेव्हा पक्षात आले तेव्हा अर्थातच मांद्रे मतदारसंघातील पार्सेकरांच्या राजकीय भवितव्यावर फार मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. परंतु त्यांनी त्यावेळी संयम राखला आणि मतदारसंघातील आपले कार्य वाढवत नेत पुढच्यावेळी त्याचे उट्टे काढले. मावीन आणि मडकईकरांच्या पक्षप्रवेशाविषयी अस्वस्थता व्यक्त करणारे श्रीपाद आजवर जेव्हा जेव्हा इतर नेते पक्षात आले, तेव्हा गप्प का राहिले, तेव्हाही कोणा ना कोणावर अन्यायच झाला ना, असे त्यांचे विरोधक आज विचारत आहेत. ‘ज्यात पक्षाचा फायदा असेल ते निर्णय मी स्वीकारले’ असे सांगणार्‍या श्रीपाद यांनी यावेळी स्वतःच्या पुत्राच्या राजकीय भवितव्यावर गदा येत असल्याचे दिसताच बंडाचे निशाण फडकवण्याच्या घेतलेल्या पवित्र्याने त्यांच्या आजवरच्या ‘पक्षहित प्रथम’ असे मानणार्‍या संयमी आणि परिपक्व नेत्याच्या प्रतिमेला मोठा तडा जाण्याची भीती आहे. पण श्रीपादभाऊंची व्यथा ही आजकालच्या सोईस्कर राजकरणात समस्त तत्त्वनिष्ठ राजकारण्यांची व्यथा आहे हेही तितकेच खरे आहे.