महिलांचे साहित्यविश्‍व शिक्षणामुळे फुलले : जोग

0
86

>> गोमंतक महिला साहित्य संमेलनाचे उद्घाटन

 

गोव्यातील महिलांना वाचन व लेखनाची आवड नव्हती. परंतु स्वातंत्र्यानंतर शैक्षणिक सुविधेचा लाभ स्त्रियांनी घेतला. स्त्री ही कुटुंबांची केंद्रबिंदू असून शिक्षणामुळे प्रश्‍न, दु:ख, भावबंध, सहनशीलता मांडण्याचा प्रयत्न काही स्त्रीयांनी साहित्यातून व्यक्त केला आहे, असे साहित्य समाजापर्यंत पोचविण्याची गरज असल्याचे उद्गार ज्येष्ठ लेखिका लक्ष्मी जोग यांनी काढले,
शारदा ग्रंथप्रसारक संस्थेतर्फे कला व संस्कृती संचालनालयाच्या सहकार्याने आयोजित १४ व्या गोमंतक महिला साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी लक्ष्मी जोग बोलत होत्या. यावेळी ‘आठवणीतली गाणी’ या मराठी गीतांच्या लोकप्रिय संकेत स्थळाच्या संस्थापक व संचालक अलका विभास (दुबई), इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. मेधा साळकर, स्वागताध्यक्ष डॉ. प्रमोद सावंत, कार्याध्यक्ष संगीता अभ्यंकर, शारदा ग्रंथप्रसारक संस्थेच्या अध्यक्षा डॉ. पूर्णिमा उसगावकर व्यासपीठावर उपस्थित होत्या.
संसारी स्त्रियांना एका बैठकीत लिहिणे कठीण असते. अशावेळी मनात येणारे विषय स्मरणवहीत टिपून ठेवले तर त्याचा लेखनात अधिक लाभ होतो. लेखन ही एक कला असल्यामुळे ती अंगभूत असावी लागते. त्यासाठी विशिष्ट भाषा ठेवण्याचे तंत्रही आत्मसात करावे लागते असे सौ. जोग यांनी सांगितले. कागदावर उतरवणे हे एकप्रकारचे कौशल्य आहे. बोलणे, ऐकणे, वाचणे, संवाद व लेखन या भाषिक कौशल्याच्या पायर्‍या आहेत. या पायर्‍या चढण्यात यशस्वी झाल्यास चांगले साहित्य पुढे जाऊ शकते असे त्या म्हणाल्या.
अलका विभास यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. डॉ. प्रमोद साळगावकर यांनी स्वागत तर डॉ. पूर्णिमा उसगावकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्या शिकेरकर यांनी केले. लक्ष्मी जोग यांच्या हस्ते स्मरणिकेचे विमोचन करण्यात आले. उद्घाटन सत्रानंतर ‘परिसंवाद’ या सत्रात ‘सामाजिक कार्य : बदलता दृष्टीकोन, स्वरुप व व्याप्ती’ तर तिसर्‍या सत्रात कवयित्री संमेलनात अनेक महिलांनी सहभाग घेतला होता.