आम्ही (बि)घडलो!

0
284

– विनायक विष्णू खेडेकर

जन्माला आलेला अर्भक म्हणे साधारण अडीच किलोचं असतं. माणसाच्या मृतदेहाचे जळून राहिलेले अवशेष म्हणे जवळजवळ तेवढ्याच वजनाचे शिल्लक राहतात. याचाच अर्थ, माणसांचा भार भूमीला होत नाही, मग तो घडलेला असो वा बिघडलेला. तर भूमीला भार होतो तो सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणीय संतुलन बिघडविणार्‍यांचा.

घडतं ते बिघडतं, कधीकधी बिघडता बिघडता घडतं. बिघडणं सब्जेक्टीव्ह असावं अनेकदा. कारण खरी घडत असलेली, स्वतःला घडवू पाहणारी; पण आपल्या इच्छेविरुद्ध गेली की ती मुलं बिघडली म्हणायची पध्दती. आम्हालाही वाटतं, खरं काय झालं, आम्ही घडलो का बिघडलो? मग आम्ही म्हणतो, आम्ही (बि)घडलो, तुम्ही (बि)घडा ना. अनेक घटना अखंड घडत असतात. काही घडवणार्‍या, काही बिघडवणार्‍या. पुनः हे बिघडणंही कधी तेवढ्या कालापुरतं. त्याचा नाही होत परिणाम आपल्या एकूण जीवनावर.
घडता घडता घडेल ते प्रमाण, असा एक वाक्‌प्रचार आहे. घडायचं ते घडत राहतं, जे घडलं त्याचा स्वीकार करा असं काहीस विकणारं हे वाक्य. घडणारं कधी थोपविता येतं का? असं घडायला नको होतं- म्हटल्याने त्या विशिष्ट घटित वा दुर्घटनेची तीव्रता कमी होत नाही. घडणं थांबत नाही. एखाद्या माणसाची जडण-घडण कशी होते सांगता येत नाही. तद्वत् घडू म्हणणारं पूूर्णतः घडल्याखेरीज अर्ध्यावर थांबत नाही, कधी बिघडून जाणारं घडणं त्या घडण्यातच विरतं तरी…
‘रायगडला जेव्हा जाग येते’ या वसंत कानेटकरांच्या नाटकात शिवाजीच्या तोंडी एक छान वाक्य आहे, ते संभाजीच्या संदर्भात, ‘‘लहान मूल म्हणजे मातीचा गोळा. आकार द्यावा तशी मूर्ती घडते.’’ तुमच्या-आमच्या जीवनात हा आकार देणंच बिघडतं, राहून जातं, दुर्लक्ष होतं नकळल्यानं, बिघडणं बघण्याचं नशिबी येतं.
लोकवेदात दिवा कसा घडला याचं जे वर्णन येतं, त्यांत :
दोन शेर गे शेर इंगळे,
तीन शेर गे काशें शींशें,
घडणार्‍यांनी दियो घडियालो.
दिवा घडवण्याचं काम त्यांनीच केलं ज्यांना घडवणुकीचं पूर्णतः ज्ञान होतं. म्हणजेच काहीही घडवायचं तर त्यासाठी प्रथम स्वतःला घडवलं पाहिज, नपेक्षा बिघडलेलंच घडणार, हे विसरलं जातं.
चालू उदाहरण, मुलाच्या हातचा स्मार्टङ्गोन काढून घेऊन त्याला अभ्यासाला बसवायचं आणि आपण त्यावर खेळत राहायचं. यातून कोण घडतं, कोण बिघडतं हे सांगणं कठीण. विसरून चालणार नाही की घडण्यासाठी प्रचंड ताप सहन करावा लागतो. चिन्नी-हातोड्याचे प्रहार दगडावर घडतात. त्यातूनच शिलामूर्ती घडत असते. म्हणून तुकारामांनी म्हटलं-
मस्तकी सहावे टाकीयासी जाण,
तेव्हा देवपण सोसावे ते|
घाव झाल्यानं रक्त उसळून बाहेर यावं तसा पांढर्‍या धुळीचा लोट बाहेर येतो, आसमंत भरतो. त्या शिल्पीलाही कणभर तरी या धुळीचा त्रास होतो. त्याचा श्‍वास गुदमरतो. पण अखेर मूर्ती घडल्याचं, घडविल्याचं समाधान त्याला मिळतं.
हीच परिस्थिती लाकूडकामाची. आमच्या भाषेत ‘विन्ने’, ‘कुट्टी’, ‘चिन्ने’, ‘किसूळ’, ‘गिरबो’ – ही चार आयुधे वेगवेगळ्या पद्धतीनी लाकडावर ङ्गिरतात. लाकडाचे टवके आणि भुसा इतस्ततः पसरतो. पण त्यातून घडते ती जीवनावश्यक वस्तू वा दिवाणखाना शोभवणारे ङ्गर्निचर. न केवळ एवढं पण या लाकडाच्या मूर्ती घडत होत्या. एकेकाळी गोव्यातील बेताळ देवाच्या तमाम मूर्ती लाकडाच्या होत्या. राम, कृष्णांच्या मूर्ती तर नेहमीच लाकडाच्या. त्या घडताना किती प्रहार सहन करावे लागले असतील त्या लाकडाला, सांगणे कठीण आहे. पण अखेर यांतून घडलेली मूर्ती देवस्वरूपात विराजमान होते, त्यावेळी त्या लाकडालाही धन्य वाटत असावं ज्या झाडापासून ते लाकूड आलं त्यालाही कृतकृतेचा स्पर्श झालाच असला पाहिजे.
मातीचंही असंच. काही घडवायचं असेल तर भूमीचे लचके तोडायचे, तेसुद्धा अशा ठिकाणी जिथं या भूशरीराचा भाग मऊसूत असेल. त्याला म्हणायचं चिकणमाती. ती खणून आणायची. पाणी टाकून यथास्थित तुडवायची. गोळे करून ठेवायचे आणि मगच तिचा वापर, न केवळ देवमूर्तीसाठी पण घरातील यच्ययावत भांडीकुंडी, साधनसुविधा मातीच्याच. गोव्यानं ज्या स्वरांत व तालात आणि शब्दात तसेच वस्तूत, मृत्तिकास्तोत्र गायलं, तसं अख्ख्या आर्यावर्तात कधीच नाही गायलं गेलं. त्या मातीचीच बनतात घुमट, म्हादळे ही वाद्ये. मातीतून उगवलेली रोयण ही भूदेवता सातेर, मातीचे बनते दिवज, माले, पायक देवासाठी घोडे, गौरी, गणपती आणि असं खूपच काही. धरून विशिष्ट आकार प्रकार विकारांची भांडी. हे सारं अखेर मातीच्याच कु शीत जाणारं. पुनःश्‍च मातीत विलीन पावणारं.
विसरून चालणार नाही की आम्ही घडलो वा बिघडलो तरीसुद्धा अखेर शिरणार त्या मातीच्याच रंध्रारंध्रांत. जन्माला आलेला अर्भक म्हणे साधारण अडीच किलोचं असतं. माणसाच्या मृतदेहाचे जळून राहिलेले अवशेष म्हणे जवळजवळ तेवढ्याच वजनाचे शिल्लक राहतात. याचाच अर्थ, माणसांचा भार भूमीला होत नाही, मग तो घडलेला असो वा बिघडलेला. तर भूमीला भार होतो तो सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणीय संतुलन बिघडविणार्‍यांचा.
घडतं कधी-कधी असं; असं निघून जाणारं आयुष्य लाभलेल्या कुण्या एकाची, म्हणजे आमचीच हो….चित्तरकथा. क्रमशः