नावीन्य अनुभवांचे…

0
233

– सौ. पौर्णिमा केरकर

आयुष्यात त्या-त्या वेळी येणारे क्षण त्याचवेळेला समरसून जगावेत. नपेक्षा सुटून जातात माणसे आयुष्यातून, तसेच निसटून जातात क्षण जगण्यातून. जीवनभराची खंत मात्र मनात ठणकत राहते. आठवण करत राहते- त्याचवेळेला जर तू ती गोष्ट केली असतीस तर…?

पौषातल्या पौर्णिमेचे हवेतील गारठा लपेटून झाडाझाडांवर, पाना-दगडा-मातीवर शिंपडलेले प्रसन्न चांदणे… याच वेळेला भोवतालचा परिसरही प्रसन्न, प्रगल्भतेच्या नैसर्गिक-सांस्कृतिक वैभवावर अधिराज्य गाजवल्यासारखाच. स्वतःच्या धुंदीत भातशेतीची सळसळ, आंबा-फणसाचा बहर मिरवत स्मृतींचा सुखद प्रवास या भारलेपणाशी समरस होत जातो. वातावरणात असं काही वेगळेपण भरून राहिलेलं असतं की एक धुंद करत जाणारे संगीत अंगागाला रोमांचित करून सोडते. सुंदरशा कलाकृतींच्या निर्मितीप्रक्रियांमागची प्रेरणा, हे असंच वातावरण असावं का, असा प्रश्‍नसुद्धा मनाला पडल्यावाचून राहत नाही. पौषातील पुनवेच्या रात्री या गावागावांतील धालोत्सवाच्या गजबजीने सजलेल्या. बायका-पोरे, जुनी-जाणती माणसे अगदी उत्साहाने ओसंडून वाहतात ती याच पाच रात्री.
धालोत्सव म्हटला की वीस वर्षे तरी मला मागे जावे लागते. आमच्या गावातील संपूर्ण गावाचा एकुलता एक होणारा धालोत्सव. एकुलता याचसाठी की एरव्ही गावातील अनेक वाड्यांवर हा उत्सव होतो, पण पालयेत मात्र एकाच वाड्यावर हा उत्सव व्हायचा. तिन्हीसांजेला जरा लगबगीनेच सगळे आवरून बायका अंगावर गोधडी, चादर लपेटून, कडेवर एखादं-दुसर्‍या मुलाला घेऊन गुणगुणतच बाहेर पडायच्या. संपूर्ण रात्रच जागवायची. मध्येच अर्धवट सोडून मांडावरून कोणीही येता कामा नये असा अलिखित नियम असायचा. परंपरेने घालून दिलेले नियम मोडण्याचे धाडस मात्र त्यावेळी कोणीच दाखवीत नसे. त्यामागे मनापासूनची श्रद्धा होती. आता हे सगळेच आठवण्यामागे झपाट्याने बदलत चाललेली मानवी मनोवृत्ती अनुभवताना कित्येक प्रसंग असेही जगण्यामध्ये येतात की मग मनात विचार येतो माणसे अशी कोरडी, रुक्ष जगतात तरी कशी?
जीवनाला पुनः पुन्हा अनाथ करणारा हा काळ आहे का? जगण्यासाठीची लगबग सर्वत्रच दिसते, पण त्यामागचे प्रयोजन मात्र अभावानेच जाणून घेतले जाते. म्हणून तर मग एक भरकटलेपण सर्वांगाने भरून राहते. आता ज्यांच्या वयाने पन्नाशी गाठलेली आहे त्यांनी एक समृद्ध बालपण अनुभवलेले आहे. त्या वयात जत्रा, कालो, शिगमो, धालो यांचा भरभरून आस्वाद घेत बालपणाला मोठे केले. घरातील मोठी माणसे जीवनव्यवहारातील प्रत्येक कृतीत सर्वांनाच सामील करून घ्यायची. त्यामुळे नकळतपणे कोवळ्या मनावर सामूहिक संस्कार व्हायचे. खाऊ असेल तर तो सर्वांनी मिळून खायचा. मोठ्यांना आदर द्यायचा, गावातील सण-उत्सव-परंपरांचा मनःपूर्वक आस्वाद घ्यायचा. परीक्षेचा आजच्यासारखा बाऊ कधी केला नसल्याने परीक्षेपेक्षाही गावातील जत्रा मोठी असायची. दुसर्‍या दिवशीचा पेपर आदल्या रात्रीचे संपूर्ण जागरण करणारे दशावतारी नाटक बघूनच लिहिला जायचा. पेंगुळलेल्या डोळ्यात नाटकातील खलनायकाचे गडगडाटी हास्य यायचे आणि डोळे खाडकन उघडायचे. वर्षाच्या शेवटी पास व्हायला व्हायचे हाच मोठा आनंद असे. त्यामुळे स्वप्नांचे, अपेक्षांचे, दप्तरांचे ओझे मनातनावरही नसायचे. जगण्याचा मुक्त आनंद देखणेपणाने सजवला जायचा. घराला घरपण असायचे. चुलत-सख्खी सगळीच आपुलकीच्या धाग्यात बांधलेली होती. म्हणूनही भांडणातून, रुसव्याफुगव्यातून नाती वृद्धिंगत व्हायची. जीवनाशी जोडलेपण निर्माण व्हायचे. सारेच समूहाचे ही भावनाच मनीमानसी दृढ असल्याने संकुचितपणा मागे सरायचा. काही बघायचे, काही ऐकायचे, काही दाखवायचे, काही शिकवायचे, तर काही स्वतःही शिकत जायचे ही सहज प्रक्रिया वाढत्या वयाबरोबर वाढत जायची. त्यामुळे नैराश्य, ताण कोवळ्या वयात कोसो मैल दूर असायचे. धावण्या-नाचण्याचे वय अंगणभर हुंदडत असायचे. बालपण निरागसेने कवेत यायचे…
आता प्रवाह तर वेगाने बदलतोय… एवढ्या झपाट्याने परिस्थिती बदलत आहे की सगळेच निव्वळ प्रतिष्ठेसाठी, वरवरच्या दिखाव्यासाठीच का? जत्रा-कालो-धालो मध्यंतरीच्या काळातील मरगळीनंतर नव्याने ओसंडून वाहतात. पण त्यात मिरवणे-दिखावटीपणाच जास्त दिसतो. मान-अपमानाच्या वादात देवालासुद्धा बंदिस्त केले जाते. आणि मुलांना मात्र अभ्यासाच्या नावाखाली सहभाग दर्शविणेही दुरापास्त केले जात आहे. जीवनमूल्ये, संस्कार हे सगळेच धालोच्या-शिगम्याच्या मांडावरून घराघरांत शिरायचे. पण कोवळ्या, तरुण पिढीसाठी याचे दरवाजेच आम्ही बंद करून टाकलेले आहेत. जीवनातील नीतिसंपन्नता ही कलात्मक आविष्कारातून साधली जात असताना आपल्या आजूबाजूला काय घडले आहे, आपल्या जगण्यावर त्याचा कितपत प्रभाव पडलेला आहे हेसुद्धा माहीत नसावे, हे तर अधिकच घातक ठरणारे.
धालोच्या माध्यमातून हे चिंतन झाले त्यालाही काही कारणे आहेत. नृत्य, नाट्य, संगीत, अभिनय, खेळ, गायन, समाजभान, निसर्गज्ञान, परिसर अभ्यास वगैरे सर्वांचेच प्रतिबिंब पडते ते या उत्सवात. फुगडीसारख्या लोकनृत्याचे उगमस्थान म्हणजे हा धालोमांड. एका बाजूला मोठ्यांचे नृत्य चालू असते तर दुसर्‍या बाजूला घराघरांतील आबालवृद्ध घोळक्या-घोळक्यांनी शेकोटी पेटवून, अंगावर कांबळ, गोधडी, चादर लपेटून बसलेले. चहा-भज्यांचा आस्वाद घेत मस्तपणे सर्वांचेच जीवन सजवणे चालू असायचे. दुसर्‍या बाजूला मुलांचा गोंधळ, आरडाओरड, खेळ, मारामारी- एक मुक्त आनंद. तिथे कसलेही ओझे, दडपण नाही की प्रतिष्ठितपणाची झुलही पांघरलेली नसायची. असे मुक्त बालपण मीही अनुभवलेय. धालोत्सवाने तर अपरिमीत सुख दिले. ‘दारातले मिरयेली गे, मिरया झाला भार गे, माणार येता रवळनाथ देव सत्रेकार गे…’ त्याचप्रमाणे ‘दारातला आंबा गे, तवरांनी झेले गे, वनदेवता माया माणार येता परसादी बोले गे.’ मिरवेलीचा बहर-भार, आंब्याचा चवर ओळखायला शिकवले ते या धालोगीतांनी. या गीतांत वायंगणी शेतीची प्रक्रिया सांगणारे गीत होते. या गीताची नव्याने ओळख झाली ती लग्नानंतर लोकसाहित्याच्या संशोधनाच्या निमित्ताने.
वारखंड-फोंडा येथील विश्‍वनाथ नाईक यांच्या कलेप्रती निष्ठा बाळगलेल्या घराने मला यातील वेगळेपणाचे मर्म शिकविले. लोकनायिका चंद्रावती तर कलेच्या निस्सिम उपासक. प्रत्यक्षात मांडावरील तिचा, मोगाबायचा वावर म्हणजेच एक उत्साही पर्वणी होती. रात्रीच्या नीरव शांततेत लयबद्ध नृत्य-गायन यांची अशी अदाकारी पेश व्हायची की पेंगुळल्या डोळ्यांतही सडसडीत तेज उतरायचे. असाच टवटवीतपणा मी अनुभवला तो सांगे-नेत्रावळी परिसरातील नुने, वेर्ले, तुडव, सालजिणीसारख्या गावांत. नुनेची तोळयो गावकर… एक उत्साहमूर्ती. संंघर्ष, कष्ट याने सुकून, पिचून काटकुळा झालेला देह, परंतु काटक, चिवट, कणखरता मात्र रोमरोमी भिनलेली. आम्ही तिच्या भेटीसाठी येणार हा निरोप तिच्यासाठी मोठी उत्सुकता होती. तिन्हीसांजेला कुठेतरी घरी पोहोचलेला देह. डोंगरावर लाकडे आणण्यासाठी आपल्या सखी-शेजारणीबरोबर गेलेली ती. घरी येऊन रांधा-वाढा करेपर्यंत रात्रीचे नऊ-साडेनऊ वाजलेले. एवढ्यातच आम्ही तेथे पोहोचलो. झोपण्यास गेलेल्या आपल्या शेजारणींना बोलावून आणून अगदी मनापासून मस्त नृत्य करून दाखवले.
एक म्हावळींग पिकलेले, पिकलेले
गवळ्यादादान जिकलेले, जिकलेले
गवळीदादा चोर चोर, आमी खेळता मोर मोर
मोराच्या माथ्यार दिवटुलो, आम्ही भयणी खेळटुल्यो
त्यांचा हा उत्साह रात्री अकरा-बारापर्यंत ओसंडून वाहत होता. या उत्स्फूर्त प्रवाहाला मध्येच अडविण्याची आम्हालाही इच्छा नव्हती अन् एवढे थकून येऊन त्यांनासुद्धा परत परत गाणी म्हणून दाखवावीत, नृत्य करावे असे मनापासून वाटले होते. शेवटी नाईलाजाने थांबावे लागले. आम्हीही निरोप घेतला ‘परत नक्की येऊ’ असे आश्‍वासन देऊन! आता वाटते, आयुष्यात त्या-त्या वेळी येणारे क्षण त्याचवेळेला समरसून जगावेत. खूप गोष्टी नंतर करण्यासाठी म्हणून ठेवतो आणि करायचे राहूनच जाते. सुटून जातात माणसे आयुष्यातून तसेच निसटून जातात क्षण जगण्यातून. जीवनभराची खंत मात्र मनात ठणकत राहते. आठवण करत राहते- त्याचवेळेला जर तू ती गोष्ट केली असतीस तर…? आता विचार करूनही या गोष्टी काही आवाक्यात येणार्‍या नाहीत. पण हे सांस्कृतिक संचित मात्र माझ्या जगण्याला उन्नत करत गेले. संशोधनाच्या निमित्ताने या प्रदेशातील अनेक ग्रामीणजनांनी माझ्याशी माणूसपणाचे नाते जोडले. धालोत्सवाचा मांड हा तर सर्जक, सृजनाचे प्रतीक म्हणून कायमचाच जोडला गेला. कोणताही काळ हा सर्वगुणसंपन्नतेचा असतोच असे नाही, परंतु नव्याने प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेत समृद्ध होता आले तर त्याच जीवनाला नव्याने भिडू शकतो हे निश्‍चित!