श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेचा चढता आलेख…

0
171

– सौ. लक्ष्मी जोग

 

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके |
शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ॥

श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेचे १४ वे महिला साहित्य संमेलन उद्या होणार आहे. या संस्थेचं कार्य मी अगदी जवळून पाहिलं आहे. साहित्य संमेलन हा साहित्याचा जयजयकार करण्याचा दिवस असतो. जागर असतो. अशा जागरातूनच नव्या साहित्यिकांना नवप्रतिभेचे पंख फुटतात. त्यांच्या लेखनाच्या ऊर्मी जाग्या होतात. वाचकांनाही प्रतिभावंतांच्या सहवासात एक दिवस घालवल्याचा आनंद मिळतो. म्हणूनच साहित्य परिमळ समाजात दूरवर पसरावा यासाठी अशा साहित्य संमेलनाचं आयोजन आवश्यक असतं. त्या निमित्तानं लेखक व वाचक यांच्या विचारांचं आदान-प्रदान होतं. साहित्य निर्मिती करताना लेखक आपली जीवनदृष्टी, त्या त्या पात्र व प्रसंगातून व्यक्त करत असतात. त्यामुळेच लेखननिर्मिती मागे त्याची जीवनदृष्टी, सौंदर्यदृष्टी आणि मूल्यभान असतं. हे मूल्यभान सतत वर्धिष्णू होत रहावं. मी, माझं कुटुंब व माझाच समाज हे वर्तुळ भेदून संकुचित वर्तुळाबाहेरची मानवता आणि करुणा लेखनाची प्रेरणा व्हायला हवी. आपण करूण दृश्य पाहून जरूर कळवळतो, ‘अरेरे!’ म्हणतो. पण लक्ष्मीबाई टिळक तेवढंच लिहून थांबल्या नाहीत तर मनातल्या करुणेवर त्यांनी उतारा शोधला. भीक मागणार्‍या मुलींना स्वतःच्या घरात ठेऊन घेतलं आणि त्यांना नवजीवन दिलं. देश, काळ व जातीधर्माच्या भिंती ओलांडून निखळ मानवता व करुणा हे जीवनमूल्य त्यांनी प्रत्यक्षात आणलं. हेच जीवनमूल्य वाङ्‌मय निर्मितीच्या केंद्रस्थानी राहिलं तर विश्‍वमांगल्याचं स्वप्न साकारणारं सत्य, शिव व सुंदराचा वेध घेणारं साहित्य आपोआप निर्माण होईल.
आपण ज्या समाजात राहतो तो समाज सर्वार्थानं चांगला असावा असा विचार सतत आपल्या मनात असतो. ज्या समाजात समृद्धी आहे, परस्परांत सुसंवाद आहे, न्यायबुद्धी व सहिष्णुता आहे, कलागुणांविषयी आदर आहे असा समाज चांगला असं आपण म्हणू शकतो. पण वस्तुस्थिती तशी नसते. कुठल्या ना कुठल्या कारणानं समाज अस्वस्थ असतो. आजकाल चांगल्या गुणांच्या, चांगल्या कार्याच्या, चांगल्या निर्णयाच्या विरोधातसुद्धा लोक रस्त्यावर येतात हे पाहून दुःख होतं. समाजाची मानसिकता किती खालच्या पातळीवर गेली आहे ते कळतं. असो.
गोमंतकापुरतं पाहिल्यास स्त्री-शिक्षणाच्या बाबतीत महाराष्ट्रात जसे महर्षी कर्वे व बाया कर्वे किंवा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांनी तळमळीने प्रयत्न केले तसे प्रयत्न इथं झाल्याचं दिसून येत नाही. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात गोमंतकीय बहुसंख्य स्त्रिया शिक्षणापासून वंचित राहिल्या आणि पर्यायाने वाचन-लेखनापासूनही तुटल्या गेल्या. माझ्या सासुबाई निरक्षर होत्या. त्यांच्या पिढीतील बहुतेक स्त्रिया अशिक्षितच होत्या. माझ्या सासुबाईंची एक मैत्रीण एकदा आमच्याकडे आली होती. ती वृत्तपत्र हातात घेऊन मोठी अक्षरं क ट प अशी अडखळत वाचत असलेली मी पाहिली. तिला वाचत असलेली पाहून मला थोडं आश्‍चर्य वाटलं. मी तिला विचारलं, ‘‘मावशी! तुम्हाला वाचताना पाहून मला खूप बरं वाटलं. पण आमच्या आईंना तुमच्याबरोबरच्या असूनसुद्धा अक्षरओळख नाही. असं कसं?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘त्या काळी मुलींनी शिकायचंच नाही अशीच मानसिकता सगळ्यांमध्येच होती. त्यात ती खेडेगावातली. आमच्या घरी माझ्या भावांना शिकवायला मास्तर येत. तेव्हा दाराआड राहून मी ते ऐकत असे व आसपास कुणी नाही असं पाहून एखाद्या पाटीच्या तुकड्यावर अक्षरं काढून बघत असे. पुढे लहान वयातच लग्न झालं. त्यामुळे ते सगळं विसरलं. पण आता मी वाचण्याचा प्रयत्न करते. ‘‘मला तिचं खूप कौतुक वाटलं. तिची इच्छा असूनही तिला शिकता आलं नव्हतं. यावरून आपल्याला त्या आधीच्या स्त्रियांची स्थिती कशी असेल याची कल्पना येते. कारण वाचनच माणसाला लेखक बनवतं.
आपल्याला जे वाटतं ते कागदावर उतरवणं हे कौशल्य आहे. किंबहुना लेखन हे सर्वोच्च प्रतीचं भाषाकौशल्य आहे असं म्हटलं तर ते चूक ठरू नये. ते सर्वांनाच जमतं असं नाही. बोलणं, ऐकणं, वाचणं, संवाद व लेखन या भाषिक कौशल्याच्या पायर्‍या आहेत. त्या सहजपणे चढता येत नाहीत. पण जर त्याचा ध्यास घेतला, नेट लावला, तर आपण पुढे जाऊ शकतो. आपल्याला हा सृजनाचा वर देवानं दिला आहे हे कितीक जणांना उमगतच नाही. मी स्वतः पन्नाशीनंतर लिहू लागले. भजनस्पर्धेत बक्षिस मिळाल्याचा आनंद वर्णन करणारा एक लेख वृत्तपत्राला पाठवला व तो प्रसिद्ध झाला. हाच माझ्या जीवनाचा ‘टर्निंग पॉईंट’ ठरला. माझा जणू पुनर्जन्मच झाला. या लिहिण्यामुळे मला माझी ओळख झाली. खूप विद्वत्तापूर्ण नसेल पण जे मनात साठतं ते सागदावर उतरवू शकते याचा मला नव्यानं शोध लागला. हा शोध अत्यंत आनंददायी होता. लिहून पाठवलेलं वृत्तपत्रात छापून आल्यानंतर पुन्हा ते वाचताना स्वतःचं जे कौतुक वाटतं त्याला तोड नाही. मला वाटतं साहित्याची आवड असेल आणि कष्ट घ्यायची तयारी आणि चिकाटी असेल तर लेखन कला साध्य होतेच. काही वेळा एकच लेख तीन-तीनदा लिहिल्यानंतरच मनासारखा उतरतो. प्रत्येक वेळी नवीन काही सुचलं की पुन्हा लिहावं लागतं. मग लिहिलेल्या विषयाला न्याय दिला आहे अशी खात्री झाल्यावर ते फायनल होतं.
आपल्यासारख्या संसारी स्त्रियांना एका बैठकीत लिहिणं शक्य होत नाही कारण त्या वेळेत अनेक अडथळे असतात. फोन, अकस्मात येणारे पाहुणे यांमुळे मध्ये उठावच लागतं. अशा वेळी मनात आलेल्या विषयाला धरून ठेवावं लागतं. कधी स्वयंपाक करताना तर कधी अन्य कामे करताना काहीतरी छान सुचतं. त्यावेळी ते लिहिणं शक्य नसतं. मग आपण मनात म्हणतो, ‘‘हे लक्षात ठेवून त्याचा उपयोग अमूक ठिकाणी लिहिताना करीन.’’ पण दुर्दैवाने ते पुन्हा आठवत नाही. त्यासाठी जर एखादी स्मरणवही हाताशी ठेवली तर तिचा छान उपयोग होतो. मी माझ्या बर्‍याच मैत्रीणींना लिहिण्याबद्दल सांगत असते. पण एक-दोन लेखांपलीकडे त्यांची मजल जात नाही. कारण चिकाटीचा अभाव. चित्रकलेचे, शिल्पकलेचे, गायनाचे, अभिनयाचे प्रशिक्षण घेता येते. क्लासेस-कोर्सेस असतात. कथालेखन, काव्यलेखन यांच्याही कार्यशाळा घेतल्या जातात. पण त्याचा परिणाम फारसा झालेला दिसत नाही. लेखन ही एक कला असल्यामुळे ती शिकवता येत नाही. ती अंगभूत असावी लागते. त्यासाठी विशिष्ट भाषा ठेवण तंत्र आत्मसात करावे लागते.
गोमंतकापुरते पहायला गेल्यास इथल्या स्त्रियांत वाचन-लेखनाची आवड कमीच दिसते. स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाची गंगा भेदभाव न करता गावागावांत पोचली आहे. स्त्रिया शिकून सवरून अर्थार्जन करू लागल्या. प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपला चांगलाच ठसा उमटवला. त्या मानाने साहित्य क्षेत्रात मात्र काही मोजकी नावे सोडली तर प्रभाव दिसत नाही. स्वातंत्र्यपूर्व काळात तर स्त्रियांना शिक्षणाची दारे बंदच होती. शहरात काही श्रीमंत व प्रतिष्ठित घरात घरी मास्तर ठेवून शिकवत असत. तरीही मुलींना तिथे प्रवेश नव्हताच. असं जरी असलं तरी स्त्रियांची जिज्ञासू वृत्ती शांत बसली नव्हती. शिक्षण सोडून अन्य बहुतेक विषयाला त्या स्पर्श करीतच होत्या. घरकाम करताना, शेतीत राबताना किंवा कुळागरातील कष्टाची कामे करताना आपल्या घरातील वडिलधार्‍या स्त्रियांकडून त्या गाणी शिकत. कीर्तनकारांची जशी एकेका प्रसंगावर आख्याने असतात तशी एकेका व्रतावर, एखाद्या पौराणिक प्रसंगावर २०/२५ कडव्यांची गाणी असत. ती त्या शिकून मुखोद्गत करीत. उदा. सोळा सोमवार व्रत, एकादशी व्रत वगैरे. त्याचप्रमाणे चिलया बाळ, चिंधी, गौर अशा प्रसंगांवर सुद्धा गाणी आहेत. ती तोंडपाठ करून कामधाम करताना म्हणत. एका स्त्रीच्या मुखातून ऐकून ती पाठ करण्यात बराच कालावधी जात असे. वेळप्रसंगी ती म्हटली जात. गोवा स्वातंत्र्य चळवळीच्या काळात अनेक गोमंतकीय कन्या त्या संघर्षात धीटपणे उतरल्या होत्या. काहीजणी चळवळीतल्या लोकांना नाश्ता, जेवण पुरवीत. निरोप पोचवत. या संघर्षात एकेका घरातले दोन दोन कर्ते पुरुष सुद्धा तुरुंगात असत. घरादारावर तुळशीपत्र ठेवूनच ते या लढ्यात उतरत. तुरुंगात गेल्यानंतर घर्‍च्या स्त्रिया संपूर्ण घराची जबाबदारी उचलीत. शेती-बागायती, गुरेढोरे, घरातली मुलेबाळे वृद्ध माणसं यांचा यशस्वी पणे सांभाळ करीत. माझ्या माहितीतल्या एका कुटुंबातले तीनही मुलगे तुरुंगात गेले होते. त्यांच्या घरी त्यांचे वृद्ध आई-बाप, एकाची नवविवाहित पत्नी व छोट्या तिघी बहिणी असा परिवार होता. त्या घरातील वृद्ध आईने आपल्या नवपरिणित सुनेच्या सहाय्याने तब्बल तीन वर्षे घर सांभाळलं. अतिशय कर्तबगार अशा त्या बाईने तिचा वृद्ध नवरा याच कालावधीत वारला तेव्हा ‘‘मी असताना तुम्ही का घाबरता? स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलेल्या तीन पुत्रांची मी माता आहे! घाबरण्याचं कारण नाही!’’ असं सांगत सगळ्यांना धीर दिला होता. अशा स्त्रिया त्यावेळी घराघरात होत्या. खुद्द माझ्या घरात माझे काका व वडील तुरुंगात होते व काकू व आई गरोदर होत्या. तरीही न डगमगता त्यांनी सगळ्याला तोंड दिले. या स्त्रियांना कुठून एवढं धैर्य मिळालं असेल? लिहायला-वाचायला येत नव्हतं. कामाशिवाय घराबाहेर पडण्याची त्यावेळी पद्धतच नव्हती. भेटीगाठीही होत नसत इतर कुणाशी. तरीही त्यांचं मनोधैर्य वाखाणण्यासारखं होतं. अशा काळात घरी असणार्‍या कुटुंबियांना मग्रूर पोर्तुगीज सोल्जर्स खूप त्रास देत. वेळी-अवेळी येऊन चौकशी करीत. दमदाटी देत. घाबरवून सोडत. पण त्यांना या मर्दानी स्त्रिया भीक घालीत नसत. या ठिकाणी एक नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ‘मालपेकर’ नावाच्या एक बाई. परकियांच्या हाती पडू नये म्हणून रात्रभर गवताच्या गंजीत दडून राहिल्या होत्या. ‘भारत’कार हेगडे देसाई या चळवळीत तब्बल ३६ वेळा तुरुंगात गेले होते. जाज्वल्ल्य जीवन निष्ठा आणि दैदीप्यमान कार्य यांमुळे त्यांची तेजोमय प्रतिमा जनमानसात आहे. त्यांनी चालवलेल्या ‘भारत’ या मतपत्रातून ते पोर्तुगीजांच्या जुलुमी राजवटीविरुद्ध आवाज उठवायचे. त्यासाठी पुष्कळ पदरमोड करावी लागायची. एका वेळी त्यांच्या पत्नीने स्वतःचं सगळं स्त्रीधन त्यासाठी दिलं होतं. असा त्याग करण्याची तयारी त्यावेळच्या स्त्रियांची होती. त्या काळात स्त्रियांकडून प्रत्यक्ष साहित्य निर्मिती अगदीच कमी झाली असे आपण म्हणतो पण जिथे पुरुषवर्गालाच शिक्षण मिळत नव्हतं किंवा त्यांना पुणे-मुंबईसारख्या ठिकाणी शिक्षणासाठी जावे लागे तिथे स्त्रियांची काय कथा?
तरीही सोळाव्या-सतराव्या शतकात कांही स्त्रियांनी काव्यनिर्मिती केली. त्यांत गोकुळाबाई तळावलीकर, गोदावरीबाई विष्णू नाईक, सीताबाई कुंडईकर यांची नावे सांगता येतील. पुढे् १९२० नंतर लीलावतीबाई तारकर-पेडणेकर हे एकच नाव उपलब्ध आहे.
त्याकाळी केरी येथील सरस्वतीबाई वैद्य यांनी ‘‘हळदी कुंकू’’ नावाचं नियतकालिक सुरू केलं होतं. त्या संपादक म्हणून काम करत आणि आपल्या मैत्रिणींना लिहिण्यास प्रवृत्त करत. त्या स्वतःसुद्धा लिहीत. धन्वंतरी दादा वैद्य हे त्यांचे यजमान स्त्री-शिक्षणाचे भोक्ते होते. स्वातंत्र्योत्तर काळात मात्र साहित्यातील सर्वच विषयांवरील लेखनाला बहर आला. त्यात स्त्रियाही मागे नव्हत्या. कथा, कादंबरी, काव्य, नाटक हे सगळेच विषय स्त्रियांनी हाताळले. हाती लेखणी घेतली की स्त्रियाही सकस लेखन करतात हे त्यांनी सिद्ध केलं. वासंती नाडकर्णी व माधवीताई देसाई यांची नावं प्रामुख्याने डोळ्यांसमोर येतात. त्यानंतरच्या काळात लीना पेडणेकर, दया मित्रगोत्री, मेघना कुरुंदवाडकर, रेखा मिरजकर, गुलाब वेर्णेकर, कविता बोरकर, राधा भावे वगैरे अनेकजणी काव्य व गद्य लेखन दोन्हीकडे ठसा उमटवून आहेत. रेखा ठाकूर या कवयित्री व लेखिका एक वेगळाच ठसा आपल्या लेखनात आणतात. चित्रा क्षिरसागर, उत्तम चाली लावून स्वतःच्या कविता सादर करणार्‍या मीना समुद्र, शांता लागू, गिरिजा मुरगोडी, संगीता अभ्यंकर या सगळ्यांच्या कविता वृत्तपत्रांमधून नेहमीच वाचायला मिळतात. चालू काळात दीपा मिरींगकर, अनुजा जोशी यांच्या अतिशय विचारप्रवण कविता वाचताना वेगळाच आनंद मिळतो. अलिकडेच गिरिजा मुरगोडी, मीना समुद्र व संगीता अभ्यंकर या तिघी ‘‘गोफ’’ हा कवितांचा बहारदार कार्यक्रम सादर करतात. मागील दहा वर्षातं अनेक स्त्रियांनी कथालेखनाच्या प्रांगणात प्रवेश केला आहे. ‘स्त्री’ ही कुटुंबाची केंद्रबिंदू आहे. त्यांचे प्रश्न, दुःख, भावबंध, सहनशीलता मांडण्याचा प्रयत्न काही स्त्री-साहित्यिकांनी केलेला आहे. वृत्तपत्रांच्या पुरवण्यांमध्ये सातत्याने कथालेखन करणार्‍या लेखिकांमध्ये शांता लागू, रेखा मिरजकर, सुमेधा कामत, अंजली आमोणकर, रेखा पौडवाल, आरती दिनकर, विद्या नाडकर्णी, सुजाता शिंगबाळ, नयना आडारकर, ज्योती कुंकळकर, नंदिनी रेगे, अपूर्वा कर्पे, शैला राव, मधुबाला कीर्तनी, भाग्यश्री कुलकर्णी, शिवलीला मोये, उषा कामत, सुषमा तिळवे आदींचा उल्लेख करायला हवा. ही नामावली अजूनही वाढवता येईल. सनातन भारतीय कुटुंब पद्धतीतील स्त्रीचित्रण त्यांच्या कथांत वाचायला मिळते. पण उदार दृष्टिकोन किंवा विश्‍वकल्याण हे विषय अभावानेच दिसतात. खरं म्हणजे मी हे मनातलं सांगते आहे पण माझ्या लेखनातसुद्धा हे विषय आलेले नाहीत हे मी नम्रपणे कबूल करते. मला अजून खूप पल्ला गाठायचा आहे. माझी लेखनाची सुरुवात उशिराच झाली आहे. विद्यार्थीदशेत वाचनाची आवड होती पण त्यामुळे ‘घरकामाचा आळस करणारी एक वाया गेलेली मुलगी’’ अशी बोलणी घरात खावी लागायची. लग्नानंतर जवळ जवळ पंचवीस वर्षे वाचनाची उपासमारच झाली. कारण आमच्या साकोर्डा गावांत साधं वर्तमानपत्रसुद्धा येत नसे. वाचनालयही नव्हतं. त्यानंतर गांवात एक सरकारी वाचनालय सुरू झालं आणि मी झपाटल्यासारखी रात्री जागून वाचत होते. त्यावेळी उत्तमोत्तम पुस्तकं मला वाचायला मिळाली. त्या काळात माझ्या लेखणीनंही जणू संन्यास घेतला होता. पुढे एक चांगला योग जीवनात आला तो म्हणजे माझ्या मैत्रिणीनं मला ‘‘पत्रद्वारा दासबोध’’ अभ्यासाची माहिती सांगितली. त्या निमित्तानं दासबोध ग्रंथ वाचण्याचा योग आला व पत्रद्वारा उत्तरं पाठवून तीनही परिक्षा दिल्या. इथूनच माझ्या लिहिण्यात आत्मविश्‍वास आला.
गोमंतकातील बहुसंख्य लेखिकांच्या तुलनेत माझी सात पुस्तकं खूपच कमी आहेत. म्हणूनच मला सांगायचं आहे की माझ्यातील लेखिकेचं वय अवघं वीसच वर्षांचं आहे.
मैत्रिणींनो, दोन हजार साली मी साकोर्ड्याहून फोंड्यात रहायला आले, आणि शारदा वाचनालयाच्या प्रेमातच पडले. आमच्या घरासमोरच हे वाचनालय तेव्हा होतं. त्यामुळे माझी वाचनाची चंगळ झाली. दुसरं म्हणजे वाचनालयाच्या सर्वच पदाधिकारी खिलाडू वृत्तीच्या आहेत. मला त्यावेळी चारचौघात बोलायचा संकोच वाटायचा. कारण तब्बल ३५ वर्षें साकोर्डा सोडून कुठेच बाहेर पडले नव्हते. पण शारदाच्या सगळ्या मैत्रिणींनी मला सामावून घेतलं. हळूहळू मी त्यांचीच झाले. श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्था आज पंचविसाव्या वर्षांत पदार्पण करत आहे. या संस्थेचा खूप उत्कर्ष होणार आहे कारण कार्यकर्त्या अतिशय प्रामाणिक आहेत. यापुढे जाऊन मी असं म्हणेन की या वाचनालयाची गणना गोव्यातील आदर्श वाचनालय अशी व्हावी. मध्यंतरी आम्ही साहित्यिक सहलीसाठी नाशिकला गेलो होतो. तिथलं भव्य वाचनालय पाहिलं आणि वाटलं की आपलं शारदा वाचनालय असं हवं!
ज्या क्षणाला हे वाचनालय सुरू करायचा विचार काही उत्साही व समाजहितेषू वृत्तीच्या महिलांच्या मनात आला तो क्षण अतिशय मोलाचा होता. कारण ‘केल्याने होत आहे रे| आधी केलेचि पाहिजे|’, या समर्थ उक्तीला अनुसरून संपूर्ण गोमंतकातलं पहिलं बालवाचनालय या क्षणानं दिलं. वाचनालय म्हणजे ज्ञानाची पाणपोयी! कुणीही यावं आणि आपली वाचनेच्छा पुरी करावी. ज्ञानात भर घालावी. अनेक नामवंत लोक वाचनालयाच्या आधाराने ज्ञान मिळवून थोर पदाला पोचले आहेत. आता बाल वाचनालयाचं रुपांतर ‘सर्वांसाठी वाचनालय’ असं झालं आहे. या संस्थेनं ‘स्वर-नाद’सारखा उपक्रम चालू केला आहे. जेणेकरून अघदी लहान कर्णबधीर मुलं ऐकू-बोलू शकतील. संस्थेनं स्वतःच्या वास्तूत प्रवेश केला आहे. गेल्या २४ वर्षांचा हा संस्थेचा चढता आलेख ‘शारदांनी’ मोठ्या कष्टानं रेखला आहे. हे मी पाहिलं आहे. अनेक साहित्यिक उपक्रमांबरोबरच दरवर्षी महिला साहित्य संमेलन भरवणं हा ‘शारदा’च्या सदस्य महिलांचा मोठा उत्साहाचा कळस असतो. या महिलांत गृहिणी, शिक्षिका, प्राध्यापिका, डॉक्टर, नोकरदार, कलाकार अशा विविध क्षेत्रातल्या कुशल महिला आहेत. त्या साहित्या संमेलनासाठी दिवस-रात्र राबून संमेलन यशस्वी करून दाखवतात. त्यांचा उत्साह, तळमळ, प्रामाणिक प्रयत्न पाहून अनेक जणी लिहित्या झाल्या. मीही त्यातलीच एक आहे.
लहानपणी शिक्षणासाठी मला आईवडलांपासून दूर रहावं लागलं. सुटीत गोव्यात आले की मला खूप रडू यायचं. परत जाऊच नये, असं वाटायचं. गेल्यानंतर अर्ध्या वाटेवरून परत घरी पळून जावं असं वाटायचं. पण तसं करता येत नसे. या घालमेल अवस्थेत ९वीपर्यंत शिक्षण घेतलं. त्या अक्षर धनावरच मी आज थोडंफार लिहू लागले आहे. त्या अक्षर शारदेच्या कृपेनेच मला अनेक मान्यवरांचा सहवास लाभला. त्यांच्यात वावरता आलं. आज श्री शारदा ग्रंथप्रसारक संस्थेनं मला साहित्य संमेलनाची अध्यक्ष होण्याचा बहुमान दिला. त्याला कारण ते अक्षर धनच! त्या पवित्र अशा धनाची मी अत्यंत ऋणी आहे. माझी लेखनाची सुरुवात ज्या दासबोध ग्रंथाच्या अभ्यासामुळे झाली होती त्याच दासबोधातील एका ओवीनं मी लेखाचा समारोप करते…
‘‘उत्कट भव्य तेचि घ्यावे | मिळमिळीत अवघेचि टाकावे |
निःस्पृहपणे विख्यात व्हावे | भूमंडळी ॥