मेड फॉर इच अदर…!

0
167

– श्रीकृष्ण दामोदर केळकर (नानोडा)

संध्याकाळी खडकावर उभे राहून सूर्यास्ताची सेल्फी घेत असतानाच एका जोरदार महाकाय अजस्त्र लाटेने सर्वांना घेरले. आम्ही सर्वजण वर कसेबसे खडकावर आलो. परंतु ती युवती लाटेबरोबर समुद्रात खेचली गेली आणि गटांगळ्या खात खात त्या समुद्रात बुडाली. आम्ही तिचा त्या खोल समुद्रात शोध घेतला. पण ती काही मिळाली नाही. 

आज सकाळपासूनच विभुतीचा गोंधळ उडाला होता. खरं तर कामे तीच करायची… विरुपाक्षाचा सकाळचा डबा, वैभवाला दुपारच्या जेवणाचा डबा व नंतरची आवराआवर. कामवाली येणार, तिची ऊठबस, दोन जास्त भांडी धुण्याची बात नाही. त्यामुळे जास्त झालेली भांडी स्वतःच धुवून ठेवायची. या सर्व गोष्टींना ‘नो एक्सक्यूज!’ मग दहा वाजता कामवाली येऊन गेली. मग मस्तपैकी माहेरून दिलेल्या गुबगुबीत सोफ्यावर निवांत बसली. हातात रिमोट घेऊन इडियट बॉक्स सुरू केला. कूलरचा वारा घेत सिरीयल पाहू लागली. परंतु सकाळच्या दगदगीने तिथेच डुलकी लागली आणि अचानक कोकिळेचा नादस्वर दिवाणखान्यात घुमला. विभुतीला एकदम जाग आली. हातातील रिमोटने दरवाजाचे लॉक उघडले. बाहेर जाऊन अर्धवट झोपेतच दार उघडले.
‘‘गुड मॉर्निंग मॅडम, मी बेस्ट इंडिया कंपनीतून काही प्रॉडक्ट आणले….’’ त्याचे वाक्य पूर्ण व्हायच्या आत विभुतीने धाडकन् दरवाजा बंद केला व रिमोटने दार बंद करून टाकले. अस्सा राग आला होता त्या सेल्समनचा. खरं म्हणजे झोपमोडच झाली होती. परत येऊन सोफ्यावर ऐसपैस पहुडली.
तिची मैत्रीण निलांबरीने भेट दिलेल्या त्या अलौकीक निसर्गचित्राकडे पाहात मन हिंदोळत राहिले. कधी इकडे तर कधी तिकडे. क्षणात बालपण आठवावे तर क्षणात तारुण्याच्या लहरी आठवून विभुती क्षणभर रोमांचित झाली.
अप्पांनी माझ्यासाठी एक स्थळ आणले होते. अप्पा म्हणजे माझ्या बाबांचे बालमित्र. मुलामुलींची लग्नं जुळवण्यात त्यांना भारी आनंद, खूप चांगला मुलगा आहे असा चांगला अभिप्राय अप्पा बाबांना सांगत होते. पण त्याचवेळी मला शंका आली, मुलगा सरकारी नोकर म्हणजे हुंड्यासाठी मंडळी अडून बसणारच. तरी पण बाबांचे मन मोडू नये म्हणून लग्नाला होकार दिला. परंतु तो होकार म्हणजे वादळाला निमंत्रणच होते, हे नंतर माझ्या लक्षात आले. त्या हुंड्याच्या पैशांना चटावलेल्या लांडग्यांनी ऐन हळदीच्या दिवशीच निरोप पाठविला. हुंडा दुप्पट देत असाल तरच आम्ही लग्नाला तयार आहोत. अप्पांनी पण परोपरीने विनविले. पण ती मंडळी ऐकायलाच तयार नव्हती.
मला पूर्ण हळद लावण्यात आली होती. मी धावत जाऊन आई शांतादुर्गेच्या फोटोसमोर लोटांगण घातले. ‘‘तूच मला या संकटातून मुक्त कर’’, अशी आर्त विनवणी केली.
तत्क्षणी फोटोवर सकाळी घातलेले गुलाबाचे फूल माझ्या ओंजळीत पडले. मी ते पुष्प घेऊन हुंगून केसांवर माळणार, एवढ्यात पाठीमागून एका तरुणाचा धीरगंभीर आवाज ऐकू आला, ‘‘थांब विभुती. तू जे काही देवाकडे आर्जव केले आहेस, त्याचा तुला उत्तम प्रतिसाद मिळाला. तू आता निश्‍चिंत रहा.’’
मी एकदम पाठीमागे वळून पाहिले. तो युवक मला बघत बाहेर निघून गेला. अरे, हा तर माझ्या जीवाभावाची मैत्रीण ‘निलांबरी’चा भाऊ! या दोघांनी मला या संकटात आधार दिला.
‘‘विभुती, जे काही घडते आहे ते खूपच वाईट आहे. हे लोक एवढे स्वार्थी, अधाशी असतील असे मुळीच वाटले नव्हते. हे बघ, मी आणि माझा भाऊ आत्ता तुला तीन लाख रुपये देऊ शकतो. ते घे आणि स्वतःला, कुटुंबाला सावर!’’
‘‘निलांबरी, मी तुझी खरेच आभारी आहे, पण….’’
‘‘पण काय?’’
‘‘मी आता, माझा निर्णय पक्का केलाय. असल्या स्वार्थी कुटुंबात जायचेच नाही. मी एकवेळ अविवाहित राहीन, परंतु असल्या अतिसामान्य मुलाबरोबर मला लग्नाचा बाजार मांडायचा नाही.’’
आपल्या मैत्रीणीचा लग्नसमारंभ कोसळताना पाहून निलांबरी पार भेदरून गेली. मनात एकदम एक विचार आला आणि आपल्या भावाकडे जाऊन कानात काहीतरी विचारले. त्याने आश्चर्यचकित होऊन मान हलवली. मायेने त्याचा हात आपल्या हातात घेत ती विभुतीकडे आली.
‘‘विभुती, हा माझा भाऊ.’’ विभुतीने मान वर करून पाहिले, तर मघाशी गुलाबाचे फूल ओंजळीत पडत असताना या युवकाचा चेहरा पाहिल्याचे स्मरले.
‘‘माझे नाव वैभव, कसलीही अपेक्षा न ठेवता मला तुझ्याशी सप्तपदीचे, जन्म-जन्मांतरीचे नाते जुळवायचे आहे. होशील तू माझी?’’
विभुतीला आश्चर्याचा धक्काच बसला. जणू आकाशातून चांदण्यांचा वर्षाव होत आहे असेच वाटले. क्षणभर स्वतःवर विश्‍वासच बसला नाही. काय अपूर्व योगायोग!!
‘‘निलांबरी, मी तुझ्या भावाचा प्रस्ताव अतिशय आनंदाने मान्य करते.’’
विभुतीच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. वैभवच्या पावलांना श्रद्धेने हस्तस्पर्श करून, नंतर तिने त्याच्याशी हस्तांदोलन केले. निलांबरीला मिठी मारून तिला आसवांनी भिजवून टाकली, जणुकाही तप्त वैशाखात श्रावणाची जलधारा कोसळत होती. एक अनपेक्षित घटना घडत होती.
थोड्या वेळाने निलांबरी, विभुती आणि वैभव मंडपात आली. विभुतीने वैभवशी विवाहाचा आपला निर्णय सर्वांसमोर जाहीर करून सगळ्या नातेवाईक, आप्तमंडळींना सुखद धक्का दिला. लग्नाच्या गाठी ब्रह्मदेवानेच बांधलेल्या असतात याचा पुनः प्रत्यय याची डोळा सर्वांना आला.
त्या हुंडा मागणार्‍या नवरदेवाला विभुतीकडून जणुकाही जबरदस्त चपराकच बसली. त्याची समाजात छी थू झाली.
विभुती दिवाणावर लवंडून त्या आठवणींच्या झुल्यावर झुलत होती. विभुतीच्या डोळ्यातून टचकन् पाणी आले. डोळ्यांचा कडा हळुवारपणे पुसून आपल्या विपुल केशसंभारातून अलगद हात फिरवीत फ्रेश झाली.
एवढ्यात कोकिळेचा आवाज किणकिणला. आता आणि कोण आलंय… असं म्हणत दरवाजा उघडला…
‘‘शंभर वर्षे आयुष्य आहे तुम्हाला!’’
‘‘का गं, एवढेच?’’
‘‘म्हणजे?’’
‘‘खरं म्हणजे तुझ्या सहवासात हजारो वर्षांचं आयुष्य हवंय मला!’’
‘‘एवढी का मी चांगली आहे?’’
‘‘चांगल्या-वाईटाचा प्रश्‍नच नाही. तू मला अजूनही पहिल्यासारखीच आवडते. सदाफुली आहेस तू!’’
‘‘पुरे पुरे, अजून हजारो वर्ष टिकवायचं आहे…’’ असं म्हणून ती कीचनमध्ये गेली व त्याच्याकरता कोल्ड कॉफी बनवून आणली.
नंतर संध्याकाळी चिरंजीव विरुपाक्षसह कारमधून फिरायला बाहेर पडली. ‘‘गारवा…’’ची सीडी लावून ती तिघेही मस्तपैकी निघाली.
रस्त्यावरून जात असताना एवढ्यात कुणीतरी रस्ता ओलांडत आहे, असे वाटल्याने जोरात ब्रेक दाबले. वैभवचा स्टिअरिंगवरचा हात सुटला आणि अकस्मात विभुतीचा हात स्टिअरिंगला लागला. क्षणार्धात गाडी खूप सावरली. एका जीवघेण्या अपघातातून तिघंही सावरली.
‘‘विभूती, तू आम्हाला पुनर्जन्म दिलास. थँक गॉड’’.
‘‘नाही वैभव, काही वर्षांपूर्वी तूही मला पुनर्जन्म दिला होतास.’’
दोघंही एकमेकांचा हात हातात घेऊन मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत होते. दोघंही जिवापाड प्रेम करीत होते. एकमेकांना सावरत होते. एक परिपूर्ण संसारसुख अनुभवत होते.
खरं तर या रस्त्यावरची जागा अतिशय गूढ म्हणून ओळखली जायची. खूप जणांना याचा प्रत्यय आला होता. अचानक एक स्त्री वाहनासमोर यायची, वाहनाला स्पर्श करता करताच गूढरीत्या अदृश्य व्हायची. त्यामुळे तो भाग अपघातप्रवीण बनला होता. वैभवला याची काही कल्पना नव्हती.
‘‘मूड ऑफ झालाय, परत घरी जाऊया.’’
‘‘आता आम्ही एवढे बाहेर पडलोच आहे तर…’’
‘‘डॅडी, आपण समुद्रकिनार्‍यावर जाऊया.’’ मग सगळी जण मिरामारच्या विशाल समुद्रकिनार्‍यावर आली.
विरुपाक्ष वाळूत किल्ला बांधत होता. खेळत होता. वैभव, विभुती एकमेकांसोबत लाटा मोजित होती. वैभव तिला म्हणाला, ‘‘मघाशी तुला रस्ता ओलांडताना एक स्त्री दिसली का?’’
‘‘नाऽऽहीऽऽ, तरीच मी मनात म्हटले, तुम्ही एवढा जोरदार ब्रेक का म्हणून लावला?’’
‘‘नाही विभुती, खरंच एक स्त्री रस्ता ओलांडित होती.’’
परत दोघंही गप्पच राहिली… घनगंभीर लाटांचा आवाज ऐकत! नंतर घरी परतताना कार दुसर्‍या रस्त्याने नेली.
एकदा एखाद्या घटनेने पाठ धरली की ती सुटता सुटत नाही. तसंच काहीसं वैभवचं झालं होतं. ती स्त्री त्याला ओळखीची वाटत होती. कुठंतरी पाहिलं आहे हिला… परंतु आता अदृश्य रूपात..? वैभवच्या अंगाला घाम सुटला, घशाला कोरड पडली. घटाघटा फ्रीजमधले पाणी पिऊन पलंगावर येऊन आडवा पडला आणि अचानक त्याला क्लिक झालं…
काही वर्षांपूर्वी वैभव आपल्या क्लायंटला घेऊन कारवारला गेला होता. तिथले काम पूर्ण होताच, मनात काय आले आणि गाडी सरळ गोकर्णच्या दिशेने वळविली. तिथे श्रीगणेशाचे, श्रीमहाबळेश्‍वराचे दर्शन घेऊन नयनरम्य अशा कोटी तीर्थावर गेला, ज्या ठिकाणी मानवाने देह त्यागल्यानंतर त्याचे उर्वरित क्रियाकर्म केले जाते ते हे ठिकाण. त्या ठिकाणी जाऊन त्याने हातपाय धुतले. दीपदान करून, नमस्कार करून बाहेर पडणार… अचानक त्याचे लक्ष तिथल्या पायर्‍यांवर गेले. एक युवती शून्यात नजर लावून बसली होती. दिसायला अतिशय देखणी होती. तिच्या एकंदर पेहरावावरून ती त्याला गोव्याची वाटली. आजुबाजूला कोणीच नव्हते. मनात म्हटलं, कशाला ही झंझट! असं म्हणून तिकडे दुर्लक्ष करून आपल्या कारपाशी जायला निघाला. ‘‘प्लीज, मात्शे रावशांत? म्हाका तुमी हेल्प करशांत?’’
ती युवती अगदी दीनपणे याचना, आर्जव करीत होती. ‘‘हांव गोयचे. म्हाका गोयांन घरां सोडशांत? मी तुमचे ऋण आजन्म विसरणार नाही.’’
‘‘पण, तुला कसे कळले की मी गोव्याचा..?’’
‘‘हे पहा, तुमी गोयकार कशेच दिसता आनी तुमगेल्या गाड्येचो नंबर बीजी०१ हांगासून सुरू जाता. म्हणून हावेन ओळखले’’.
स्त्री दाक्षिण्य म्हणा किंवा आपल्या गोव्याची म्हटल्यावर आपलेपणा वाटून तिला तिच्या घरी पोचविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे वैभवने तिला आपल्या कारमध्ये बसविले.
क्षणात एक गूढ वातावरण कारमध्ये पसरले. ए.सी. लावला नसतानाही एवढा गारवा कसा? हळुहळू तिची माहिती विचारली. तीही विनासंकोच थंडपणे सांगू लागली.
***
आंधळ्या जायूची एकुलती एक मुलगी. सायबर कॅफेत कामाला. वीक एंडला ऑफिसच्या मुलांबरोबर मुर्डेश्‍वरला फिरायला गेलेली. परंतु येताना तिला एकटीलाच गोकर्णला ठेवून ते परत गेले, ते आलेच नाहीत. वैभवने तिच्या मित्रांची नावे विचारली. तिने नाव सांगताच अक्षरशः धक्काच बसला. संजू आणि या टोळक्यांबरोबर. संजू त्याच्या मामाचा मुलगा. गोव्याला पोचताच त्याला झाडायचे ठरवले. ही घटना सविस्तर सांगेस्तोवर गाडी गोव्यात पोहचली.
‘‘जरा थांबा, ते समोर घर दिसते आहे ते आमचे.’’ गाडी सावकाश उभी केल्यानंतर ती पटकन् उतरली. वैभव तिच्या पाठमोर्‍या आकृतीकडे पाहात असतानाच ती क्षणात दिसेनाशी झाली. डोक्यात संशय बळावला. अरेच्च्याऽऽ कारचा दरवाजा तर लॉक होता मग तो आपोआप उघडून ती कशी बाहेर पडली? वैभवच्या हाता-पायांना दरदरून घाम फुटला. ती गेली तशी गाडीतला गारवा निघून प्रचंड उष्णता निर्माण झाली.
क्षणाचाही विचार न करता त्याने गाडी सरळ केपेच्या दिशेने संजूकडे नेली.
‘‘संजू तू काय लफडे केले आहेस?’’ डायरेक्ट विषयालाच हात घातला.
‘‘दादा, तुला काय म्हणायचे आहे?’’
‘‘तू गोकर्णला जावून काय दिवे लावलेयत?’’
संजूचा चेहरा पांढरा फटक पडला आणि वैभवच्या गळ्यात पडून तो रडू लागला व… ‘‘मला यातले काहीच माहीत नव्हते. माझे मित्र त्यादिवशी घरी आले. तुझी व्हॅन आम्हाला दोन दिवसांसाठी हवी आहे. आम्ही भाडे देऊ. मी व्हॅन बाहेर काढली. त्यांनी वाटेत एका मैत्रीणीला घेतली. आम्ही नंतर मुर्डेश्‍वरला गेलो. तिथला भव्य सागर किनारा पाहिलात. अतिशय भव्य अशा शंकराचे दर्शन घेतले. तिथे खूप मजा केली. नंतर संध्याकाळी खडकावर उभे राहून सूर्यास्ताची सेल्फी घेत असतानाच एका जोरदार महाकाय अजस्त्र लाटेने सर्वांना घेरले. आम्ही सर्वजण वर कसेबसे खडकावर आलो. परंतु ती युवती लाटेबरोबर समुद्रात खेचली गेली आणि गटांगळ्या खात खात त्या समुद्रात बुडाली. आम्ही तिचा त्या खोल समुद्रात शोध घेतला. पण ती काही मिळाली नाही. मग रात्रीच आम्ही तिथून निघालो. नंतर दुसर्‍या दिवशी पेपरमध्ये वाचले, एक बेवारस स्त्रीदेह सापडला. पोलिसांनी फाईल बंद करून टाकली.
आम्ही मग पुढे काही लचांड नको म्हणून गोकर्णला जावून काही विधी तिथल्या ब्राह्मणाद्वारे पार पाडले आणि घरी तिची आंधळी आई एकटीच असल्याने प्रकरण दडपले गेले. पण… पण हे सर्व तुला का हवे आहे?
वैभवला दरदरून घाम फुटला. जी युवती तिथे मरण पावली होती तीच हो.. हो.. तीच युवती माझ्या कारमधून आत्ता, आत्ताच गोकर्णहून इथपर्यंत आली आणि मी तिला तिच्या घरीसुद्धा सोडले.
‘‘काऽऽऽय?’’ मोठ्याने किंचाळत संजू ओरडला.
‘‘हो ऽ ऽ य, अरे हो ऽ ऽय!
अतर्क्य, अमानवीय असे काही घडत होते.
पलंगावर पडून वैभवच्या मेंदूला क्लिक झालेल्या झटक्यातून या सर्व मागील घटनांना उजाळा मिळाला. वैभव प्रचंड घामाघूम झाला होता. या सर्व मागील घटनांचा आणि आज झालेल्या दृष्टांताच्या संबंधांच्या तारा अनपेक्षितपणे, अघटितपणे जुळत होत्या.
खरं तर त्या युवतीचे आजच वर्षश्राद्ध होते आणि नेमकी तीच त्या कारसमोर आली होती. ज्या व्यक्तींचा अनपेक्षित मृत्यू होतो त्यांना सहसा मोक्षप्राप्ती होत नसते. कारण त्यांचे जीवनकार्य अजूनही पृथ्वीतलावर व्हायचे असते.
त्या तरुणीचा आत्मा त्या चौघांचा शोध घेत आहे. ही घटना फक्त संजू आणि त्याच्या मित्रांना माहीत असते आणि आता वैभवला ठाऊक झाली.
दुसर्‍या दिवशी नेहमीप्रमाणे वैभव कामाला गेला. विभूती कालची घटना विसरूनसुद्धा गेली. नेहमीप्रमाणे दररोजची कामे होऊ लागली. एलसीडी लावला. त्यामधल्या सिरीयल्स रंगू लागल्या. विभूतीपण त्या बघता बघता रंगात आली. एवढ्यात कोकिळेचा मधुर स्वर दिवाणखान्यात किणकिणला. तोंडाने मधुर गाणे गुणगुणत दरवाजा उघडला. बाहेर डोकावून पाहिले, तर कोणीही नव्हते. परंतु बाहेरील तप्त वातावरणात एक अति थंड झुळूक विभुतीला स्पर्शून आत आली. दरवाजा बंद केला आणि गंगास्नानाला निघाली. आज शनिवार. त्यामुळे आपल्या विपूल केशसंभाराला आरोग्यदायी अभ्यंगस्नान घातले. नंतर देवाजवळ येऊन दिवावात पेटवली. त्याबरोबर ती अतिथंड झुळूक त्या दिव्याच्या ज्योतीबरोबर पूर्णपणे विलीन झाली. एक चांगले वातावरण त्याठिकाणी निर्माण झाले.
ज्या वैभवने विभूतीचा कोसळणारा भावविश्वाचा डोलारा सावरला, त्याच विभुतीने वैभवचा कोसळणारा संसार सावरला… अगदी खरं, दोघंही एकमेकांना ‘‘मेड फॉर इच अदर’’ आहेत.