पालक आणि ‘मर्यादा’

0
152

– आरती सुखटणकर (निवृत्त मुख्याध्यापिका)

तिची आई खूप महिन्यांनी ‘बाबा’ घरी आले की ‘प्रिन्स’ म्हणून त्यांना बिलगत असे नि….! शायना या सर्व प्रसंगांना समोर पाहात होती! मग तिच्या मनात एक ‘प्रिन्स’ उभा राहिला यात तिचा काय दोष? अशा ‘प्रिन्स’ला आपण प्रेमपत्र लिहितोय ही तिची अपराधी भावना अशा तर्‍हेने ‘अदृश्य’ स्वरूपात व्यक्त झाली होती!!

हल्ली मुलांच्या पाठीवर ‘मणभर’ पुस्तके-वह्यांचे ‘दप्तर’ असते. दप्तराच्या त्या ओझ्याने त्यांचे मणकें बालपणीच झिजून जातात! मला ही पद्धतही बदलायची होती. आठवड्यातील निदान एक दिवस तरी मुलांना दप्तराशिवाय शाळेत यावे असे वाटत होते. काय करावे? शाळेला त्यावेळी स्वतःचे स्वतंत्र मैदान नव्हते. मग मी याबद्दल पालक-शिक्षक संघाच्या सभेत माझा प्रस्ताव मांडला. सरकारचे ‘परेड ग्राऊंड’ जे इतर वेळी मोकळेच असायचे ते ‘खास परवानगी’ने मुलांना खेळायला मिळेल अशी सोय झाली. -त्यासाठी माझा विनंती ‘अर्ज’ एका पालकानेच सरकार दरबारी मंजूर करून आणला. शिक्षकांनी वेळापत्रकात अशी सोय केली की पुस्तके-वह्या आणाव्या लागणार नाहीत अशा तासिकांसाठी आठवड्यात एक दिवस प्रत्येक वर्गाला देण्यात आला. उदा. – चित्रकला, गायन, हस्तव्यवसाय, लेखन, वाचन (ग्रंथालय), शारीरिक अभ्यासक्रमाचे (पी.टी.) आठवड्यातील ३ तासिका एकाच दिवशी घेण्यात याव्या अशी सोय केली गेली. त्याशिवाय ‘मौखिक गणितं’ व अनुलेखनाच्या तासिकाही आलटून पालटून वेगवेगळ्या वर्गाला देण्यात आल्या! अशा तर्‍हेने वेळापत्रक शिक्षकांनी तयार केले पण मैदानावर पोहोचण्यासाठी चालत २० मिनिटे तरी हवी होती. … म्हणजे मुलांच्या खेळातील वेळ शाळेतून मैदानावर व मैदानातून शाळेकडे ये-जा करण्यातच गेला असता. – त्याशिवाय रस्त्यावरची वाहनांची गर्दी, रस्ता ओलांडणे – सर्व मुलांना एकत्र नेणे व आणणे ह्या चिंता होत्याच. … काही उत्साही पालकांनी यासाठी बसेसची सोय करण्याचे ठरविले व त्यासाठी बसभाडे पालक-शिक्षक संघाच्या खात्यातून भरायचे असाही ठराव संमत झाला! मैदान मोठे होते त्यामुळे पळणार्‍या बागडणार्‍या मुलांकडे एक-दोन शिक्षक कसे लक्ष ठेवणार? … पण आमचे पालक खूपच उत्साही! त्यातील गृहिणींनी घरचे काम आटपून मैदानावर मदतीला यायची तयारी दर्शवली. काही पुरुषवर्गही ऑफीसला सुटी असेल तेव्हा किंवा ऑफिसची वेळ सांभाळून मुलांबरोबर खेळायला येऊ लागले! सांस्कृतिक कार्यक्रमांच्या वेळीही पालकांनी रंगमंचामागील पडदा (बॅकड्रॉप) प्रोजेक्टचा वापर करून आवश्यकतेनुसार फिरता ठेवला! … असे पालक भेटणे हा माझ्या ‘मुख्याध्यापिके’च्या जीवनातील एक सुंदर अनुभव होता.
माझ्या एका सहशिक्षिकेची मुलगी इ. ६ वीत दुसर्‍या शाळेतून आमच्या शाळेत आली. मुलगी ‘शायना’ हुशार होती. चपळ होती, चौकस होती…. पहिले सत्र संपवून मुले सुटीला गेली. शायनाही आपल्या बहिणीसोबत तिच्या बाबांकडे ‘कानपूर’ला गेली. परिक्षा झाल्यामुळे मुलांना सुट्या मिळाल्या पण शिक्षकांना अजून शाळेत कामे होतीच. म्हणून ‘शायनाची आई’ – सिमरन नंतर कानपूरला गेली… सुटी संपवून सगळे परत आले…. शाळा व शाळेचे द्वितीय सत्रातील कार्यक्रम सुरू झाले… एक दिवस ‘चाफेकर’ बाई माझ्याकडे आल्या… माझ्या हातात एक ‘कोरा कागद’ देत म्हणाल्या ‘वाचा’! … माझे प्रश्‍नचिन्ह! कागद दिव्यांच्या उजेडात धरत म्हणाल्या, ‘‘हे शायनाने तिच्या मित्राला लिहिलेले प्रेमपत्र आहे!’’…. मी आश्चर्यचकित होऊन अक्षरजुळवणी करू लागले…. केसाच्या क्लिपने रेटून लिहिलेले ‘प्रेमपत्र’ होते ते…. ‘‘माय डियर प्रिन्स, … आय नो यु आर वेटिंग टू सी मी बट आय कान्ट कम टूडे. आय हॅव टू गो विथ माय मदर टू मार्केट आफ्टर स्कूल. वी विल मीट टूमारो. वी हॅव डान्स प्रॅक्टीस अँड आय विल ‘बंक’ इट विथ सम रिझन. कम टू मीट मी बिहाइंड द टेंपल ऍट टू थर्टी आफ्टर स्कूल. …आय लव्ह यू!… ओन्ली युवर्स शायना’’. … पत्र वाचता वाचता माझ्या घशाला कोरड पडली! हा कोण ‘प्रिन्स’? शायना असे उद्योग केव्हापासून करतेय? हिच्या आईला ‘सिमरन’ टिचरला हे सारे माहीत आहे काय? तिला दाखवले पाहिजे, त्याआधी ‘शायना’शी बोलले पाहिजे! … प्रेमाला माझा विरोध नाही पण प्रत्येक गोष्टीची एक वेळ व मर्यादा असते ती सांभाळली पाहिजे…! माझ्या मनात शायनाचा ‘ग्राफ’ उभा राहिला.
… ‘शायना’- माझ्या माहितीप्रमाणे सुसंस्कृत घरातली, एका शिक्षिकेची मुलगी – तिची हुशारी अशी ‘आडवळणाला’ चाललीय..? आत्तापर्यंत तिने किती वेळा ‘बंक’ करून त्या ‘प्रिन्स’बरोबर वेळ घालवला असेल? या वेळात तिने काय काय केले असेल? नुसत्या गप्पा? की *** ? छे, … ही गोष्ट तिच्या आईच्या -‘सिमरन’च्या कानी घालायलाच हवी! पण त्याआधी शायनाशी बोलले पाहिजे.
दुसरे दिवशी शायना माझ्यासमोर होती. आमचा संवाद….
‘‘शायना हे काय आहे?’’
‘‘कोरा कागद’’ … ‘‘बस्स? आणखी काय आहे?’’ शायना माझ्याकडे ‘बावळट’ नजरेने पाहू लागली! – मी मुद्यालाच हात घातला. … ‘‘शायना, हे तू लिहिलेले प्रेमपत्र आहे. ते आम्हाला मिळालेय. कोर्‍या कागदावर पत्र लिहायला तुला कोणत्या ‘प्रिन्स’ने शिकवलंय? तू त्याला ‘प्रिन्स’ म्हणतेस की त्याचं नावच प्रिन्स आहे?’’ शायनाचे डोळे आता भरून वाहू लागले….
… मी तिला जवळ घेतले व तिची समजूत घालून म्हटले, ‘‘शायना, आम्ही सर्व शिक्षक तुम्हा सर्व मुलांचे मित्र आहोत. तू हुशार आहेस. या वयात अशी आकर्षणं मनाला भूरळ पाडतातच पण अभ्यासावरचे लक्ष उडता कामा नये. तुझे बाबा इथे नाहीत मग तूच तुझ्या आईला जपलं पाहिजेस नां? ….’’ ‘‘टिचर आय ऍम सॉरी…’’
… आणि नंतर तिने जे सांगितलं त्याचा विचार सर्व मोठ्यांनी करावा! शायनाला तिचे बाबा अतिशय आवडायचे. आपला जोडीदारही ‘असाच’ असावा असे त्या उमलणार्‍या कलिकेला वाटू लागले. त्यात तिच्या आईने बाबांसाठी एक चिट्ठी लिहून तिच्याकडे दिली, शायनाने ती बाबांना दिली. बाबांनी ती वाचली नि तिथेच बेडरूममध्ये ड्रेसिंग टेबलवर ठेवली. … शायनाने ती सहज वाचली…. नि तिच्या मनात एक काल्पनिक ‘प्रिन्स’ उभा राहिला. त्या काल्पनिक प्रिन्सला तिने प्रेमपत्र लिहिले… एक, दोन नव्हे … खूप! कोणालाही कळू नये म्हणून आपल्या वहीतच पण ‘हेअरपिनने’! म्हणजे कोणालाही वाचता येणार नाही! त्या दिवशी गडबडीत तीच वही ‘चाफेकर’ टिचरकडे तपासायला गेली नि एवढं जोर देऊन कोर्‍या कागदावर काय लिहिले असावे या कुतुहलाने त्यांनी ते पत्र वाचून माझ्याकडे आणले…! असो. ‘अभ्यास’ करायला मला एक विषय मिळाला!
* घरातील मोठ्या माणसांनी एकमेकांशी वागताना, बोलताना घरातील लहान मुले, वयात येणारी मुले आपल्या आजुबाजूला आहेत याचे नेहमी भान ठेवले पाहिजे. मनुष्यप्राणी हा सत्त्व-रज-तम गुणांचा पुंज असतो. जन्मल्यापासून ते दोन-अडीच वर्षापर्यंत बालकात १००% सत्त्व गुण वास करत असतो. म्हणून तर लहान मूल पूर्ण आनंदात असते व इतरांना ही आनंद वाटते. लहान मूल म्हणजे जणू ईश्वरच! राग, लोभ, द्वेष, मत्सर, भीती, शंका, संशय यातील कोणतीही भावना त्याच्या मनात नसते. त्याच्या मनाची पाटी कोरी असते! जसजसे ते मोठे होऊ लागते व त्याचा ‘इतरेजन’ ऋणानुबंध वाढू लागतो तसतसे त्या बालमनात घरातील, शेजार्‍यातील, शाळेतील, समाजातील मोठ्या वयाच्या माणसांच्या प्रतिक्रिया उमटू लागतात. आपले प्रेम, आपला राग हा त्या छोट्या कोर्‍या मनावर, बुद्धीवर नकळत प्रतिबिंबित होत असतो, तोच आत धारण होतो व पुढे व्यक्तही होतो. आपण सिनेमा बघतो, बाहेरचे पदार्थ खातो, एकमेकांशी इतर अनेक जणांबद्दल, अनेक घटनांबद्दल सहज म्हणून बोलतो परंतू घरातील छोट्यांचे लक्ष तिकडे असते. त्यांच्या मनात या प्रत्येक घडामोडीबद्दल स्वतंत्र मत तयार होते व हळुहळू रज व तम गुणांनी त्याच्या मनात प्रवेश करायला सुरुवात केलेली असते. पुढे मूल बालवाडीत जाऊ लागते, घरून खाऊचा डबा नेते नि त्याबरोबर आई-आजीचे शब्दही ‘‘तुझा डबा तूच खा हं! कोणाला देऊ नकोस…’’ ‘‘आपण बाहेर हॉटेलमध्ये गेलो होतो ते काकूला सांगू नकोस हं!’’ इ. इ. इ.
अशा तर्‍हेने मूल खोटे बोलायला, लपवायला, ‘नकार’ द्यायला शिकते! वयात येणार्‍या मुलामुलींना वयोमानानुसार भिन्नलिंगी आकर्षण हे अगदी नैसर्गिक असते. ‘‘आम्ही आमच्या मुलांपासून काही लपवत नाही’’ असे म्हणणारे पालक ज्यावेळी ‘मर्यादा’ सोडून मुलांसमोर एकमेकांशी वागतात त्या वागण्याचे, बोलण्याचे प्रतिबिंबही अरुणावस्थेतील मुलांवर कोरले जाते व ‘असे’ वागणे ‘गैर’ नाही अशीच त्यांची समजूत होते. ‘शायना’च्या बाबतीतही असेच घडले होते…! तिची आई खूप महिन्यांनी ‘बाबा’ घरी आले की ‘प्रिन्स’ म्हणून त्यांना बिलगत असे नि….! शायना या सर्व प्रसंगांना समोर पाहात होती! मग तिच्या मनात एक ‘प्रिन्स’ उभा राहिला यात तिचा काय दोष? अशा ‘प्रिन्स’ला आपण प्रेमपत्र लिहितोय ही तिची अपराधी भावना अशा तर्‍हेने ‘अदृश्य’ स्वरूपात व्यक्त झाली होती!!
क्रमशः