जयललिता यांना अखेरचा निरोप

0
116

अभाअद्रमुकच्या सर्वेसर्वा तथा तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्या पार्थिवावर काल संध्याकाळी त्यांच्या लाखो चाहत्यांच्या तसेच महनीय, अतिमहनीयांच्या उपस्थितीत शासकीय इतमामात मरिना बीच येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांच्या स्मारकानजीकच जयललितांच्या पार्थिवाचा दफनविधी करण्यात आला. त्याआधी दुपारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी जयललितांचे अंत्यदर्शन घेऊन श्रध्दांजली वाहिली. जयललिता यांच्या निकटवर्तीय शशिकला यांनी त्यांच्यावर अंत्यविधी केले.

येथील अपोलो इस्पितळात प्रदीर्घ उपचारानंतर सोमवारी रात्री ११.३० वा. जयललिता यांचे निधन झाले होते. त्यानंतर त्यांचे पार्थिव पोएस गार्डन येथील त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले. काल सकाळपासून लोकांना अंत्यदर्शन घेण्यासाठी त्यांचे पार्थिव राजाजी हॉलमध्ये ठेवण्यात आले होते.
राजाजी हॉल येथून संध्या. ४ वा. जयललितांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. त्याआधीपासूनच हा परिसर त्यांच्या लाखो चाहत्यांच्या उपस्थितीमुळे गजबजून गेला होता. जयललिता यांच्या निधनानिमित्त देशात एका दिवसाचा तर तामिळनाडूत ७ दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर करण्यात आला. तामिळनाडूतील शैक्षणिक संस्था तीन दिवस बंद ठेवण्यात आल्या आहेत.
चंदनाच्या पेटीतून दफन
दफनविधीचे कारण स्पष्ट करताना अंत्याविधीच्या तयारीची जबाबदारी असलेल्या राज्य सरकारमधील सचिवांनी सांगितले की जयललिता आमच्यासाठी केवळ अय्यंगार नव्हत्या. त्या जात-धर्मापलीकडे होत्या. पेरिमार अण्णादुराई व एमजीआर या द्रविडी नेत्यांचे दफन केले होते. त्यामुळे जयललिता यांच्या पार्थिवाचे दहन न करता दफन करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.
राजाजी हॉल ते अंत्यसंस्काराचे ठिकाण मरिना बीच या मार्गालगत जनसागर उसळला होता. यावेळी जयललिता यांच्या असंख्य चाहत्यांना आपले अश्रू आवरणे कठीण होत होते. सोमवारी या परिसरात काही प्रमाणात हिंसाचार उडाला असला तरी काल प्रचंड गर्दी असूनही अनुचित प्रकार घडला नाही. फुलांनी सजवलेल्या ट्रकवर जयललिता यांचे पार्थिव ठेवण्यात आले होते.
महनीय, अतिमहनीयांची उपस्थिती
केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू काल दिवसभर या ठिकाणी उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, मंत्री पंकजा मुंडे, तामिळी सिनेस्टार रजनीकांत यांच्यासह तामिळनाडूचे मंत्रिगण, आमदार, नेते यांनी जयललितांचे अंत्यदर्शन घेतले.
जयललिता यांच्या पार्थिवाचे दफन करण्याआधी तामिळनाडूचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी पार्थिवावर पुष्पचक्र वाहिले. त्यानंतर राहुल गांधी यांनीही पुष्पहार अर्पण केला. अंत्यदर्शन घेतलेल्यांमध्ये पुढील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा समावेश होता- शिवराज चौहान (म. प्रदेश), नवीन पटनाईक (ओडीशा), चंद्राबाबू नायडू (आंध्र), अरविंद केजरीवाल (दिल्ली), पी. विजयन (केरळ), सिध्दरामय्या (कर्नाटक) तसेच माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनीही अंत्यदर्शन घेतले.