आमवात ः विंचूदंशाप्रमाणे वेदना…

0
1968

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

रुग्णांनी संधीवेदना व संधी सुजलेले असता बाहेरून बाजारांत मिळणारी कुठलीही तेले आणून लावत बसू नये. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आमवात आहे की संधिवात आहे याचे योग्य निदान करून योग्य औषधोपचार करावेत. कारण फक्त एरंडतेल सोडून इतर तेलानी आमवात वाढतो.

वयाची पन्नाशी ओलांडली की किमान ५०% लोकांना सतावणारा आजार म्हणजे सांधेदुखी. सांधेदुखी म्हटली की बरेच लोक स्वतःच त्याचे निदान संधीवात म्हणून करतात व डॉक्टरांनाही सांगताना स्वतःला काय होतंय, लक्षणे न सांगताच… मला संधिवात झालाय त्यावर काय तो उपाय करा… असेच सांगतात. पण सांधेदुखी ही संधीवातात न होता आमवातातही होऊ शकते. आयुर्वेद शास्त्रानुसार सांधेदुखीच्या अंतर्गत संधीवात व आमवात असे दोन मुख्य विकार आढळतात.
साधारणतः सर्वसामान्य व्यक्ती मला वाताचा त्रास आहे… किंवा माझे सांधे संधिवाताने जखडलेले आहेत… अशा प्रकारच्या तक्रारी करते. मग हा वात व आमवात एकच असतो का? तसेच आधुनिक शास्त्रातील आर्थ्रायटीस म्हणजे आमवात असा निष्कर्ष केला जातो. मग आमवातासारख्या कष्टसाध्य आजाराला आयुर्वेदामध्ये यशस्वी औषधोपचार आहेत का? आमवात संधिवातापेक्षा वेगळा कसा? आमवातापासून सुटका मिळू शकते का? असे अनेकविध प्रश्‍न, शंका घेऊन रुग्ण डॉक्टरांकडे येतात.
… तर प्रथमतः हा ‘आमवात’ हा अतिशय दारूण व कष्टसाध्य अशी व्याधी आहे, हे रुग्णांनी आपल्या पचनी पाडणे आवश्यक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अतिशय कष्टपूर्वक, मेहनतीने कायमस्वरूपी पथ्यपालन करून नियमित चिकित्सा घ्यावी लागते. त्यामुळे आमवात पीडित रुग्णाने व इतर कुटुंबियांनी खचून न जाता मध्येच चिकित्सा सोडून न देता, अतिशय सकारात्मक जीवनशैलीचा अवलंब करून व्याधीशी दोन हात करायला हवेत.

आमवात म्हणजे काय? …

आमवात हा वातव्याधी प्रकारच आहे. फरक एवढाच की यात आमची व वाताची भाऊबंदकी जरा जास्तच घट्ट असते. जसे की या व्याधीच्या नावातच आपल्याला…
१) आम व २) वात. आम= अपक्व आहार रस व वात= प्रकूपित झालेला वातदोष. चुकीच्या आहार-विहार, मंदाग्नी, अव्यायाम, पचायला जड व स्निग्ध अन्नसेवन करून लगेच व्यायाम करणे या कारणांमुळे निर्माण होणारे विषसमान घटक म्हणजे आम. हा आम वायुने प्रेरित होऊन कफस्थानात जातो. पुढे तो आमाशयाच्या सूक्ष्म स्रोतसांमध्ये शिरून अन्नरस व वात-पित्त-कफाला दूषित करतो. ही सर्व दूषित संचरणा सांध्याच्या ठिकाणी कफस्थानात (सायनोव्हियल कवचात) जाऊन स्थिर होते व गंभीर स्वरुपाचा आमवात होतो.
आधुनिक शास्त्रात आमवातालाच ‘हृमॅटॉइड आर्थ्रायटीस’ असे म्हणतात व तो एक ऑटोइम्यून डिसीज आहे म्हणजे मानवी शरीरातील व्याधी-प्रतिरोधक प्रणाली ही अनेक रोगांविरुद्ध लढून शरीर रोगमुक्त ठेवण्यास व कुठल्याही आजाराचा प्रतिकार करण्यास कारणीभूत असते. ही व्याधी-प्रतिकारशक्ती कुठल्याही कारणाने कमी झाल्यास, वारंवार मनुष्याला आजारांना सामोरे जावे लागते. तसेच कधी कधी ही व्याधी-प्रतिकारशक्ती विपरीत कार्य करण्यास सुरुवात करते व ती स्वतःच्या शरीराच्या पेशीविरुद्ध कार्य करायला सुरुवात होते. अशा बिघडलेल्या इम्यून सिस्टीममुळे ज्या व्याधी होतात त्यांना ‘ऑटो-इम्यून डिसीजेस’ म्हणतात व हृमॅटॉइड आर्थ्रायटीस ही त्यापैकीच एक. म्हणूनच ही व्याधी फक्त वार्धक्यातच न होता, तरुणाईत किंवा लहानमुलांमध्ये देखील आढळते. ४० ते ६० वयोगटातील व्यक्तींना जास्त प्रमाणात होतो. स्त्रियांमध्ये हा आजार पुरुषांपेक्षा सहापटीने जास्त प्रमाणात होतो.

आमवाताची कारणे ः
‘विरुद्धाहारचेष्टस्य मन्दोग्नेर्निश्‍चलस्य च |
स्निग्धं भुक्तवतो ह्यन्नं व्यायामं कुर्वतस्तथा ॥

– ज्याचा अग्नी मंद आहे व जो नियमितपणे व्यायाम करीत नाही अशा व्यक्तीने विरुद्धाशन केले किंवा अतिस्निग्ध आहार घेऊन लगेच व्यायाम केला तर आमवात उत्पन्न होतो.
आयुर्वेदानुसार ‘आम’ उत्पत्ती (टॉक्सीन्स) व त्याची प्रकूपित वातासोबत युती होऊन ते सांध्यांमध्ये संचित होणे अशी कारणमिमांसा लावली जाते.
– तसेच जेनेटिक फॅक्टरदेखील या आजारासाठी कारणीभूत आहे.
– आधुनिक शास्त्रानुसार याचे कारण अद्याप सांगता येणार नाही. अचानकपणे विपरीत झालेली रोगप्रतिकारशक्ती हीच या आजारासाठी कारणीभूत आहे. काही शास्त्रज्ञानुसार काही जीवाणू हे आजाराचे कारण आहे.

आमवातातील लक्षणे ः
* अंग दुखणे, भूक न लागणे, तहान लागणे, आळस येणे, शरीर जड होणे, खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे व सूज ही आमवाताची सामान्य लक्षणे होय. यात संधीशूल हे लक्षण नसल्याने ही आमवाताची सुरुवातीस असणारी लक्षणे म्हणता येतील.
* जेव्हा व्याधी व्यक्त होतो, अधिक प्रवृद्ध होतो. तेव्हा हात, पाय, शिर, गुल्फ, त्रिक्, जानु, उरू याठिकाणी असणार्‍या संधिमध्ये सूज व वेदना ही लक्षणे उत्पन्न होतात. त्याठिकाणी तीव्र स्पर्शासहत्व, उष्णस्पर्श व आरक्तवर्णता ही लक्षणे असतात. क्रियाल्पता, सभूलक्रिया वा क्रियाहानी ही लक्षणे उत्पन्न होतात.
* आमवातात असणारी संधीवेदना व संधीसूज यामध्ये संचारित्व असते. आम शरीरात संचार करताना ज्या संधीच्या ठिकाणी जाऊन पोहचतो त्याठिकाणी सूज, वेदना, लाली दिसते. पण त्याचवेळी पहिल्या वहिल्या विकृत संधीप्रदेशी असलेली सूज व इतर लक्षणे कमी होतात.
* संधीप्रदेशी असणारी वेदना अत्यंत तीव्र स्वरूपाची व असह्य अशी असते म्हणूनच याची तुलना वृश्‍चिकदंश वेदनेशी केली आहे.
* याखेरीज आमवातात अनेक सार्वदेहिक लक्षणे उत्पन्न होतात. अग्नीमांद्य, उत्साह हानी, मुखवैरस्य, बहुमूत्रता, मलावष्टंभ, निद्राधिक्य व हृद्ग्रह.

आमवातातील चिकित्सा व उपचार ः
* आमवाताची अवस्था, जीर्णता व व्यक्तीची प्रकृती बघून त्यावरील उपचार हे काही टप्प्यांमध्ये केले जातात. वात प्रकृतीच्या व्यक्तींमध्ये या आजाराची चिकित्सा करणे अवघड असते.
* आमवातामध्ये प्रामुख्याने चिकित्सा करावी लागते ती आमाची. यासाठी लंघन, स्वेदन, तिक्त व कटुरसात्मक व दीपन द्रव्ये वापरली जातात. लंघन करताना वातप्रकोप होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. स्वेदनाने आमपाचन होऊन स्रोतोरोध दूर होतो. पण त्यासाठी रूक्ष स्वेद वापरावा लागतो. स्वेदनरुपी वालुका पोटलीच्या सहाय्याने स्वेद, उपनाह, स्वेद किंवा इन्फ्रारेड किरणांच्या सहाय्याने ताप स्वेद केला जातो.
* लेपनासाठी वत्सानाभ, टेंदू व धत्तूर याचा लेप किंवा दशांग लेप किंवा लेपगोळी उपयुक्त ठरते.
* आमवातात दशमूलक्वाथाचा निरुह व एरंड स्नेहाचा अनुवासन यांचा व्यत्यासात प्रयोग केला जातो. आमवातात स्नेह हा निषिद्ध असला तरी आमपाचनासाठी व विरेचनासाठी एरंडस्नेह उत्तम समजला जातो. एरंडस्नेहाची प्रशस्ती सांगताना शास्त्रकार म्हणतात- शरीररुपी वनात संचार करणार्‍या आमवातरुपी गजेंद्राचा नाश करण्यासाठी एरंडस्नेहरुपी सिंह हा एकमेव असतो.
* एरंडस्नेह शुंठी फांटातून दररोज सकाळी २ चमचे घेणे.
* भाकरी किंवा चपाती करताना त्यात एरंडस्नेह मिसळून देणे. किंवा सुंठपावडर रात्रभर एरंडतेलात भिजवावी. सकाळी हे मिश्रण कणकेत टाकून त्याच्या पोळ्या करून खाव्यात.
* गंधर्वहरितकीसारखा एरंडाचा कल्पही वापरता येतो.
* आमवातात आमपाचन व वेदनाशामक म्हणून वचनामचे कल्प अग्रगण्य आहेत. त्यात त्रिभुवनकीर्ति, वातविध्वंस हे उपयुक्त कल्प होय. आमपाचन झाल्यावर वेदनाशामक व सूज कमी करण्यासाठी औषधी द्यावी. अन्य औषधी द्रव्यांमध्ये रास्ना, गुळवेल, सहचर, शुंठी, देवदार, एरंडमूल, पुनर्नवा, गोक्षुर, दशमूल इत्यादी. द्रव्ये वापरली जातात.
* सिंहनाद गुग्गुळ, रास्नागुग्गुळ, त्रिफळा गुग्गुळ, रास्नापंचक काढा, पंचकोलासव, वातविध्वंस, भल्लानकासवसारखी औषधेही उपयुक्त ठरतात.
* चिकित्सेच्या तिसर्‍या टप्प्यात रोग परत उद्भवू नये म्हणून रसायन चिकित्सा द्यावी. त्याचप्रमाणे आमवातात जीर्णावस्थेत उत्पन्न होणारा हृद्रोग हा उपद्रव टाळण्यासाठी सुवर्णकल्प वापरावेत. यात पाचकेंद्र रस (सुवर्णयुक्त) वापरावा.

आमवातातील आहार योजना ः
आमवातात या सर्व औषधी चिकित्सेबरोबरच आमाचे महत्त्व लक्षात घेता, आहारावर नियंत्रण असणे खूप महत्त्वाचे आहे. आहार रुक्ष, लघु, उष्ण, दीपनपाचन करणारा हवा, या दृष्टीने बाजरीची भाकरी बरोबर लसूण वापरणे आवश्यक आहे.
– कुळीथाचा युष हाही आमवातावरील एक महत्त्वाचा चिकित्सोपक्रम आहे. यासाठी २ चमचे कुळीथ शिजवून त्यापासून तयार होणारे कढण लसणीची फोडणी देऊन प्यावे.
– यव, कुळीथ, वरी-नाचणीसारखी क्षुद्र धान्ये, रक्तशालीपष्टीक, शेवगा, कारली, पुनर्नवा, पडवळ, आले, लसूण व उष्णोदक हे पथ्यकर पदार्थ आहेत.
– ताक हे ही पथ्यकर आहे.
– तसेच दही, मासे, गुळ, दूध, तळलेले पदार्थ, उडदाचे पदार्थ, नासलेल्या दूधाचे पदार्थ हे विशेष अपथ्यकर आहेत.
– विरुद्धाशन, विषमाशन, रात्री जागरण, दिवास्वाप, वेगधारण ही विशेष अपथ्ये आहेत.
… रुग्णांनी संधीवेदना व संधी सुजलेले असता बाहेरून बाजारांत मिळणारी कुठलीही तेले आणून लावत बसू नये. तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आमवात आहे की संधिवात आहे याचे योग्य निदान करून योग्य औषधोपचार करावेत. कारण फक्त एरंडतेल सोडून इतर तेलानी आमवात वाढतो.