योगसाधना – २९५ योगमार्ग – राजयोग ईश्‍वरप्रणिधान – १६

0
100

– डॉ. सीताकांत घाणेकर

या प्रार्थनेवर सूक्ष्म चिंतन केले तर ऋषींना काय अभिप्रेत आहे हे समजते. म्हणून हे सर्व सण, उत्सव फक्त कर्मकांड न राहता खर्‍या दृष्टीने प्रेम, श्रद्धापूर्वक साजरे करून ईश्‍वराप्रति समर्पित दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. तसेच मानवाने सदाचरण करणे आवश्यक आहे.

आज जर आपण एक नजर विश्‍वाकडे फिरवली तर असे दिसून येते की मानवतेसमोर बर्‍याच समस्या उभ्या ठाकल्या आहेत. त्याच्यामुळे माणसाची सुख-शांती भंग झालेली आहे. सामान्य व्यक्ती, धुरीण, सुशिक्षित, तत्त्ववेत्ते सर्वांचीच दयनीय स्थिती झालेली आज बघायला मिळते. अनेक प्रकारचे असूर मानवतेला नष्ट करताना दिसतात. त्यांपैकी प्रमुख – आतंकवाद, भ्रष्टाचार. वैश्‍विक पातळीवर आतंकवादाने भीषण स्वरूप धारण केलेले आहे. सुरुवातीला काही थोड्या राष्ट्रांपुरता मर्यादित असलेला हा राक्षस जगभरच झपाट्याने पसरत आहे. राष्ट्रीय पातळीवर भ्रष्टाचारदेखील जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानवाला समावीत आहे. अशा परिस्थितीत मानवता भयभीत होते.

आसुरी शक्तींची दैवी शक्तीला टक्कर देण्याची ही पहिलीच वेळ नाही. प्रत्येक युगात अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणूनच जेव्हा मानवी शक्ती अपुरी पडली तेव्हा स्वतः भगवान विष्णूंनी मानवी रूपात अवतार धारण करून शत्रूंचा विनाश केला. यामध्ये प्रमुख अवतार आहेत- श्रीराम व श्रीकृष्ण.
भारताची महाकाव्ये या संदर्भात फार बोलकी आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की प्रत्येकाकडे ‘संघशक्ती’ असणे गरजेचे आहे. आणि कलियुगात तर आपल्या ज्ञानी, दूरदृष्टी असलेल्या ऋषींनी आधीच सांगून ठेवलेले आहे- ‘संघे शक्ति कली युगे!’
कलियुगात संघ शक्तीच मानवाच्या विविध समस्यांचा सामना करण्यासाठी जरुरी आहे.
श्रीरामांनी वानरांचा संघ उभा केला आणि श्रीकृष्णांनी गोपगोपींचा संघ तयार केला. तद्नंतर पांडवांसारख्या समविचारी व्यक्तींना एकत्र आणून कुरुक्षेत्रावरील महायुद्धात भाग घेतला. खरे म्हणजेच श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनामुळेच पांडवांचा विजय झाला. दोन्ही उदाहरणात त्यांचा संघ नायकालाच समर्पित होता. सर्वांची त्याच्यावर अतूट श्रद्धा होती, विश्‍वास होता.
बौद्धधर्मातही सांगितले आहे – बुद्धं शरणं गच्छामि! धम्मं शरणं गच्छामि! संघं शरणं गच्छामि!
आधी भगवान बुद्धाना म्हणजे त्यांच्या तत्त्वज्ञानाला शरण जायचे व तदनंतर त्यांनी उभ्या केलेल्या बुद्धधर्माला म्हणजे मानवतेच्या धर्माला व संघशक्तीला शरण जायचे. तसे केले तर संघशक्ती वाढेल व आसुरी शक्तीशी लढणे सोपे होईल.
नवरात्रीच्या दिवसांत दैवी विचारांच्या लोकांना संघटित करण्याचा प्रयत्न केला जातो. प्रमुख स्थानी जगदंबा देवी असते. त्यामुळे तिची शंक्ती भक्तांच्या अंगात प्रकट होण्याची शक्यता असते. हे सुचवण्यासाठीच गरबा किंवा रासेच्या वेळी देवीच्या भोवती फिरायचे असते. हे फिरणे म्हणजे फक्त कर्मकांडं नसतं तर त्यावेळी देवीची प्रार्थना करायची असते. त्यात सद्बुद्धी व संघबळ मागितले जाते. तसेच हेदेखील देवीला सांगितले जाते की संघातील प्रत्येक व्यक्तीमध्ये असलेला खोटा अहंकार नष्ट होऊ दे. तसेच द्वेष व स्वार्थरूपी महिषासुराचा नाश कर. कारण हा अहंकार संघबळाला बाधा आणू शकतो.
विश्‍वाचे बारकाईने निरीक्षण केले तर लक्षात येईल की सज्जन, सत्‌वृत्तीचे लोक दुर्जनांपेक्षा अधिक आहेत. हे सर्व सद्विचारी, धार्मिक वृत्तीचे आहेत परंतु त्यांचा धर्म फक्त कर्मकांडातच गुंतलेला आहे. या कर्मकांडामध्ये ऋषींनी जे थोर तत्त्वज्ञान सांगितले आहे त्याचा ते अभ्यास करत नाही. तसेच सद्विचार सांभाळून तळागाळापर्यंत नेण्याची गरज आहे, हेदेखील बहुतेकांना माहीत नाही.
विश्‍वातील दुर्जन, दुर्विचार यांचा नाश करण्यासाठी अत्यावश्यक आहे- सद्विचारांप्रमाणे कृती आणि त्यासाठी गरज आहे ती सर्व पैलूंनी शक्ती व सामर्थ्य – शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक, भौतिक. तसेच एक विचारी संघ असला तर दुर्जनांचा सामना करण्यासाठी संघशक्ती वाढते. यासाठीच एकत्र येऊन देवीची प्रार्थना व उपासना भारतीय संस्कृतीत सांगितली आहे.
महाकवी भारतीने ‘किरातार्जुनीयम्’मध्ये महर्षी व्यासांचा उपदेश काव्यरुपाने सांगितला आहे त्याचा शब्दार्थ असा-
* तुम्हाला सामर्थ्याने, पराक्रमाने पृथ्वी जिंकायची आहे. शत्रूपक्ष सामर्थ्याने व शस्त्रास्त्राने तुमच्यापेक्षा अधिक बलवान आहे. तुम्हाला अधिक सामर्थ्यवान बनायचे आहे कारण जो सामर्थ्यशील व अधिक साधनसंपन्न असतो त्यालाच युद्धात विजय मिळतो.
हा उपदेश पांडवांना आहे कारण कौरव पक्ष जास्त सामर्थ्यवान होता. त्यांच्याकडे अकरा अक्षौहिणी सैन्य तर पांडवांकडे सात औक्षहिणी सैन्य. कौरवांच्या पक्षात थोर, वृद्ध, अनुभवी असे रथी-महारथी होते- भीष्म पीतामह, आचार्य द्रोण, कर्ण, अश्‍वत्थामा… हे मुख्य. त्यामानाने पांडवांकडे आकडे थोडे कमी होते. धनुर्धर अर्जुन, द्रुपद, दृष्टद्युम्न, गदाधर भीम… हे प्रमुख. त्याशिवाय कांही अस्त्र पांडवांना ज्ञान नव्हती म्हणूनच व्यासांनी व श्रीकृष्णाने त्यांना शक्तीउपासनेचा उपदेश केला.
इथे एक मुख्य नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पांडवांचा पक्ष सत्य व धर्माचा होता. म्हणून त्यांच्याबरोबर पूर्णपुरुषोत्तम श्रीकृष्ण होते. तसेच सर्व पांडव व त्यांचे रथी-महारथी, सैनिक… श्रीकृष्णाला समर्पित होते. शक्तीउपासनेत हीच गोष्ट महत्त्वाची असते. ज्यावेळी सद्भावना असते त्याचवेळी शक्ती सर्वतोपरी भक्ताला सहाय्य करते.
रामायणाबद्दल विचार केला तर लक्षात येईल की राम व त्याचे तीन भाऊ लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे सर्व संघटित होते. तसेच ते रामाला समर्पित होते व त्यांचा पक्ष सत्याचा व धर्माचा होता. याउलट रावण व त्यांचे इतर असूर योद्धे – भाऊ कुंभकर्ण, मुलगा इंद्रजीत, विविध सेनापती हे संघटित होते. त्यांच्याकडे मायावी व आसुरी शक्ती होत्या. ते रावणाला समर्पित होते. पण ज्यांचा पक्ष असत्याचा, अनीतिचा व अधर्माचा होता तरी निश्‍चितच त्यांनी श्रीराम, लक्ष्मण, हनुमान, वानरराज सुग्रीव व त्यांचे वानर सैन्य यांना लढाईत हैराण केले. अनेक संकटे त्यांच्यासमोर क्षणोक्षणी उभी केली. पण श्रीरामांचा पक्ष सत्यधर्मावर आधारित असल्यामुळे दैवी शक्तीचा आसुरी शक्तीवर विजय झाला.
रामायण-महाभारत या दोन्ही महाकाव्यांत विविध प्रकारच्या शक्ती आहेत पण सारांश एकच- उपासना केली तर शक्ती अवश्य मिळते पण तिचा लोककल्याणासाठी उपयोग झाला नाही तर थोडा वेळ अनेकांना त्रास होतील. कष्ट भोगावे लागतील. पण शेवटी त्या दुष्ट शक्तींचा नाशच होणार!
नवरात्रीच्या पवित्र अशा वातावरणात जगदंबा आईचे स्मरण करून प्रार्थना म्हटली जाते…
* या देवी सर्वभूतेषू बुद्धिरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
* या देवी सर्वभूतेषू श्रद्धारूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
* या देवी सर्वभूतेषू शक्तिरूपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः ॥
… वरील श्‍लोकाचा अर्थ बघितला तर लक्षात येते की भक्तांना आईकडून बुद्धी, श्रद्धा, शक्ती सर्वच हवे आहे. आणि त्याचा गर्भितार्थ बघितला तर लक्षात येते की खरोखर आज आपली बुद्धी कुंठीत, कलुषित झालेली आहे. म्हणून आम्हाला हवी आहे ती सद्सद्विवेकबुद्धी! स्वार्थामुळे व अविवेकामुळे आमची श्रद्धा नष्ट होते आहे. तसे भोगातच रममाण झाल्यामुळे आम्ही शक्तिहीन होत आहोत.
या प्रार्थनेवर सूक्ष्म चिंतन केले तर ऋषींना काय अभिप्रेत आहे हे समजते. म्हणून हे सर्व सण, उत्सव फक्त कर्मकांड न राहता खर्‍या दृष्टीने प्रेम, श्रद्धापूर्वक साजरे करून ईश्‍वराप्रति समर्पित दृष्टी ठेवणे आवश्यक आहे. तसेच मानवाने सदाचरण करणे आवश्यक आहे.
भगवंताची कृपा अशा व्यक्तींवर अवश्य होईल. प्रत्येकाला आपल्या संकटांचा सामना करता करता सुखशांती लाभेल.