स्वयंप्रेरणा हवी

0
95

देशातील सर्व राज्यांतील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीत वाजविण्यात यावे आणि त्यावेळी सर्व प्रेक्षकांनी उठून उभे राहिले पाहिजे असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निवाड्याबाबत देशातील सोली सोराबजी आदी ज्येष्ठ विधिज्ञांमध्येच असहमती दिसत असली, तरीही एखाद्या देशामध्ये त्या देशाच्या राष्ट्रगीताचा मान राखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला हस्तक्षेप करावा लागतो हेच खरे तर आपले दुर्दैव आहे. राष्ट्रगीत असो वा राष्ट्रध्वज, त्यांचा सन्मान करणे हा आपल्या संस्कृतीचा भाग बनला पाहिजे. दुर्दैवाने भारतामध्ये राष्ट्रध्वज लावण्यापासून राष्ट्रगीत अथवा राष्ट्रीय गीत गाण्यापर्यंतच्या विषयांस आव्हान देणारे करंटेही निपजलेले दिसतात. केवळ राष्ट्रगीत गायिले अथवा राष्ट्रगीतावेळी उठून उभे राहिले म्हणजेच देशभक्तीचे दर्शन घडते असे जरी नसले, तरीही त्या तीन मिनिटांसाठी उठून उभे राहिल्याने आकाशही कोसळणार नाही. त्यामुळे राष्ट्रगीतासाठी उभे राहण्याच्या विषयाला वादाचा मुद्दा बनवण्याची खरे तर आवश्यकता नाही. एखाद्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी उठून उभे राहणे हा शिष्टाचाराचा भाग असतो. मग समोर आपल्या दृष्टीने सर्वोच्च असलेल्या आपल्या देशाचा तिरंगा लहरत असताना त्याच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठी उठून उभे राहण्यालाही आक्षेप का बरे असावा? वंदे मातरम् या राष्ट्रीय गीतामध्ये मातृभूमीला दुर्गेच्या रूपात संबोधले गेले असल्याचे निमित्त करून काही समाजघटक त्याला विरोध करीत आले. पण जन गण मन या राष्ट्रगीतालाही विरोध का असावा? ते प्रत्येकाच्या ओठांवर आपणहून आले पाहिजे आणि त्याची ती चिरपरिचित धून वाजू लागली की स्वतःहून उठून उभे राहावेसे वाटले पाहिजे. ते सांगावे लागू नये. शेकडोंचा समूह जेव्हा त्या धीरगंभीर सुरावटींवर उभा असतो, तेव्हा ते खरोखर भारून टाकणारे दृश्य असते. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग व्यक्तींना उठून उभे राहणे शक्य नसेल तर त्यांना यातून वगळायलाही हरकत नसावी. ते उठून उभे राहिले नाहीत म्हणजे त्यांनी देशद्रोह केला असे मानणे हाही देशभक्तीचा अतिरेक ठरेल. राष्ट्रगीताप्रतीचा आदर हा सक्तीपेक्षा स्वयंप्रेरणेने व्यक्त व्हायला हवा. मध्यंतरी ‘कबाली’ चित्रपटाच्या वेळी पणजीच्या आयनॉक्समध्ये लेखक सलील चतुर्वेर्दी पाठीच्या मणक्याच्या त्रासामुळे राष्ट्रगीतावेळी बसून राहिले तर त्यांना मारहाण झाली होती. असे प्रकारही सर्वस्वी गैर आहेत. राष्ट्रभक्ती ही सक्तीने लादता येत नसते. ती अंतरात असावी लागते. केवळ स्वतःचे अहंकार कुरवाळण्यासाठी किंवा राष्ट्रगीताप्रती अनादर दाखवण्यासाठी कोणी जाणीवपूर्वक बसून राहात असेल तर तेही गैर ठरेल. शेवटी आपण कितीही व्यक्तिस्वातंत्र्य म्हटले तरी शेवटी आपण ज्या देशात राहतो, त्याचे कायदे कानून पाळणे आणि त्याच्या संविधानाच्या चौकटीत वावरणे आपल्यावर बंधनकारक आहे. व्यक्तिस्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. जगभरातील देशांमध्ये राष्ट्रीय प्रतिकांचा सन्मान करणे नागरिकांकडून अपेक्षिले जाते. जेव्हा आपल्या राष्ट्रगीताची धून वाजू लागते, तेव्हा आपल्या ओठांवर सहजपणे ते शब्द यायला हवेत. तो आपल्या ह्रदयातील राष्ट्रभक्तीचा सहजोद्गार ठरला पाहिजे. मारून मुटकून आणि कायदा करून, सक्ती करून राष्ट्रभक्ती रुजवण्यात काही अर्थ नाही. ती मूलतः अंगात बाणवणारी नागरी संस्कृती निर्माण करण्यावर आपला भर असायला हवा. विद्यापीठांच्या आवारांमध्ये मोठमोठ्या उंचीचे राष्ट्रध्वज लावल्याने देशभक्ती रुजणार नाही. त्यासाठी आपल्या शिक्षणक्रमामध्ये देशभक्तीचे रोपटे रोवावे लागेल. आजही आपल्या इतिहासाच्या पुस्तकांमध्ये या देशाशी काडीमात्र संबंध नसलेल्यांच्या आणि आक्रमकांच्या गौरवगाथा गायिल्या गेलेल्या दिसतात. अशा शिक्षणाने राष्ट्रभक्ती रुजणार कशी?