आनंद यादव ः मराठी साहित्यातला भूमिपुत्र

0
1315

– नारायण महाले

मराठी ग्रामीण साहित्य चळवळीचे प्रणेते अशी ओळख असलेले ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांचे अलीकडेच निधन झाले. त्यांच्या वाङ्‌मयीन कार्यकर्तृत्वाचा हा संक्षिप्त गोषवारा-
साहित्यिक म्हणून त्यांना प्रतिष्ठा मिळाली. सन्मानाचे व प्रतिष्ठेचे अनेक पुरस्कारही त्यांना मिळाले. ‘झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कारही मिळाला. पण साहित्यक्षेत्रातील राजकारणामुळे त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवता आले नाही. २००९ सालच्या ८२ व्या महाबळेश्‍वर येथील साहित्य संमेलनासाठी त्यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. त्यांच्या ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीला वारकरी संप्रदायाने हरकत घेतल्यामुळे त्यातील आक्षेपार्ह भाग त्यांना वगळावा लागला. पण त्यानंतरही समाधान न झाल्यामुळे वारकरी संप्रदायाने या कादंबरीवर कायमची बंदी आणायला भाग पाडले. परिणामी, संमेलनापूर्वी चार दिवस अगोदर आनंद यादवांना संमेलनाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला.

आनंद यादव हे मराठी साहित्याशी जोडले गेलेले नाव. कथा, कविता, कादंबरी, ललितलेख, समीक्षा इत्यादी साहित्यप्रकारांत लक्षणीय स्वरूपाचे लेखन करणारे सव्यसाची लेखक म्हणून त्यांचे नाव मराठी वाचकांना सुपरिचित आहे. महाराष्ट्रातल्या ग्रामीण जीवनाचं दर्शन घडवणार्‍या कथा, कादंबर्‍या आणि कवितांचा लेखक म्हणून त्यांचे वाङ्‌मयीन कर्तृत्व गौरवाला पात्र ठरले आहे.
ललित साहित्यातल्या त्यांच्या कसदार लेखनामुळे आणि समीक्षात्मक लेखनात दिसणार्‍या व्यासंगी व अभ्यासू वृत्तीमुळे मराठी साहित्यातल्या यशस्वी लेखकांत त्यांच्या नावाचा अंतर्भाव करावा लागतो. ग्रामीण साहित्याचे ते अभ्यासक व समर्थक होते. साहित्यातल्या ग्रामीण फळीचे नेतृत्व त्यांनी जोरकसपणे व प्रभावीपणे केले.
पु.लं.चे आशीर्वाद आणि प्रोत्साहन
पु. ल. देशपांडे यांचा आशीर्वाद आणि प्रोत्साहन ही त्यांच्या जीवनातील महत्त्वाची व प्रेरणादायी घटना होय. ‘बाळ, हिरव्या भूमीत. तुला सोन्याचा हंडा सापडला आहे. हे गुण तू जप,’ असा पु. ल. देशपांडे यांनी त्यांना ‘हिरवे जग’ या कवितासंग्रहावेळी दिलेला सल्ला त्यांनी आयुष्यभर शिरोधार्य मानून निष्ठेने लेखन केले.
स्वानुभव हीच प्रेरणा
ग्रंथ नावाच्या वस्तूला तसेच शिक्षणाला अजिबात थारा नव्हता अशा ग्रामीण वातावरणात त्यांना साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळाली. त्यांचे बरेचसे साहित्य हे त्यांच्या स्वानुभवाच्या बीजातूनच फुललेले आहे. त्यातील अनुभव अस्सल बावनकशी. तितकेच त्यांचे फुलून आलेले साहित्यरूपही अस्सल. या मातीशी नाते सांगणारे.
पुरस्कारांचे मानकरी
‘झोंबी’ या त्यांच्या आत्मचरित्रात्मक कादंबरीला साहित्य अकादमीचा (१९९०) पुरस्कार व राज्य पुरस्कार यांच्यासह एकूण आठ पुरस्कार प्राप्त झाले आहेत. ‘हिरवे जग’, ‘खळाळ’, ‘मातीखालची माती’, ‘गोतावळा’ या त्यांच्या पुस्तकांचा महाराष्ट्र शासनाने पुरस्कार देऊन गौरव केला आहे. ‘कोयनेच्या काठावर’ या प्रदीर्घ कवितेस आणि ‘खेडं जागं झालं’ या नाटिकेला पंचवार्षिक योजना पुरस्कार लाभला.
वृत्तीने मूळ कवी असलेल्या आनंद यादवांच्या लेखनसंभारात ‘खळाळ’, ‘आदिताल’, ‘डवरणी’सारखे टवटवीत कथासंग्रह आहेत. ‘गोतावळा’, ‘एकलकोंडा’, ‘नटरंग’, ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ यांसारख्या कादंबर्‍या आहेत. ‘स्पर्शकमळे’, ‘पाणभवरे’सारखे ललित लेखांचे संग्रह आहेत. विनोदी कथांप्रमाणेच ‘ग्रामीणता ः साहित्य आणि वास्तव’सारखे वैचारिक ग्रंथही आहेत. ‘हिरवे जग’, ‘मळ्याची माती’ हे अस्सल ग्रामीण अनुभवविश्‍वाचा आविष्कार करणारे काव्यसंग्रह आहेत.
‘मराठी लघुनिबंध ः प्रेरणा, प्रवृत्ती आणि विकास’ हा आनंद यादवांच्या प्रबंधाचा विषय होता. त्यांच्या या प्रबंधाला कै. शि. म. परांजपे आणि केळकर पारितोषिकही मिळाले होते.
कवितेने लेखनकारकिर्दीची सुरुवात
यादवांनी आपल्या लेखनकारकिर्दीची सुुरुवात १९५५ च्या सुमारास काव्यलेखनाने केली. त्यांची प्रतिमा निर्माण झाली कवी म्हणूनच. काव्य आणि गद्य अशा दोन्ही स्वरूपाचे लेखन त्यांनी सुरुवातीच्या काळापासूनच केले.
आपले जीवनानुभव कवितेच्या माध्यमातून पुरेशा समर्थपणे व प्रभावीपणे व्यक्त होत नाही याची जाणीव होताच यादव सहजपणे कथालेखनाकडे वळले. कथेतून व्यक्त होऊ पाहणारा जीवनानुभव कादंबरीसारख्या विस्तृत कॅनव्हासची मागणी करत आहे असे जाणवताच त्यांनी कादंबरी लेखनाला सुरुवात केली.
त्यांनी स्फूट स्वरूपाचे ललित गद्य लिहिले आहे. त्यातून आपल्या अनुभवविश्‍वाचा आविष्कार केला आहे. ‘पाणभवरे’ हा ललित लेखसंग्रह याची साक्ष देतो.
त्यांच्या काव्यप्रतिभेचा उत्कट आविष्कार ‘मायलेकरं’ या दीर्घ भावकाव्यात आढळतो. यातून या लेखकाचा पिंड मूलतः कवीचा आहे याचा प्रत्यय येतो.
चिंतनशील लेखन
ललित लेखन आणि समीक्षा लेखन या दोन आघाड्या यादवांनी समर्थपणे सांभाळल्या आहेत. साहित्यव्यवहाराशी संबंधित असलेल्या अनेक प्रश्‍नांचे यादवांनी गंभीरपणे चिंतन केल्याचे जाणवते. चिंतनातूनच त्यांचे समीक्षा लेखन निर्माण झाले. साहित्यकलेची निर्मितीप्रक्रिया, ग्रामीण स्वरुपाचे स्वरुप आणि प्रयोजन, आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका, साहित्याची कलाशीलता आणि समाजपरता इत्यादी प्रश्‍नांचा त्यांनी केलेला ऊहापोह मूलगामी स्वरूपाचा आहे.
ग्रामीण साहित्याची पूर्वपीठिका शोधण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामीण साहित्य प्रवाहाचे मूल्यमापनही त्यांनी केले आहे. ‘ग्रामीण साहित्य, स्वरूप आणि समस्या’, ‘ग्रामीणता ः साहित्य आणि वास्तव’, ‘मराठी साहित्य-समाज आणि संस्कृती’ आणि ‘साहित्याची निर्मितीप्रक्रिया’ या ग्रंथांतील लेखन याची साक्ष देतात. त्यांनी वेगवेगळी अनुभवविश्‍वे कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे. पण आपण प्राधान्याने ग्रामीण लेखक आहोत याचे भान दृष्टिआड होऊ दिले नाही.
आनंद यादवांनी आपल्या लेखनाची सुरुवात एक प्रकारच्या असमाधानातून केल्याचे जाणवते. १९५० ते १९६० या कालखंडात प्रसिद्ध झालेल्या ग्रामीण साहित्यातून खरे ग्रामीण जीवन चित्रीत झाले नाही अशी त्यांची धारणा होती. ग्रामीण जीवनाचे वास्तवतापूर्ण चित्र रेखाटण्याच्या उद्देशानं त्यांनी लेखनास प्रारंभ केला.
‘बदलते समाज-जीवन’ हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ‘उखडलेली झाडे’ या कथासंग्रहातील कथालेखन यासंदर्भात लक्षणीय आहे. ‘मळ्याची माती’ या कवितासंग्रहातील काही कवितांतूनही या जाणिवा अभिव्यक्त झाल्या आहेत. आपल्या अनुभवविश्‍वातील बदलत्या जाणिवांना साक्षी ठेवून त्यांच्यातला लेखक विकसित झाल्याचे जाणवते. आपल्या अनुभवविश्‍वाशी प्रामाणिक राहून लेखन केले पाहिजे ही त्यांची आंतरिक जाणीव होती. या जाणिवेतूनच ‘गोतावळा’ या त्यांच्या कादंबरीचा जन्म झाला आहे.
ग्रामीण वाङ्‌मयविषयक कामगिरी
ग्रामीण साहित्य चळवळीला त्यांनी दिलेले वैचारिक पाठबळ ही अलीकडच्या काळातील महत्त्वाची घटना होय. आधुनिक ग्रामीण साहित्याची भूमिका त्यांनी ग्रामीण साहित्य संमेलन, मेळावे, परिसंवाद यातून विस्तृतपणे मांडली आहे. १९७५ च्या सुमारास सुरू झालेल्या या चळवळीचे नेतृत्वही त्यांनी केले आहे. खेड्यातला नवा लेखक लिहिता झाला पाहिजे, त्याच्यावर वाङ्‌मयीन संस्कार झाले पाहिजेत या हेतूने त्यांनी संपादने केली आहेत. साहित्यक्षेत्रातील या जाणीवजागृतीमुळे नवा ग्रामीण लेखक-कवी आत्मविश्‍वासाने व जाणीवपूर्वक लेखन करू लागला. ग्रामीण साहित्याच्या वास्तववादी प्रवाहाला सामाजिकतेचे भक्कम अधिष्ठान देण्याचा त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. ग्रामीण साहित्यचळवळीवर झालेले वाङ्‌मयीन हल्ले त्यांनी समर्थपणे परतवून लावले आहेत. रसपूर्ण ललितलेखन करणार्‍या यादवांनी टीकाकार म्हणूनही एखाद्या विषयाचा चिकित्सक वृत्तीने मागोवा घेतला आहे.
‘‘यादवांच्या रूपाने ग्रामीण साहित्याला चांगला ‘भाष्यकार’ मिळाला आहे,’’ असे गो. म. कुलकर्णी यांनी त्यांच्याविषयी गौरवोद्गार काढले आहेत. ग्रामीण वाङ्‌मयाला प्रवक्ता हवा होता. याच जाणिवेतून यादवांची समीक्षा निर्माण झाली आहे. ग्रामीण वाङ्‌मयाच्या संदर्भात यादवांची भूमिका प्रेषिताची होती. पण प्रेषिताचा आवेश त्यांच्या समीक्षेत दिसून येत नाही. हा दुर्मीळ गुण त्यांच्या अंगी होता.
आधुनिक काळातील महत्त्वाचा लेखक
आत्मकथनात्मक कादंबरी ही यादवांनी मराठी वाङ्‌मयाला दिलेली महत्त्वाची देण आहे. ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या आत्मचरित्रात्मक कादंबर्‍या याची साक्ष देतात. ‘झोंबी’ कादंबरीला १९९० चा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आहे. लहानपणापासून शिक्षणासाठी यादवांनी ज्या हालअपेष्टा भोगल्या त्याचे विस्तृत वर्णन ‘झोंबी’ कादंबरीत वाचायला मिळते. ‘झोंबी‘मध्ये त्यांनी बालपणाची कथा सांगितली आहे. सत्य आणि कल्पना यांच्या उभ्या-आडव्या धाग्यांच्या ताण्याबाण्यात विणलेल्या वस्त्रासारखी त्यांची ही आत्मकथा आहे. त्यांनी आपली आई, वडील, ढीगभर भावंडे, आप्त, शाळासोबती, बरे-वाईट शिक्षक यांना आपल्या स्मृतिकोशात जपले होते याचे प्रत्यंतर ‘झोंबी’ वाचताना येते. एस.एस.सी.नंतर एम.ए.ची पदवी मिळेपर्यंतची त्यांची संघर्षकथा ‘नांगरणी’मध्ये वाचायला मिळते, तर ‘घरभिंती’मध्ये प्राध्यापक झाल्यापासूनचा अठरा वर्षांचा म्हणजे १९६१ ते डिसेंबर १९७८ च्या कालखंडातील त्यांच्या भावंडांचे, आई-दादांचे, परिस्थितीच्या वादळात झालेल्या पडझडीचे चित्रण करण्यात आले आहे.
अगदी अक्षरशत्रू म्हणता येईल अशा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेले यश इतरांनासुद्धा प्रेरणादायक ठरणारे आहे. त्यांच्या ‘झोंबी’, ‘नांगरणी’, ‘घरभिंती’ या कादंबर्‍यांना जी अमाप वाचप्रियता लाभली आहे त्याचे हेच रहस्य आहे, आणि म्हणूनच शिक्षणाच्या माध्यमातून आपले जीवन घडवू पाहणार्‍या बहुजन समाजातल्या सामान्य वाचकांना त्यांची जीवन-संघर्ष कथा जवळची वाटते. आपली वाटते.
यादवांनी आत्मविष्कारासाठी वेगवेगळे वाङ्‌मयप्रकार समर्थपणे हाताळले. त्या-त्या वाङ्‌मयप्रकारात आपले वैशिष्ट्यपूर्ण स्थानही निर्माण केले. ग्रामीण साहित्यात ते अग्रणी होतेच, पण एकूणच मराठी साहित्यातले त्यांचे योगदान निर्विवाद आहे. अनोख्या अनुभवविश्‍वाचा शोध घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ग्रामीण जीवन हाच त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू राहिला आहे. साहित्यातल्या मळलेल्या वाटेेने ते गेले नाहीत. अनुभवांच्या आणि आविष्काराच्या नव्या वाटा त्यांनी आपल्याशा केल्या. ग्रामीण साहित्याची चळवळ त्यांनी जाणीवपूर्वक आकाराला आणली. ग्रामीण साहित्याच्या वास्तववादी परंपरेला जाणीवपूर्वक समाजाभिमुख बनवले. मूलभूत सामाजिक जाणिवा व्यक्त करणारे ललितलेखन त्यांनी केले. मराठी साहित्यविचारात महत्त्वाची भर घालणारे समीक्षालेखन केले. त्यामुळे आधुनिक काळातील एक महत्त्वाचे लेखक म्हणून त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल.

आनंद यादवांचे प्रकाशित साहित्य
कादंबर्‍या
गोतावळा, नटरंग, माऊली, झोंबी, नांगरणी, घरभिंती, एकलकोंडा.
ललित लेख
स्पर्शकमळे, पाणभवरे, मातीखालची माती (व्यक्तिचित्रे).
कविता संग्रह
हिरवे जग, मळ्याची माती, मायलेकर.ं
कथासंग्रह
माळ्यावरची मैना, आदिताल, डवरणी, खळाळ, उखडलेली झाडे, घरजावई.
संपादने
मातीतले मोती, तिसर्‍या पिढीची ग्रामीण कथा (सहकार्याने)
वगनाट्य
रात घुंगरांची
वैचारिक/समीक्षात्मक
ग्रामीण साहित्य ः स्वरूप आणि समीक्षा
मराठी साहित्य ः समाज आणि संस्कृती
साहित्याची निर्मितीप्रक्रिया
आनंद यादवांचा मूळ पिंड कवीचा. त्यांनी आपल्या लेखनाचा प्रारंभ कवितेपासूनच केला. ग. पां. परचुरे यांच्या ‘परचुरे’ नावाच्या मासिकात ‘तळची भाकर’ ही कविता छापून आली होती. मासिकाच्या पानावर स्थानापन्न झालेली आनंद यादवांची ही पहिली कविता-
ऐकलं का हो| उशीर करूनच न्याहारीला जावा|
जेवू द्यात दीर-मामाजी आदी| त्यांस्नी वाढत्यात थोरल्या जावा|
कोणबी न्हाई वागत| जिवाभावानं माझ्यासंगं|
खाऊ द्यात ती दाल्ला-बायकू| सोनं-रूपं आनंदानं|
जाऊन शिस्तीनं जेवायला तुम्ही| हळूच उचला तळची भाकर|
आणि तिच्या पापडाखालचं| लोणी, सांडगं खावा अगुदर|
ठावं न्हाई कुणाला गुपीत| सासूबाईलाबी ते नका बोलू|
त्याबी घालत्यात दिरा-नणंदास्नी| ‘आणता नव्हं मला दिवाळीत शालू?’