एल कमांडंट

0
92

क्यूबाचे क्रांतिकारी नेते फिडेल कॅस्ट्रो यांच्या निधनाने एक प्रदीर्घ संघर्षपर्व संपले आहे. अमेरिकेच्या उंबरठ्यावरील या छोट्याशा कॅरिबियन देशामध्ये सतत विरोधाचा झेंडा फडकत ठेवणार्‍या इटुकल्या क्यूबाचे नेतृत्व तब्बल पाच दशके करणार्‍या कॅस्ट्रो यांची ती संघर्षकारी राजवट अमेरिकेच्या दृष्टीने हुकूमशाहीची आणि मानवाधिकारांचे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे हनन करणारी असली, तरीही छोट्या, गरीब, विकसनशील देशांना विळखा घालणारा अमेरिकी भांडवलवाद आणि चंगळवादी संस्कृतीला निर्धाराने अटकाव करण्याचे कॅस्ट्रो यांचे कार्य ऐतिहासिक आणि विस्मयकारी होते. उठावांचा आणि हत्येचा सहाशेहून अधिक वेळा प्रयत्न होऊनही एवढा प्रदीर्घ काळ स्वतःची लोकप्रियता आपल्या देशामध्ये अबाधित ठेवणे ही देखील सोपी गोष्ट नव्हे. म्हणूनच या शतकावर स्वतःची नाममुद्रा उमटवू शकलेल्या मोजक्या सत्ताधीशांमध्ये त्यांची गणना करावी लागते. एका जमीनदार स्पॅनिश स्थलांतरिताचा हा मुलगा. पण त्याने देशातील फल्जेन्सिओ बॅटिस्टा यांची हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी दंड थोपटले आणि वयाच्या अवघ्या ३२ व्या वर्षी क्रांती घडवीत त्यांची राजवट उलथवून टाकली. मेक्सिकोमध्ये जाऊन बंडखोरांची फौज ते उभी करतात काय, अवघ्या ८१ समर्थकांसह क्यूबाच्या पूर्व किनार्‍यावर धडक देतात काय, तेथील रक्तरंजित चकमकीनंतर बचावलेल्या मोजक्या सहकार्‍यांनिशी डोंगरदर्‍यांत पलायन करतात काय आणि नंतर आपल्या समर्थकांची संख्या वाढवत नेत सत्ताच उलथवून टाकतात काय, फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचे उजवे हात चे गवारा यांनी पाश्‍चिमात्त्य गुलछबूंची भोगभूमी बनलेल्या क्यूबाला त्या मरणविळख्यातून बाहेर काढले. गोरगरिबांना मोफत शिक्षण, आरोग्य सुविधा पुरविल्या, माफियांचे आणि जमीनदारीचे उच्चाटन करीत क्यूबाची नवी ओळख घडवली. गरिबांचे जीवनमान उंचावले. अमेरिकेसारखा महाबलाढ्य शत्रू समोर असल्याने अर्थातच त्यांना रशियाची साथ घ्यावी लागली. रशियाने अब्जावधी डॉलरच्या वार्षिक मदतीच्या आधारे क्यूबामध्ये आपला लेनिनवाद – मार्क्सवाद पोहोचवला. अमेरिकेने व्यापारबंदी लादून क्यूबाचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यालाही ते रशियाच्या मदतीने पुरून उरले. ऐंशीच्या दशकातील अमेरिका आणि रशिया यांच्यातील शीतयुद्धाच्या केंद्रस्थानी फिडेल कॅस्ट्रो आणि त्यांचा क्यूबा होता, कारण अमेरिकेपासून बचावासाठी त्यांनी रशियाची अण्वस्त्रे आपल्या देशात आणून उभी केली होती. क्यूबावरील अमेरिकी आक्रमण टाळण्यासाठी रशियाने अमेरिकेवर अण्वस्त्रे चालवावीत अशी हाक त्यांनी रशियाला दिली होती, परंतु जगाच्या सुदैवाने तत्कालीन रशियन राष्ट्राध्यक्ष निकिता ख्रुश्‍चेव्ह यांना सद्बुद्धी झाली आणि त्यांनी चिथावणीला बळी न पडता अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जॉन केनेडींशी वाटाघाटी करीत या संघर्षाला विराम देत आणि क्यूबावर आक्रमण न करण्याच्या अटीवर आपली अण्वस्त्रे मागे घेतली. नव्वदच्या दशकात सोव्हिएत रशियाच्या पतनानंतर क्यूबा आर्थिक संकटात सापडला, परंतु व्हेनेझुएलाकडून स्वस्तात तेल मिळवले, भारतासह इतर देशांकडून जीवनावश्यक वस्तूंचे साह्य मिळवले आणि आपला देश युरोप आणि कॅनडाच्या पर्यटकांसाठी खुला करून त्या जोरावर त्या छोट्याशा देशाने तग धरली, परंतु अमेरिकेपुढे शरणागती पत्करली नाही. आयसेनहॉवरपासून जॉर्ज बुश यांच्या दुसर्‍या राजवटीपर्यंत जवळजवळ नऊ अमेरिकी राष्ट्राध्यक्ष बदलले, परंतु कॅस्ट्रो यांची क्यूबातील लोकप्रियता कमी झाली नाही. शेवटी शेवटी केवळ स्वतःच्या आजारपणामुळे त्यांनी आपल्या धाकट्या बंधूंकडे सत्तासूत्रे सोपवत निवृत्ती पत्करली. लष्करी गणवेश, दाढी आणि ओठांत लांबलचक क्यूबन सिगार असा हा क्रांतिकारी नेता – एल कमांडंट, जगाच्या इतिहासावर आपला एक ठसा उमटवून गेला आहे.