शारदीय विरेचन

0
1533

– डॉ. मनाली म. पवार (गणेशपुरी-म्हापसा)

आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये पंचकर्मास स्वतःचे असे एक स्थान आहे. स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकण्यासाठी प्रत्येक ऋतुमध्ये वाढलेल्या दोषांचे निर्हरण पंचकर्म संशोधनद्वारे करावे म्हणूनच शरद ऋतुमध्ये वाढलेल्या पित्ताचे निर्हरण करण्यासाठी विरेचन सांगितलेले आहे. हा विरेचनविधी फक्त रोग्यांनीच न करता स्वस्थ माणसांनीही त्यांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी करावे. 

त्वचेवर उठणारे पुरळ, लालसरपणा, दाह, स्राव, भेगा, तारुण्यपिटिका, पुटकुळ्या, पित्ताचे धापोडे, सोरायसीस, चेहरा काळवंडणे… इ. प्रकारचे अनेक गंभीर त्वचाविकार घेऊन सध्या रुग्ण दवाखान्यात येताना दिसतात. त्याचप्रमाणे भूक लागत नाही, संडास साफ होत नाही, हात-पाय-डोळ्यांची जळजळ जरा जास्त होते आहे, चिडचिड वाढली आहे… अशा प्रकारच्या तक्रारीही वाढलेल्या दिसत आहेत. तर या तक्रारी आत्ताच वाढण्याचे कारण काय?…
ऋतूबदल… पावसाळ्यानंतर हिवाळा सुरू होण्यापूर्वी वातावरण पुन्हा गरम होते ज्याला आपण ‘ऑक्टोबर हीट’ किंवा ‘विश्‍वामित्राचा उन्हाळा’ असे म्हणतो – तो म्हणजे शरद ऋतू. पावसाळ्यातला गारवा नाहीसा होऊन शरद ऋतुतील तीव्र सूर्यामुळे उष्णता अचानक वाढल्याने शरीरातील पित्त प्रकूपित होते व पित्ताचे अनेक त्रास, आजार मनुष्यांना सतावू लागतात.
पण योग्य तो आहार-विहार, औषधोपचार व ऋतुचर्येचे पालन केल्यास हे त्रास नक्कीच आपण आटोक्यात आणू शकता. या ऋतूत भूक लागली असता चवीला गोड, थोडेसे कडू, तुरट, पचायला हलके, थंड असे पित्तशामक अन्नपान करावे. दूध, लोणी, तूप यांचे नियमित सेवन करावे. तांदूळ, गहू, ज्वारीसारख्या धान्यांचा वापर करावा. भाज्यांमध्ये दुधी, कारले, तोंडली, पडवळ, दोडकी, घोसाळी, भेंडी, मेथी, बटाटा, पालक, मुळा, चवळी, वालाची पाने यांसारख्या पचायला हलक्या, चवीला किंचित तुरट-कडवट भाज्या खाव्या.
मूग, मटकी, कडवे वाल, मसूर या कडधान्यांचा वापर करावा. पित्त वाढत असल्याने या ऋतूंत सौम्य मसाल्यांचा वापर करावा. उदा. हिंग, तमालपत्र, जिरे, सुंठ, हळद, धने, मेथ्या, फोडणीसाठी शक्य असेल तेव्हा साजूक तुपाचाच उपयोग करावा. तसेच डाळींब, सफरचंद, केळी ही फळे खावीत. कोकम सरबत, शहाळ्याचे पाणी, ऊसाचा रस, उकळून गार केलेले पाणी प्यावे. ड्रायफ्रूटपैकी बदाम, खारीक, मनुका, अंजीर खावे. मधुर रसात्मक अशी तांदळाची खीर, रव्याची खीर, दुधी हलवा, उकडीचे मोदक, मुगाचे लाडू, पेठा यांचे आवर्जुन सेवन करावे.
बाहेर जाताना ऊन लागणार नाही याची काळजी घ्यावी. सुती अथवा रेशमी वस्त्रे परिधान करावी. तसेच चंदन, वाळा, मोगरा, गुलाब या सुगंधी व पित्तशामक अत्तरांचा वापर करावा. अशाप्रकारे या ऋतूत योग्य आहार-विहारांचे पालन करून पित्तज त्रासांपासून स्वतःचा बचाव करावा व त्याचबरोबर या प्रकृपित झालेल्या पित्ताचे निर्हरण करण्यासाठी ‘विरेचन’सारख्या संशोधन कर्माचा उपयोग करावा. ‘पिंडी ते ब्रह्मांडी’ या न्यायानुसार वातावरणात किंवा निसर्गात वाढलेली उष्णता शरीरातील उष्ण, तीक्ष्ण गुणयुक्त असणार्‍या पित्तालाही वाढवते व त्याचे शमन करण्यासाठी ‘विरेचन’ हा सर्वश्रेष्ठ उपाय होय.

विरेचन म्हणजे काय?

दोषांना अधोमार्गाने अर्थात गुदावाटे बाहेर काढून टाकण्याच्या शोधनक्रियेला विरेचन असे म्हटले जाते. दोष म्हणजे अधोमलविसर्जन. यामध्ये रेचक द्रव्ये पित्ताचा संचय असणार्‍या आमाशय व ग्रहणी या स्थानात प्रवेश करून तेथील मल द्रवीभूत करून गुदावाटे बाहेर टाकतात.
‘विरेचन पित्तहराणां (श्रेष्ठं)|’
विरेचन हा पित्तदोषावरील श्रेष्ठ असा शोधनोपक्रम आहे. पित्तासाठी, पित्तप्रधान दोषासाठी, पित्तस्थानगत कफासाठी एवढेच नव्हे तर सर्व प्रकारच्या कफदोषांसाठीही विरेचनाचा उपयोग होतो. पित्तासाठी मृदू विरेचन तर कफांसाठी तीक्ष्ण विरेचन द्यावे. तसेच मृदू विरेचन हा वातावरीलही एक यशस्वी उपक्रम होय. जेव्हा रक्तदुष्टी होते तेव्हा पित्ताचीही दुष्टी होते. म्हणून विरेचन हे रक्तदुष्टीतही तितकेच कार्यकारी होत असते. याप्रकारे विरेचन हा अनेक कर्मे करणारा उपक्रम आहे. मांसगतविकार, मेदोविकार आणि संधी, मज्जा तथा शुक्रगत विकारांसाठीही विरेचन ही प्रधान चिकित्सा आहे. योनिदोष, स्तन्यदोष आणि अनेक प्रकारच्या मनोविकारांमध्येही विरेचन हा एक अत्यंत उपयुक्त असा उपक्रम आहे.
म्हणूनच विरेचन हा उपक्रम मलापह म्हणजे शरीरमलाचे शोधन करणारा, रोगहर – मलाचे सोधन झाल्यानेच रोग दूर करणारा, बलप्रसादन – बल वाढविणारा, वर्षप्रसादन – वर्ण प्राकृत करणारा आणि आयुष्यकर – रोग दूर करून स्वास्थ्य प्राप्त झाल्याने चिरकालपर्यंत स्वास्थ्य टिकवून आयुष्य वाढविणारा आहे असे म्हटले आहे.
स्वस्थ, चिरतरुण शरीरासाठी विरेचन ही सर्वांत साधी व सोपी संशोधन चिकित्सा होय. अगदी लहान मुलांपासून ते वृद्धापकाळापर्यंत बरेच व्याधी विरेचनाने दूर करता येतात. आचार्य सुश्रुतांनी एक फार सुंदर दृष्टांत देऊन विरेचनाचे पित्तरोगहर्तृत्व स्पष्ट केले आहे. ते म्हणतात की एखाद्या जलाशयातील जल नाहीसे केले तर जलाच्या आश्रयाने राहणार्‍या कमलादि जलवनस्पती, मासे आदी जलचर या सर्वांचाच जसा नाश होतो तद्वत् विरेचनाने पित्ताचे शोधन केल्याने या पित्ताच्या आश्रयाने निर्माण होणारे अनेकविध रोग आपोआपच नष्ट होतात.
आयुर्वेद चिकित्सा पद्धतीमध्ये पंचकर्मास स्वतःचे असे एक स्थान आहे. स्वस्थ माणसाचे स्वास्थ्य टिकण्यासाठी प्रत्येक ऋतुमध्ये वाढलेल्या दोषांचे निर्हरण पंचकर्म संशोधनद्वारे करावे म्हणूनच शरद ऋतुमध्ये वाढलेल्या पित्ताचे निर्हरण करण्यासाठी विरेचन सांगितलेले आहे. हा विरेचनविधी फक्त रोग्यांनीच न करता स्वस्थ माणसांनीही त्यांचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी करावे.
विरेचन विधी –
पंचकर्म करण्यापूर्वी काही पूर्वकर्मे करणे अत्यंत आवश्यक असते. ही पूर्वकर्मे म्हणजे स्नेहन व स्वेदन.
स्नेहन – स्नेहन म्हणजे शरीरात स्निग्ध गुण उत्पन्न करणे. यासाठी तूप किंवा तेल याचे सेवन करणे व शरीराला बाहेरून तेल लावणे याचा समावेश होतो. जो स्नेह घ्यायचा तो आदल्या दिवशी घेतलेल्या आहाराचे सम्यक् पचन झाल्यावर प्रातःकाळी रिकाम्या पोटी वर्धमान मात्रेत घ्यावा. स्नेहनानंतर करण्याच येणारा उपक्रम म्हणजे स्वेदन. स्वेदनामध्ये पाण्याच्या वाफेद्वारे सम्पूर्ण शरीराला घाम आणला जातो. स्नेहन व स्वेदन क्रियेद्वारे कोष्ठमार्ग सोडून इतरत्र गेलेले दोष परत कोठ्यात, आमाशयात व पक्वाशयात येतात व नंतर विरेचनाने, शरीराबाहेर टाकले जातात.
सामान्यतः कटुका, आरग्वध, द्राक्षा यांचे क्वाथ, एरंड तेल, अभयारिष्ट, जयपालाचे कल्प, अश्‍वकंचुकी, इच्छाभेदी, नाराचरस, जलोदरारी औषधे विरेचनासाठी वापरतात. त्यापैकी रुग्णाची प्रकृती, वय, सत्व, सात्म्य, आहार, देश इत्यादी बाबी लक्षात घेऊन तसेच व्याधी व त्यास कारणीभूत दोषांचा विचार करून औषधी द्रव्य व मात्रा ठरवावी. स्नेहनामध्ये १२ तास भूक लागणार नाही इतके स्नेह प्यावे. ७ दिवस स्नेहन करून सम्यक स्निग्धाची लक्षणे दिसू लागल्यानंतरच विरेचन देता येते. यथाविधी स्नेहन केल्यानंतर २ दिवस मध्ये जाऊ देऊन मगच विरेचन करावे. या दोन दिवसाच्या काळात स्वेदनमात्र चालू ठेवावे व स्निग्ध, द्रव उष्ण असे मांसरस, ओदन, अम्लफळांचा रस, लघु आहार द्यावा व पिण्यासाठी गरम पाणी.
मृदू विरेचनाची अपेक्षा असेल तर मात्र विरेचक रात्रीच्या भोजनानंतर देणे इष्ट ठरते. परंतु विरेचनासाठी मात्र रिकाम्या पोटी सकाळीच ९-१० च्या सुमारास विरेचन करावे.
प्रधान कर्म –
रुग्णाची परिक्षा करून, रात्रीच्या आहाराचे सम्यक् पाचन झालेले आहे याची खात्री करून, स्वास्तिवाचनादि मंगल उपचार करून रुग्णाचे मनोबल वाढवून, रुग्णास धीर देऊन नंतर विरेचन औषध पाजावे. शरद ऋतुमध्ये पित्तदोष प्रधान असल्याने मधुर, शीत द्रव्ये वापरणे श्रेयस्कर. पित्तप्राधान्यात त्रिवृत्त चूर्ण, द्राक्षाक्वाथ द्यावा. ही औषधी द्रव्ये कोष्ण जलाबरोबर द्यावी. वेगोदीरण चांगले व्हावे यासाठी वारंवार गरम पाणी प्यावे. वेगोदीरण झाल्यानंतर फार जोर न करता, न कुंथता येणार्‍या वेगाचे विसर्जन करावे. विरेचनामध्ये प्रथमतः मल व नंतर पित्त, कफ व वायू हे क्रमाने बाहेर पडतात.
पश्‍चात् कर्म –
विरेचनाचे वेग येण्याचे बंद झाल्यानंतर रुग्ण पुन्हा पूर्वस्थितीत येईपर्यंत जे विशिष्ट उपचार करावे लागतात त्यांनाच पश्‍चात कर्म म्हणतात. संसर्जन क्रम, तर्पण, आहारविहारादि अन्य पथ्यापथ्य हे सर्व अपेक्षित आहे. संसर्जन क्रम म्हणजे लघु आहारापासून गुरु आहारापर्यंत आहार क्रमाक्रमाने वाढविणे. यामध्ये पेया, विलेपी (कण्हेरी), अकृतयुष (फोडणी न दिलेले सार किंवा सूप), कृतयूष (फोडणी दिलेले सूप किंवा सार), अकृतमांसरस, कृतमांसरस व नंतर सामान्य आहार हे क्रमाने द्यावे.
अशाप्रकारे योग्य आयुर्वेदिक वैद्याच्या सल्ल्यानुसार विरेचन विधी या शरद ऋतूत करून घ्यावा व सारखे सारखे बारीक-सारीक तक्रारी घेऊन डॉक्टरांकडे जाणे टाळावे.
त्याचप्रमाणे ज्यांना संपूर्ण विरेचन विधी करून घेण्यास शक्य नसल्यास व पित्ताच्या तक्रारी सारख्या मान वर काढत असल्यास रोज रात्री या ऋतूत विरेचन द्रव्ये वापरात आणता येतात. रोज रात्री अविपत्तीकर चूर्ण गरम पाण्याबरोबर घेता येते. यकृत किंवा प्लिहेच्या विकारांमध्ये आरग्वध, हरितकी, निशोत्तरसारखी द्रव्ये विरेचनासाठी वापरता येतात. ग्रथित मल, अपचन, कृमी दोष, मूळव्याधसारख्या व्याधीमध्ये पित्ताचे आधिक्य असता एरण्डस्नेह विरेचनासाठी द्यावा. हा स्नेह गरम पाण्यातून, गरम दूधातून, मधाबरोबर घेता येतो. उदर, ग्रहणीसारख्या व्याधीमध्ये तिल्वक घृत, एरंड स्नेहाचा वापर करता येतो.
अशाप्रकारे योग्य वैद्याच्या सल्ल्याने विरेचन विधी, योग्य आहार-विहाराचे पालन करून शरद ऋतुमध्ये स्वास्थ कमवावे.