गलग्रंथी विकाराच्या तपासण्या

0
449

संकलन – नीला भोजराज

गळ्यात फुलपाखरासारख्या दिसणार्‍या थायरॉइड ग्रंथीचे हॉर्मोन शरीरातील विविध पेशींच्या चयापचयासाठी लागतात. यामुळे विविध आजारांमध्ये थायरॉइड हॉर्मोनची तपासणी करतात.
थायरॉइड तपासणी केव्हा करतात?
१) थायरॉइड ग्रंथीच्या आजाराचे त्रास असल्यास जसे –
अ) हायपोथायरॉइडीझम – वजन वाढणे, सुस्त वाटणे, चेहर्‍यावर सूज येणे, पायात गोळे येणे इत्यादी.
आ) हायपरथायरॉइडीझम – वजन कमी होणे, धडधड, थरथर वाटणे, डोळे बाहेर येणे इत्यादी.
इ) गळ्याला सूज येणे, गाठ वाटणे.
२) गंभीर धोका (हाय रीस्क)-
अ) बाळंतपण व नंतर, ५० वर्षांवरील स्त्रिया
आ) इतर आटोइम्यून विकार
इ) चरबीचे असंतुलन – डिसलिपिडेमिया
ई) मूल न होणे, मुलांची वाढ न होणे वा मंद होणे.
उ) काही आनुवंशिक आजार – डाऊन, टर्नर्स सिंड्रोम
काही देशात सर्व जन्मजात बाळांची टीएसएच तपासणी केली जाते. परंतु काहीही त्रास नसताना थायरॉइड टेस्ट करण्याची गरज नसते.
कोणती थायरॉइड टेस्ट करावी?
टीएसएच ही स्क्रिनिंग व फॉलोअपसाठी अत्यावश्यक टेस्ट आहे. इतर टेस्ट या थायरॉइडचा आजार असल्यास एफटी४ व टीएसएच या दोन टेस्ट जरुरी आहेत. एफटी३ किंवा टोटल टी३ची तपासणी हायपरथायरॉइडिझमसाठी जरुरी आहे.
टीएसएच हे पिट्युटरी हॉर्मोन आहे- मेंदूतील शीर्षस्थ ग्रंथी किंवा पियुषिका ग्रंथीत उत्पन्न होणारे आहे.
टी३ टी४ हे थायरॉइड ग्रंथी हॉर्मोन आहेत. टी३,टी४ थायरॉइड बाइंडिंग प्रोटीनला जोडलेले असतात.
टोटल टी३ व टोटल टी४ तपासणी रक्तातील बाउंड व अनबाउंड हॉर्मोन्सची मोजणी करतात.
एफटी४ आणि एफटी३ हे अनबाउंड हॉर्मोन रक्तात असतात व ते शरीरातील पेशींवर काय करतात. म्हणून एफटी४ एफटी३ तपासणी थायरॉइड हॉर्मोनच्या कार्याची अचूक माहिती देतात. रक्तातील एफटी४ची पातळी थायरॉइड ग्रंथीच्या कामाची व आजाराची माहिती देते.
परत तपासणीसाठी कोणत्या टेस्ट कराव्यात?
थायरॉइड आजाराच्यासाठी औषधे सुरू केल्यावर एफटी४ व टीएसएच या टेस्ट ६ ते ८ आठवड्यांनंतर करतात. याआधी टीएसएचची तपासणी करू नये. हायपरथायरॉइड आजारात एफटी३ वा टोटल टी३ करतात. औषधाचा डोस त्यावर ठरतो.
बाळंतपणामध्ये थायरॉइड बाइंडिंग प्रोटीन वाढल्यामुळे टोटल टी३, टी४ वाढतात. म्हणून आजार तपासण्यासाठी बाळंतपणात एफटी३, एफटी४, टीएसएच टेस्ट करतात. ज्या आईला थायरॉइड आजार आहे तिच्या बाळाची तपासणी जन्मानंतर ७-८व्या दिवशी करावी.
अँटीथायरॉइड अँटीबॉडीज
शरीरात टीपीओ अँटीबॉडी व अँटी थायरोग्लोब्युलिन एबी या दोन अँटीबॉडीज असतात. यातील टीपीओ ही अचूक निदान देणारी व सर्वसाधारण आढळणारी अँटीबॉडी आहे. या अँटीबॉडीज कौटुंबिक आजारात व रक्ताच्या नात्यातील माणसात आढळतात. उदा. बहीण, भाऊ, आई, मुले यांच्यात अँटीबॉडीज रक्तात जास्त प्रमाणात असतील तर भविष्यात थायरॉइड आजार होण्याची दाट शक्यता. सबक्लिनिकल हायपोथायरॉइडिझममध्ये या अँटीबॉडीज असतील तर उपचार लगेच चालू करतात.
थायरोब्लाब्युलीन टेस्ट – हे थायरॉइड हार्मोनचे बाइंडिंग प्रोटीन आहे. याची तपासणी थायरॉइड कँसर व त्याच्यातील सुधाराच्या तपासणीसाठी करतात.
इतर थायरॉइड तपासण्या –
टेक्निटीयम स्कॅन – थायरॉइडच्या गाठी, कँसर, थायरॉइड आजाराचे कारण शोधण्यासाठी स्कॅनचा उपयोग होतो.
अल्ट्रासोनोग्राफी व फाइन निडल ऍस्पिरेशन सायटॉलॉजी याचा वापर गाठी, कँसर, कॅल्सिफिकेशन याचे निदान व फॉलोअप उपचारासाठी होतो.