दिगंबर संकटात

0
74

माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्याविरुद्ध ‘जायका’ प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल झाल्याने ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकू लागली आहे. गेल्या वर्षी म्हणजे बरोबर एक वर्ष एक महिन्यापूर्वी ‘जायका’ प्रकरणात पहिले आरोपपत्र दाखल झाले तेव्हा त्यात चर्चिल आलेमाव यांचे नाव होते, पण दिगंबर यांचे नव्हते. तेव्हा ऐन चतुर्थीत आपल्याला अधिक चौकशीसाठी अटक होऊ शकते याचा सुगावा लागल्याने दिगंबर यांनी वेळीच अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतल्याने त्यांची अटक टळली. त्यांना मिळालेल्या जामिनाविरुद्ध सरकार सर्वोच्च न्यायालयात गेलेले आहे व ती सुनावणी प्रलंबित आहे म्हणूनच आजवर ते मोकळे आहेत. मडगाव नगरपालिकेच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत कामत यांची समर्थक निवडून आल्याने दिगंबर यांचे पारडे मडगावात जड होऊ लागल्याची चर्चा असतानाच हे आरोपपत्र सादर झाल्याने कामत यांच्या भावी हालचालींना आपसूक लगाम बसला आहे. या आरोपपत्रामुळे कॉंग्रेसचे मुख्यमंत्रिपदाचे भावी उमेदवार म्हणून दिगंबर यांचे नाव पुढे केले जाण्याची शक्यता जवळजवळ मावळली आहेच, परंतु त्यांची उमेदवारीही संकटात सापडू शकते. ‘जायका’ प्रकरण उजेडात आले तेव्हा कॉंग्रेस पक्षाने दिगंबर यांची जोरदार पाठराखण केली होती. स्वतः प्रतापसिंह राणे यांनी तेव्हा दिगंबर यांना पाठिंबा दर्शविला होता. परंतु आता आरोपपत्र सादर झाल्यानंतरही पक्ष दिगंबर यांच्या पाठीशी राहणार का हे पाहावे लागेल. दिगंबर यांच्याविरुद्ध ‘जायका’ प्रकरणात सबळ पुरावे असल्याचा सरकारचा दावा आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या नावे असलेल्या कंपन्या, विविध बँक खात्यांतील ठेवी आदींकडे संशयाचे बोट या आरोपपत्राद्वारे वेधण्यात आले आहे. ‘जायका’ प्रकरणात चर्चिल यांच्यापेक्षा जास्त वाटा दिगंबर यांना मिळाल्याचेही सरकारचे म्हणणे आहे. लुईस बर्जरच्या अधिकार्‍यांपाशी आढळलेल्या नोंदींत चर्चिल यांचा उल्लेख ‘बिग’, तर दिगंबर यांचा उल्लेख ‘सुपर’ असा झालेला आहे. ‘जायका’ प्रकरण जेव्हा उजेडात आले, तेव्हा या प्रकल्पाच्या कामाशी सरकारचा दुरान्वयेही संबंध आला नसल्याचा दावा दिगंबर यांनी करून कानावर हात ठेवले होते, परंतु जसजशा नवनव्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या तसा हा बचाव ढासळत गेला. आनंद वाचासुंदर यांना जेव्हा अटक झाली तेव्हा त्यांनी सगळे काही मंत्रिपातळीवर झाल्याचा दावा त्यांनी केला. लाच देण्यात येत असताना आपण हजर होतो आणि मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी हा व्यवहार झाल्याचे त्यांनी तपास यंत्रणेला सांगितले आहे. त्यामुळे वाचासुंदर हे या सार्‍या प्रकरणातले महत्त्वाचे साक्षीदार आहेत. चर्चिल आणि दिगंबर यांना त्यांची साक्ष अडचणीत आणू शकते. ‘जायका’चे एकंदर प्रकरण हे अमेरिकेत उघडकीस आलेले आहे. ते काही भाजपा सरकारने खोदून काढलेले नाही. त्यामुळे प्रस्तुत कारवाई ही राजकीय सूडाची कारवाई म्हणणे पटणारे नाही. अमेरिकेतील आरोपपत्रात गोव्यात लाच दिली गेल्याचा उल्लेख आल्याने पुढील कारवाई सरकारने करणे क्रमप्राप्त होते. त्यामुळे राजकीय सूडाचे कारण दिल्याने चर्चिल किंवा दिगंबर यांचे निरपराधित्व सिद्ध होत नाही. ते त्यांना न्यायालयासमोर सप्रमाण सिद्ध करावे लागेल. जोवर ते होत नाही, तोवर ते संशयाच्या घेर्‍यात राहणारच. ज्याच्या मार्फत लाच दिली गेली तो हवाला ऑपरेटर आणि ज्याच्या साक्षीने ती दिली गेली ते प्रकल्पप्रमुख वाचासुंदर या दोघांच्या साक्षीवर चर्चिल किंवा दिगंबर यांचे भवितव्य अवलंबून असेल. ऑगस्ट २०१० पर्यंत ९,७६,६३० डॉलर लाच दिली गेली असे लुईस बर्जर कंपनीने कबूल केलेले आहे. म्हणजे लाच दिली गेलेली आहे. ती कोणाकोणाच्या खिशात गेली ते उघड होणे तेवढे आता बाकी आहे.