स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी ही मगो पदाधिकार्‍यांची इच्छा

0
102

>> पक्ष दहा जागा जिंकणार : सावंत

 

भाजपबरोबर युती न करता मगोने आगामी विधानसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवावी असे या पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकार्‍यांना वाटते, अशी माहिती मगोचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत एका प्रश्‍नाचे उत्तर देताना दिली. येत्या निवडणुकीत मगोला किमान १० जागा मिळतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
माध्यमप्रश्‍न तसेच कूळ-मुंडकार दुरुस्ती या प्रश्‍नांवरून मगो भाजपला जाब विचारण्यात कमी पडला तसेच वरील प्रश्‍नांवरून मगोने भाजप सरकारला दिलेला पाठिंबा काढून घ्यायला हवा होता अशी लोकांची भावना आहे. त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे असे पत्रकारांनी विचारले असता सावंत हे समाधानकारक असे उत्तर देऊ शकले नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकीनंतर विधानसभेत तुमचे किती आमदार असतील असे तुम्हाला वाटते असे विचारले असता किमान १० आमदार मगो पक्षाचे असतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
मगोतर्फे दिवाळी दिवशी
अभिष्टचिंतन सोहळे
मगो पक्षाने यंदा दिवाळीच्या दिवशी गोव्यात ठिकठिकाणी अभिष्टचिंतन सोहळे आयोजित करण्याचा निर्णय घेतलेला असून कृष्णपूजा हे या सोहळ्याचे आकर्षण असेल, असे मगो पक्षाचे कार्याध्यक्ष नारायण सावंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.
नरक चतुर्दशीच्या दिवशी गावागावात नरकासूर स्पर्धा घेतल्या जातात. नंतर नरकासूर प्रतिमा दहन होते. मात्र, या गोष्टींना आता विकृत रुप प्राप्त झालेले असून त्यामुळेच आम्ही ठिकठिकाणी श्रीकृष्ण पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला
आहे.