प्रादेशिक पक्षांबरोबर युतीची राष्ट्रवादी कॉंग्रेसची तयारी

0
108

येत्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात धर्मनिरपेक्ष विचारप्रणालीचे सरकार स्थापन होण्याची गरज आहे. त्यासाठी महायुतीची गरज होती. परंतु कॉंग्रेस पक्ष त्यावर विचार करीत नाही; त्यामुळे प्रदेश राष्ट्रवादी कॉंग्रेसने प्रादेशिक पक्षांबरोबर युती करण्याची तयारी ठेवली आहे, असे प्रदेश राष्ट्रवादीचे अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.

राष्ट्रवादीने वास्को, नुवे, नावेली, बाणावली, सांगे, कुठ्ठाळी, या मतदारसंघात काम सुरू केले असले तरी आता युती न झाल्यास ३० मतदारसंघांतून निवडणूक लढविणार असल्याचे डिसोझा यांनी सांगितले. आपला पक्ष युतीच्या बाबतीत गंभीर आहे. राज्यातील धार्मिक सलोखा व विकास अधिक महत्वाचा आहे. त्यामुळे अजूनही कॉंग्रेसने विचार करावा, असे आवाहन डिसोझा यांनी केले.
नेली रॉड्रिग्स राष्ट्रवादीत
गेल्या विधानसभा निवडणुकीतील गोवा विकास पार्टीच्या उमेदवार तथा जिल्हा पंचायत सदस्य नेली रॉड्रिगीस व नुवें येथील व्हिन्सेंत रॉड्रिगीस यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गोवा विकास पार्टीत राजकीय भवितव्य नसल्याचे दिसून आल्याने कुठ्ठाळी मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे सांगून येत्या निवडणूकीत आपण कुठ्ठाळी मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवार म्हणून आपण लढणार असल्याचे नेली रॉड्रिगीस यांनी यावेळी सांगितले. कुठ्ठाळी मतदारसंघातील मतदार आपल्या बाजूने असल्याने या निवडणुकीत आपण विजयी होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते देवानंद नाईक यांनीही युती होवो किंवा न होवो, आपण साळगाव मतदारसंघातून निवडणूक लढविणारच असे याच पत्रकार परिषदेत जाहीर केले.