टाटांची अप्रतिष्ठा

0
110

व्यावसायिक नीतीमत्तेसाठी नावाजल्या जाणार्‍या टाटा उद्योगसमूहाच्या अध्यक्षपदावरून सायरस मिस्त्री यांची तडकाफडकी झालेली हकालपट्टी आणि पुन्हा अंतरिम अध्यक्षपदाची सूत्रे रतन टाटा यांच्याकडे येणे या धक्क्यातून भारतीय उद्योगजगत अद्याप सावरलेले दिसत नाही. मिस्त्री यांना पदावरून नाट्यमयरीत्या दूर करण्याचे प्रयोजन काय याचे कोडे आता हळूहळू उलगडू लागले आहे. कोणत्याही उद्योगाच्या वाटचालीमध्ये चढउतार हे येतच असतात. त्यातून नीतिमानतेने व्यवहार करणार्‍या ‘टाटा’ सारख्या जुन्या आणि जवळजवळ शंभर देशांमध्ये अब्जावधींची उलाढाल असलेल्या उद्योगसमूहाच्या वाटचालीमध्येही असे चढउतार येणे स्वाभाविक आहे. त्यामुळे केवळ आर्थिक नुकसानीपोटी अध्यक्षांना हटविणारे पाऊल उचलले जाणे शक्य नाही. मिस्त्री यांच्या अध्यक्षपदाच्या गेल्या चार वर्षांच्या कारकिर्दीत समूहाचा ब्रिटनमधील पोलाद उद्योग गाळात गेला, किंवा डोकोमो या जपानी कंपनीशी झालेला करार तुटल्याने त्या कंपनीला १.२ अब्ज डॉलरची भरपाई द्यावी लागली एवढेच या हकालपट्टीमागचे कारण नाही. एकूणच टाटांच्या कार्यसंस्कृतीशी विसंगत धोरणे आखली जात असल्याच्या भावनेतून मिस्त्री यांच्यावर ही कारवाई झाली आहे आणि त्यामध्ये टाटा सन्स या पालक कंपनीचे बव्हंशी भागभांडवल असलेल्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट या दोन्ही विश्‍वस्त संस्थांच्या प्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली दिसते. संचालक मंडळाच्या बैठकीत आपल्याला आपली बाजू मांडण्याची संधीही न देता तडकाफडकी हटविण्यात आले असे मिस्त्री यांचे म्हणणे असले आणि त्यांचा शापोरजी पालनजी ट्रस्ट त्याविरुद्ध न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार असला, तरी ही सारी कारवाई टाटा सन्सच्या नियमावलीला धरूनच झाल्याचे दिसते आहे. कंपनीच्या आर्टिकल्स ऑफ असोसिएशनमध्ये अध्यक्षांना नेमण्याची जी प्रक्रिया सांगण्यात आली आहे, त्याच प्रकारे त्यांना हटविण्याचीही तरतूद त्यात आहे. त्यामुळे वरील दोन्ही विश्‍वस्त संस्थांपाशी पालक कंपनीचे ६६ टक्के भागभांडवल असल्याने या दोन्ही विश्‍वस्तांच्या प्रतिनिधींनी एकत्रितपणे मिस्त्री यांच्या विरोधात मतदान केल्याचे दिसते. नऊजणांच्या संचालक मंडळापैकी सहाजणांनी विरोधात मतदान केले, दोघे तटस्थ राहिले, तर स्वतः मिस्त्री यांना आपले मत देता आले नाही. उच्चपदस्थांना पायउतार करायला भाग पाडण्याची या उद्योगसमूहातील ही काही पहिली वेळ नव्हे. एकेकाळी बडे प्रस्थ असलेल्या रुसी मोदींना किंवा दरबारी सेठना आणि त्यांच्या दरबारी मंडळींना ज्या प्रकारे दूर करण्यात आले होते, त्याच पद्धतीने शांतपणे मिस्त्री यांना पदावरून दूर केले गेले आहे. टाटांच्या हॉटेल उद्योगाला नव्या उंचीवर नेणार्‍या अजित केरकरांनाही अशाच प्रकारे दूर व्हावे लागले होते. कदाचित रतन टाटांनी केलेली मिस्त्री यांची निवड चुकली असेल. त्याची दुरुस्ती लवकरच केली जाईल आणि पूर्णवेळ अध्यक्ष नेमला जाईल. समूहातील चांगली कामगिरी करणार्‍या टीसीएस आणि टाटा मोटर्सच्या सीईओंना आता पालक कंपनीच्या संचालक मंडळीत घेण्यात आले आहे. त्यामुळे त्यापैकी एखाद्याकडे रतन टाटांचा कल असू शकतो. पुढे काय घडते ते दिसेलच, परंतु टाटांच्या लौकिकाला या पदच्युतीमुळे थोडासा तडा गेला ही वस्तुस्थितीही आपल्याला मान्य करावी लागेल. विशेषतः अदि गोदरेज जे म्हणाले, त्याप्रमाणे केवळ टाटांसाठीच नव्हे तर भारतीय उद्योगजगतासाठीही ही चांगली घटना नाही. परंतु हे सारे वादळ लवकरच शांत होईल आणि पुन्हा टाटा उद्योगसमूहाची प्रतिष्ठा, लौकीक याला नवी झळाळी प्राप्त होईल अशी आशा करूया.