करावे तसे भरावे

0
359

पाकिस्तानच्या क्वेटा शहरातील पोलीस अकादमीवर काल दहशतवादी हल्ला झाला आणि त्यात किमान ५९ जणांचा बळी गेला. क्वेटा शहरातील अलीकडच्या काळातील हा दुसरा मोठा दहशतवादी हल्ला आहे. गेल्या ऑगस्टमध्ये अशाच एका हल्ल्यात ७३ जण ठार झाले होते. भारतामध्ये रक्तपात घडवीत आलेल्या पाकिस्तानला खरे तर ‘करावे तसे भरावे’ असा हा धडा आहे. दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्यात चांगला आणि वाईट असा भेद करता येत नाही हे जोवर पाकिस्तानला उमगत नाही, तोवर अशा प्रकारचे भस्मासुर पाकिस्तानवर उलटत राहणार आहेत. क्वेटामधील कालचा हल्ला हा लष्कर ए जांघवीच्या अल अलिमी गटाने केल्याचे प्राथमिक तपासात आढळले आहे. आयएसआयएस खुरासानचाही त्यात हात असावा असा कयास आहे. जसे भारतातील हल्ल्याचे नियोजन पाकिस्तानमधून होत असते, तसे या हल्ल्यांचे नियोजन अफगाणिस्तानमधून चालते. पाकिस्तान अमेरिकेशी हातमिळवणी करून गेली काही वर्षे अफगाणिस्तानमधील दहशतवादी गटांविरुद्ध कारवाई करीत आले असल्याने पाकिस्तानवर हा सूड उगवला गेला आहे. याच कारणाने अशाच प्रकारचे भीषण दहशतवादी हल्ले पाकिस्तानात यापूर्वीही होत आले. विशेषतः पेशावरच्या शाळेवरील अत्यंत भीषण असा हल्ला झाला तेव्हा पंतप्रधान नवाज शरीफ यांनी दहशतवादाविरुद्ध कणखरपणे लढण्याचा मनोदय वगैरे व्यक्त केला होता आणि त्यासाठी राष्ट्रीय कृती योजनाही जाहीर केली होती. मदरशांची नोंदणी करणे, त्यांना कडक नियमावली लागू करणे, भडकाऊ भाषणांवर बंदी घालणे, दहशतवाद्यांच्या प्रचार साहित्यावर, सोशल मीडियावरील प्रचारावर बंदी घालणे, माध्यमांमधून दहशतवाद्यांच्या उदात्तीकरणावर बंदी घालणे इथपासून ते दहशतवाद्यांच्या आर्थिक नाड्या आवळण्यापर्यंतच्या अनेक गोष्टी करण्यात येतील असे तेव्हा शरीफ यांनी जाहीर केले होेते. परंतु भारताविरुद्ध वापरायचा ‘चांगला’ दहशतवादी आणि पाकिस्तानविरुद्ध लढणारा ‘वाईट’ दहशतवादी असा भेद केल्याने वर उल्लेखलेल्या गोष्टी प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्यच झाले नाही. कागदावरच्या गोष्टी कागदावरच राहिल्या आणि त्यातून असे दहशतवादी हल्ले सोसण्याची वेळ पाकिस्तानवर आलेली आहे. निरपराध नागरिक त्यात बळी जात आहेत. वास्तविक, सरसकट सर्व प्रकारच्या दहशतवादाविरुद्ध लढण्याची ठाम भूमिका शरीफ यांनी घेतली असती आणि त्यात चांगला, वाईट असा फरक न करता कुप्रवृत्तीविरुद्ध लढण्याचे पाऊल उचलले असते, तर भारताचीही सक्रिय साथ पाकिस्तानला निश्‍चितपणे लाभली असती. परंतु एकीकडे आपल्या पदराखाली लष्कर ए तोयबा, जैश ए महंमद, जमात उद दावा या संघटना आणि त्यांच्या म्होरक्यांना पोसायचे आणि दुसरीकडे मात्र स्वतःच्या गळ्याला फास लावणार्‍या दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई करायची या दुटप्पीपणातून शरीफ यांच्या कारवाईच्या देखाव्यांना विश्‍वासार्हताच राहिलेली नाही. कारवाईचे देखावे आणि लढण्याची नाटके अशा प्रवृत्तीला पायबंद घालण्यास असमर्थ ठरली आहेत. खुद्द नवाज शरीफ यांची राजवट सध्या संकटात आहे. ‘पनामा पेपर्स’ मध्ये त्यांचे नाव आले. त्यानंतर त्यांनी कडव्या प्रवृत्तीच्या भारतद्वेषाला खतपाणी घालून आणि काश्मीरचा प्रश्न ऐरणीवर आणून देशाचे लक्ष त्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. विरोधकांना हे आता कळून चुकले आहे. त्यामुळे येत्या २ नोव्हेंबरला १० लाख नागरिकांचा मोठा मोर्चा त्यांच्या राजवटीला हादरा देण्यासाठी निघणार आहे. या सार्‍या परिस्थितीत नवाज शरीफ राजवट दिवसेंदिवस दुबळी आणि हतबल दिसू लागली आहे. भारताविरुद्ध उर बडवून त्यांना फार काळ आपले अपयश झाकता येणार नाही.