यादवी ः भाग २

0
100

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि काका शिवपाल यादव यांच्यातील यादवीचा दुसरा अध्याय सध्या सुरू झाला आहे. गेल्या महिन्यात अखिलेश यांनी शिवपाल यांचे निकटवर्ती मंत्री गायत्री प्रजापती आणि राजकिशोरसिंह यांची मंत्रिमंडळातून आणि मुख्य सचिव दीपक सिंघल यांची पदावरून हकालपट्टी केल्यावर उफाळलेला संघर्ष आटोक्यात आणण्यासाठी मुलायमसिंह यादव यांनी शिकस्त केली खरी, परंतु ही दुफळी कायमस्वरूपी सांधली गेलेली नाही हे दिसत होतेच. अखिलेश यांनी आता दुसर्‍यांदा आपल्या काकांचे मंत्रिपद हिसकावून घेत पक्षावरील स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न चालवला तेव्हा सर्वांना एकत्र राखण्यासाठी मुलायमसिंहांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांची जी बैठक काल लखनौत बोलावली, त्यात तर ती उघडपणे चव्हाट्यावर आली. अखिलेश यांनी एका राष्ट्रीय दैनिकात आपला ‘औरंगजेब’ असा उल्लेख होण्याला अमरसिंग यांना जबाबदार धरणे, त्यांच्याकडून ध्वनिक्षेपक हिसकावून घेऊन काका शिवपाल यांनी ‘‘ये झूठ है | मुख्यमंत्री झूठ बोल रहे है’’ म्हणत त्यांना फटकारणे, अखिलेश स्वतःचा पक्ष काढू पाहात होते असा जाहीर आरोप करणे हे सगळे परिस्थिती आता मुलायमसिंहांच्या हाताबाहेर जात असल्याची चिन्हे आहेत. मुलायमसिंह दोन्ही गटांना सांभाळून घेऊ पाहात आहेत. शिवपाल यांना ते दुखावू इच्छित नाहीत आणि अखिलेश यांचीही बाजू घेऊ इच्छित नाहीत. हा सारा उफाळलेला संघर्ष समाजवादी पक्षात पुनःप्रवेश झालेले अमरसिंह चुप्पी साधून पाहात आहेत. खरे तर या संघर्षाच्या मुळाशी ते आहेत, परंतु मुलायमसिंह कोणत्या हतबलतेपोटी त्यांचे सारे अपराध क्षम्य मानून त्यांची सगळी कृत्ये माफ करीत आहेत असा प्रश्न जनतेला पडला आहे. समाजवादी पक्षातील या यादवीचा अर्थ केवळ जुनी पिढी आणि नवी पिढी यांच्यातील संघर्ष एवढाच आहे का? केवळ पक्षावर वर्चस्वाची ही लढाई आहे का? आगामी निवडणुकांत तिकीट वाटपाचे अधिकार स्वतःपाशी एकवटावेत यासाठी हा संघर्ष उफाळला आहे का? प्रश्न अनेक आहेत आणि खरे तर या सर्व बाबी या संघर्षाच्या मुळाशी आहेत. मुख्यमंत्री म्हणून बाहुले बनून काम करणे अखिलेश यांना मान्य नाही. समाजवादी पक्षाची प्रतिमा सुधारण्यात त्यांचे फार मोठे योगदान आहे. एकेकाळी गुंड आणि खंडणीखोरांचा पक्ष मानल्या गेलेल्या समाजवादी पक्षाला त्यांनी नवा चेहरा मिळवून दिला. स्वतः विदेशात शिक्षण घेऊन आलेल्या अखिलेश यांच्यामागे उत्तर प्रदेशचा तरूण उभा राहिला आणि एक नवे विकासपर्व त्या राज्यात सुरू झाले. पण आपल्या अंगाखांद्यावर वाढलेला हा ‘छोटू’ एवढा मोठा झालेला जुन्या पिढीला सहन झालेले दिसत नाही. हा पक्ष आम्ही उभारला आहे, आम्ही घडवला आहे हा अहंकार या जुन्या पिढीला पक्षावरील आपली पकड सोडू देऊ पाहात नाही. या सगळ्या परिस्थितीत समेटाचा प्रयत्न मुलायम यांनी चालवला असला तरी तो दुबळा पडलेला दिसत आहे. निवडणुकीच्या तोंडावर अखिलेश पक्ष फोडून बाहेर पडणार का, राष्ट्रीय लोक दल, संयुक्त जनता दल, कॉंग्रेस आदींना सोबत घेऊन आघाडी बनवणार का, तसे झाले तर मुलायम यांची काय भूमिका असेल, समाजवादी पक्ष अखंड राखण्यासाठी या संघर्षावर मुलायम कशी मात करतील? प्रश्नांच्या गर्तेत समाजवादी पक्ष सध्या गटांगळ्या खातो आहे आणि दुसरीकडे विरोधक उत्तर प्रदेशसारखे महत्त्वपूर्ण राज्य काबीज करण्यासाठी कंबर कसून कामाला लागले आहेत. मिायावती येत्या निवडणुकीत स्वतःचे पुनरागमन उत्तर प्रदेशच्या क्षितिजावर करू पाहात आहेत. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षातील ही यादवी पक्षाला मुळीच परवडणारी नाही.